जंगलाचा राजाच संकटात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |


 

गीरला जे झाले त्याबाबतचा धोका वारंवार व्यक्त केला जात आहे, मात्र राजकीय कारणांमुळे सिंह गीरपुरतेच मर्यादित ठेवले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील अवनी वाघिणीला मारण्यावरून चाललेले वादंग संपलेले नसतानाच गुजरातमधील सामार्डी येथे १८ दिवसांत २१ सिंह मृत्युमुखी पडल्याची बाब समोर आली आहे.

 

आशियाई सिंहाच्या अस्तित्वाचे शेवटचे ठिकाण असलेले गुजरात हे जगातले एकमेव ठिकाण असल्याने या घटनेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे. आशियाई आफ्रिकन अशा सिंहांच्या दोनच प्रजाती शिल्लक असून कधीकाळी आशियाई सिंहांचे अस्तित्व सिंधू नदीच्या पूर्वेपासून तुर्कस्तान, इराण, इराक, कुवेत सौदी अरेबियापर्यंत होते. २० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत बंगाल मध्य भारतातदेखील या सिंहांचे अस्तित्व होते. शिकार अधिवासांच्या ऱ्हासामुळे आज आशियाई सिंह केवळ गीरपर्यंतच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या सिंहांच्या बाबतीत काहीही घडले तरी जगभरातील पर्यावरणप्रेमींकडून याबाबत चिंता व्यक्त केली जाते. आता जे सिंह मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या मृत्यूमागे संसर्गजन्य विषाणू असल्याचे प्रशासन सांगत आहे. हे विश्लेषण खरे असले तरीही हे मृत्यूकेनाइन डिस्टेंपर व्हायरसनावाचे आहेत. हे विषाणू जंगलात राहणार्‍या प्राण्यांत आढळत नाही. पाळीव प्राण्यांमुळे पसरणारा हा आजार आहे. गीरच्या जंगलातील मानवी हस्तक्षेप हा गेल्या अनेक वर्षांच्या चिंतेचा विषय आहे. जुनागडच्या नवाबाने सिंहाची ही प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी जे प्रयत्न केले, त्याचाच परिणाम म्हणून आज हे सिंह आजच्या पिढीला पाहायला मिळतात. गुजरात वनविभागाने या विषयात केलेल्या कामाचा परिणाम म्हणूनही इथे सिंहांची संख्या चांगल्या प्रकारे वाढताना दिसते. आता मुद्दा हा सिंह नामशेष होत असल्याचा नसून गीर अभयारण्याची जागा आता या सिंहांना मावेनाशी झाली आहे.

 

गावात फिरणार्‍या गावातील गुरे मारणार्‍या सिंहांच्या ध्वनिचित्रफिती आजही आपल्याला युट्यूबसारख्या माध्यमात पाहायला मिळत आहेत. गीर सिंहांच्या बाबतीत अजून एक क्लेशकारक प्रकार म्हणजे बेट लावून सिंह बोलाविण्याचा खेळ. सामार्डी परिसरातच पोल्ट्रीतील जाडजूड कोंबड्या किंवा म्हशीचे रेडकू बांधून सिंहांना शेतांमध्ये आकर्षित केले जाते. या सोप्या शिकारीसाठी सिंहही गावे सोडून शेताकडे वळतात. यासाठी पर्यटकांकडून भरपूर पैसे घेऊन त्यांना गुपचूप बोलावले जाते. फोटो काढणे, सिंहाला कोंबडी दाखवून पर्यटकांकरवी बोलावणे असे प्रकार यातून केले जातात. हे जितके गंभीर आहे, तितकेच धोकायादकदेखील. वाघ सिंहासारख्या मोठ्या प्राण्याकडे आदरयुक्त भीतीपलीकडे कुठल्याही भावनेने पाहाता येत नाही. भीतीयुक्त आदराचे हे अंतर कमी झाले तर यातून पुढच्या काळात उद्भवणार्‍या पशु-मानव संघर्षासारख्या गंभीर समस्या आहेतच, पण त्याचबरोबर सिंहामध्ये पाळीव जनावरांचे आजार पसरण्याचीही मोठी भीती आहे. उद्या पर्यटक नसल्यास पाळीव जनावरे अथवा प्रसंगी माणसेच उचलायला हे प्राणी मागेपुढे पाहात नाहीत. आज २१ सिंहांचा मृत्यू ज्या कारणामुळे झाला आहे, त्यामागे पाळीव जनावरांना होऊ शकणारा संसर्ग कारणीभूत आहे हे उघड आहे. आफ्रिकेत अशाच प्रकारच्या संसर्गाने सुमारे एक हजार सिंहांचा बळी घेतला होता. गीर सिंहाच्या बाबतीत असे काही घडू नये यासाठी गीरचा वनविभाग अत्यंत कसोशीने प्रयत्न करीत आहे. सुमारे शंभर सिंहांना आता निरीक्षणाखाली घेण्यात आले असले, तरी जे आता घडले ते इतके भयावह आहे की, एका फटक्यात इतकी वर्षे सांभाळलेले हे सिंह नाहीसे होऊ शकतात.

