कहाण्या सार्याच तिच्या दिवसांच्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018   
Total Views |
पाऊस आपल्या उरातील वीज आपट्याच्या पानाशी ठेवून निघून जातो आणि दिवस सोन्याचे अन् रात्री रुपेरी होतात. डोंगरापलीकडच्या क्षितिजाचे उबदार चुंबन घेत थंडी हळूच गावात शिरते. अशा दिवसांतली पहाट मोठी मोहक असते. अशी पहाट निनादली, तर तिची कविताच होते. थंडी हळूहळू आकार घेत असताना पाखरं पंखात ऊब धरून कंठातलं गाणं थिजू नये यासाठी धडपडत असतात. गळ्यातलं गाणं संपलं, तर पाखरांची जमात त्यांना वाळीत टाकते. पंखातलं बळ अन् कंठातलं गाणं हाच पाखरांचा प्राण असतो. गाणं शाबूत ठेवायचं असेल तर घरटं मजबूत हवं. त्यासाठी मग पाखरं काडीकाडी गोळा करतात. त्यावर आपल्याच ज्ञातीबांधवांच्या पिसांची मुलायम पखरण करतात. झाडाची एखादी हलकी फांदी हळूच ओढून घरट्यावर सावली करतात; पण हंगामी पाखरांना मात्र दूरस्थ देशात झाडांवर घरटी बांधता येत नाहीत. झाडांचा नकार नसतो, पण सरत्या हिवाळ्यात पंखांचा रंग बदलतो अन् रंगवेडी पाखरं मग परतीच्या वाटेला लागतात. अवघं आभाळ पाखरांचंच असलं, तरी परक्या प्रदेशातल्या जमिनीवरील झाडांवर मात्र घरटी उभारू शकत नाही. हंगाम संपला की त्यांना आपली सावली धरून निघून जायचं असतं. पाखरांचं एक मात्र असतं की, भूक भागविणार्या जमिनीवर ती आभाळाइतकीच माया करतात. ऐन पावसाळ्यात चोचीत पाण्याचे थेंब धरून ठेवतात अन् कोरड्या दिवसांत ते ओल्या चोचीतून पाऊस पाडण्याची स्वप्नं बघतात. इवल्या पाखरांची स्वप्नंही आभाळाएवढीच मोठी असतात अन् विशेष म्हणजे ती भल्या पहाटे पडली असतात. पहाटेची स्वप्नं खरी होतात अन् पाखरांची स्वप्नं तर सत्याचे पूर्वप्रक्षेपणच असते.
 
या दिवसांतली पहाट फुलपाखरांच्या पंखावरून झाडांच्या पानांना जोजवीत येते. रात्र दवात भिजून रानभर पसरली असते. पानांना, फुलांना, हरिततृणांना अन् बरड जमिनीलाही गंध येतो. दवाचं मग अत्तर होतं. पहाट झाली की त्याची मिठी सैल होत नाही अन् तीदेखील सख्याच्या मिठीत दरवळत असते. वारा मग गवतावर पहुडलेल्या दविंबदूंना ही कथा सांगतो. दवाचा भावोत्कट सुगंध वार्यालाही मोहवतो. पहाट अशी दरवळत असताना आडवा डोंगर पार करून सोनेरी केशर गवतावर पसरतं आणि हिरव्या मैदानातली पाऊलवाट हळदगोरी होते. धिटुकली पाखरं पाऊलवाटेवर उतरतात. चोचीतलं आभाळ सांडवीत दाणे टिपत राहतात. काही कष्टकर्यांची अधीर पावलं याच वेळी रानाकडे चालत असतात. पाखरं मग पावलांची चाहूल घेत डबक्यात आंघोळ करतात, तेव्हा डबक्याची होते चंद्रभागा अन् किलबिलीत घुमतो नामाचा गजर. परिसरात संपन्नतेचा झेंडा रोवलेला असतो.
हे दिवसच तिचे असतात. तिला तुम्ही जे जे द्याल ते ते ती सव्याज परत करते. आपल्या लेकरांवर ती संपन्नतेचा हिरवा पदर धरते. कुठल्याही पाखराची चोच रिकामी राहू नये, ही तिची तळमळ असते. या दिवसात मग बुजगावणही हळवं होतं. आपल्या मडक्याच्या डोक्यावर पाखरांना बिनदिक्कत घरटं बांधू देतं. चोचीत चोच घालून पक्ष्यांनी रान उष्टावल्याशिवाय ते निसवतच नाही. पाखरंही मग काही दाणे किड्या-मुंग्यांसाठी सोडतात. गावानेही कुठलीच झोळी दीनवाणी होऊ नये, याची काळजी घ्यावी. तिला तुम्ही पाणी द्या, ती हिरवळ देते. तिला तुम्ही दाणे द्या, ती कणसं देते. भजनात दंग होऊन नाचणार्या गोरा कुंभाराच्या पावलाशी ती चिखल होते अन् त्याच्या लेकराच्या ओठासाठी तिच्या आचळात दूध टचटचून येते. लेकरासाठी छातीत दाटून आलेल्या तिच्या पान्ह्याची मग कोजागिरी होते. त्या वेळी गावाने भुकेल्या आत्मारामाला आश्वासनाच्या आरशात भाकरीचा चंद्र दाखवू नये. आपली भूक बेफाम आणि बेलगाम असते. भुकेजले जीव कधी कधी केशरी चंद्रही भाकरीसारखा खुडून खातात अन् चांदण्यांचे दगड तुमच्या वांझ संपन्नेवर भिरकावून देतात. गरजवंताची भूक भागविण्याचे साधन होते ती संपन्नता कधीच वांझ नसते. सोन्यालाही मातीचा वास असला की ते अधिक चकाकतं. मातीचा संबंध घासाशी असतो. रक्ताचा तसाही तिला तिटकारा असतो. म्हणून तिनं भरभरून संपन्न केलं की, तसल्या श्रीमंतीला रक्ताची चटक लागत नाही.
 
