तेल निर्माते-ग्राहकांमध्ये भागीदारी निर्माण करण्याची गरज : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |



तेल आणि वायू क्षेत्रातल्या विविध तज्ज्ञांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा 

 

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांशी, अधिकाऱ्यांशी आणि नेत्यांशी इंधनदरवाढी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चर्चा केली. तेल आणि वायू बाजारपेठेत भारताचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तेल उत्पादक देशांकडून तेलाचे प्रमाण आणि त्याच्या किंमती निश्चित केल्या जातात. अशा वेळी तेलाचे पुरेसे उत्पादन असतानाही तेलाच्या किंमती वाढवल्या जातात, बाजारपेठेत तेल निर्माते आणि तेलाचे ग्राहक यांच्यामध्ये भागीदारी निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी नोंदवले. जागतिक बाजारपेठ मंदीतून बाहेर पडत असताना अर्थव्यवस्था स्थिरावण्यासाठी तेलाच्या किंमती स्थिर राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

तेल आणि वायू क्षेत्रातल्या विविध तज्ज्ञांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चर्चा केली. या बैठकीला सौदी अरेबियाचे आणि संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री आणि क्षेत्रातल्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तज्ज्ञ, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि केंद्र सरकारचे तसेच नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

 

यावेळी तेल पुरवठा आणि किंमती यांच्या धोरणाविषयी भारताशी संबंधित असलेल्या मुद्यांकडे नरेंद्र मोदींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताची इंधनाची गरज खूप मोठी आहे. इंधनाचे दर वाढले की त्याचे परिणाम अनेक क्षेत्रांवर होतात. अर्थव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान निर्माण होते. त्यामुळे तेल उत्पादक देशांनी सहकार्य करण्याची आवश्यता आहे. तेल उत्पादक देशांनी आपल्याकडे जास्त असलेली गुंतवणूक (सरप्लस) विकसनशील देशांमध्ये व्यावसायिक तेल क्षेत्रासाठी गुंतवावी, असे आवाहन मोदी यांनी सर्वांना केले.

 

तेल उत्खनन आणि शोध क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी या देशांनी सहकार्य करावे, असा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला. यासह विकसित देशांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. गॅस वितरण क्षेत्राकडे भागीदारांमार्फत खाजगीकरण करण्यावर मोदी यांनी विशेष भर दिला. तेल आणि वायू कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशातल्या मोबदल्याविषयी अटी आणि नियमांची समीक्षा करण्यात यावी, असेही पंतप्रधानांनी यावेळी सुचवले. यामुळे स्थानिक चलन व्यवहाराला काही काळासाठी मदत मिळू शकेल, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपल्या सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची माहिती बैठकीत मोदी यांनी दिली.

 

इराणवर नोव्हेंबरपासून प्रतिबंध

 

इराणवर अमेरिकेने लागू केलेल्या प्रतिबंधाची तारीख नोव्हेंबर आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील त्यांच्याकडून होणारी तेलाची विक्री दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र अरब देशांनी याला तिलांजली देत आशियातील देशांना मोठ्या प्रमाणावर तेल खरेदीचे आवाहन केले आहे. इराणवर चार नोव्हेंबरपासून अमेरिकेने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जपान, कोरिया आणि भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. एका अहवालानुसार, निर्बंधानंतरही आशियातील देशांना दरांमध्ये १४ रुपये प्रतिबॅरलची कपात करुन आशियात विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे समजले. निर्बंधांमुळे इराणचा निर्यात स्तर हा गेल्या अडीच वर्षांमध्ये सर्वात जास्त खालावला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@