 

सासन गीरच्या सिंहांना अधिक मोठे क्षेत्र उपलब्ध व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. गेली तीस वर्षे हा लढा निरनिराळ्या वन्यजीव प्रेमींकडून लढला जात आहे. आज आशियाई सिंह गुजरातपुरतेच मर्यादित असले तरीही मध्य प्रदेशही कधीकाळी त्यांचा नैसर्गिक अधिवास होता. त्यामुळे तीस वर्षांपूर्वीच न्यायालयाने मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर येथे सिंहांचे स्थलांतर करण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे पाठपुराव्यामुळे मध्य प्रदेश शासनाने एक मोठा भूभाग यासाठी राखून ठेवला आहे. इथल्या अधिवासाच्या विकासासाठी मध्य प्रदेश शासनाने सुमारे ९० कोटी रुपये खर्चही केले आहेत. मात्र, गीरहून मध्य प्रदेशला सिंह हलविण्याचा मुहूर्त अद्याप काही उजाडलेला नाही. यासाठी दोन्ही राज्यांतले प्रशासकीय अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात. मूळ मुद्दा राजकीयच आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे गीर सिंह हे गुजरातच्या अस्मितेचे प्रतीक झाले आहेत. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व असे सिंह स्थलांतरित करण्याचे धाडस करीत नाही. गेल्या वर्षी सासन गीरला सिंह पाहण्यासाठी तिकीट काढून आलेल्या लोकांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात होती. केवळ तिकीटविक्रीतून वनविभागाला मिळालेेले उत्पन्न दहा कोटींहून अधिक होते. अशा स्थितीत गुजरातने मध्य प्रदेशासोबत सिंह वाटून घेणे केवळ अशक्य आहे. यासाठी कमालीची राजकीय इच्छाशक्ती किंवा न्यायालयाचा थेट हस्तक्षेप आवश्यक आहे. या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करायला हवा तो म्हणजे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा विचार सहचर स्वीकारण्याचा. मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी लागणार्‍या परिसंस्था अन्नसाखळ्या अशा वन्यजीवांमुळेच पूर्ण होतात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मानवाला होतो. गेल्या काही वर्षांच्या प्रबोधनानंतर आता कुठे या विषयातल्या संवेदना जाणवू लागल्या आहेत. मात्र, आजही बहुसंख्य जनता वन्यजीवांकडे मनोरंजनाचे माध्यम म्हणूनच पाहाते. जोपर्यंत या दृष्टिकोनात बदल होत नाहीत, तोपर्यंत पांढरकवडा किंवा गीरसारख्या गोष्टी घडतच राहाणार.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@