पाऊस सरत असताना ती सगुण साकार होते. बैलाच्या पावलांनी घरात येते, तेव्हा दारची तुळस मंजिर्यांतून लाजते. श्रमिक तिची पूजा करतो अन् ती श्रमवेड्यांची आराधना करते. तिचे शब्द मंत्र होतात अन् गाण्यांच्या आरत्या होतात. त्या आर्त तर असतातच, पण लयबद्धदेखील असतात. मग रानाचे मंदिर होते, घरांचा गाभारा होतो. परड्यांवरही मग लवलवत्या पात्यांची हिरवळ अगदी नेटकेपणां उभी असते. रान, पिकानं डवरलं असताना ती परडीवरच्या इवल्याशा हिरवळीच्या प्रेमात पडते. नवथर नवयौवना होते. पाखरं आपली चिरंतन स्वप्नं तिच्या डोळ्यांत पेरून जातात. विशेष म्हणजे ही पाखरं हिमपर्वतांच्या प्रदेशातून आलेली असतात. डोळ्यांच्या शुभ्र कोंदणात काजळाने ती चिंतामणी रेखाटते. ती हिमगौरी होते. तिच्या काकणांची फुलं होतात आणि श्वासांच्या झुल्यावर श्रीरंग रासक्रीडा करतो. ती आभाळाच्या भाळी चितारलेली चंद्राची नाजूक कोर होते.
 
श्रीरंगाला झुलवीत राहते. तिच्या वेदना चिरंतन होतात. कारण त्या नवप्रसवाच्या वेदना असतात. वेदना वांझ असल्या की त्याचं दु:ख होतं. तिला वेदना झाल्या, तरी त्यांचं दु:ख करण्याची गरज नसते. तिच्या व्यथा, वेदना सुंदर होतात. त्यांची गाणी होतात; लेणी होतात. तरीही तिच्या वेदनांची आसनी घराघरांत मांडली जाते. वेदनेच्या बाहुल्यांची पूजा करण्याची प्रथाच त्यामुळे पडली आहे. त्या बाहुल्यांचा प्राण मग घराघरांत प्रत्येकीच्या श्वासात भिनतो. ती मग एकटी राहत नाही. ‘ती’ ‘त्या’ होते. त्यांची वेदनेची कहाणी सोनवर्खी असते. हळद-कुंकवाने दाटलेली असते. आटून केशरी झालेल्या दुधासारख्या त्या व्यथा घोटीव असतात. तिची पावलं माहेरच्या अश्विनातून सासरच्या वैशाखापर्यंत पडतात. वैशाखातल्या काट्यांचीही फुलं होतात. एक एक फूल वेचून ती वैशाख वणव्याची पूजा बांधते. तिच्या वेदना हळुवार असतात; इवल्याशा असतात; पण मोहक असतात; मंगलमय असतात. इतक्या की त्या एक सूत्रात बांधल्या तर त्यांच मंगळसूत्रच व्हावं.
ती तिच्यासारख्या अनेकींच्या वाट्याला आलेल्या भगभगीत वेदनेचा लाल भडक टिळा लावूनच तुमच्या घरात आली असते. तिच्या वेदनेला, असोशीला हवे असते आपलेपण. ती मग ते सख्याच्या मिठीत शोधते, घरातल्या ज्येष्ठांच्या पायाशी शोधते अन् समवयस्कांच्या मैत्रीत शोधते. हक्काचे तेवढेही भेटले नाही, तर तिच्या वेदनाही मग धिटावतात. गाण्यांचे मग रणभेरी पोवाडे होतात. ती समर्पित भक्तीचं रूप टाकून समर्थ शक्ती होते. तिच्या हळव्या सुरांना पाझर न फुटणार्या असुरांचा सामना करायला तिला दोन हात पुरेसे नसतात. आठही दिशा गरजाव्यात म्हणून ती अष्टभुजा होते. आकाश मस्तकावर धारण करून जमीन पायाशी घेते. मग गाव तिच्या आरत्या म्हणतं. घरांची दारं आपोआपच उघडतात. नाकर्त्या नकाराचे आगडोंब शांत होतात. सौंदर्याला न स्वीकारणारे सामर्थ्यासमोर नतमस्तक होतात. असे झाले की तिच्या वेदना दिवे होऊन मृण्मणी पणतीच्या मुखात अंगार पेटवितात. अंधकार पळवितात. माहेर आणि सासरच्या घरांची छतं मात्र सारखीच असतात, हे एव्हाना सगळ्यांना पटलेलं असतं. मग ती सौम्य होते. नवं घर आपलं करते. स्वच्छ झालेल्या अंगणात रांगोळी रेखाटते अन् हळद-कुंकवाच्या पावलांनी घरात येते.
तेव्हा तिच्या दारात उमटलेल्या पावलांचीही पूजा करायची असते. घर संपन्नतेनं भरण्यासाठी आलेल्या तिच्यासाठी आणखी काय करायचं असतं?
@@AUTHORINFO_V1@@