आले युवराजांच्या मनात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018   
Total Views |

 

 

 
 
 
देशाच्या राजकीय व्यवस्थेत युवराज या शब्दाचे महत्त्व किमान भारतीयांना सांगावे लागत नाही. भाजप, जदयु आणि केरळपुरत्या मर्यादित राहिलेल्या डाव्या पक्षांचा अपवाद वगळता देशातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना घराणेशाहीने ग्रासले असून, बहुतेक पक्षांमध्ये आज पक्षाच्या संस्थापकांची मुलं त्या त्या पक्षांचे नेतृत्व करताना दिसत आहेत.
 
 
त्यात जसे चार-पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेले प्रादेशिक पक्ष आहेत तसेच शंभरी पार केलेले राष्ट्रीय पक्षही आहेत. राणीच्या बागेत होणाऱ्या प्राण्यांच्या खरेदीपासून ते संसदेत आपल्याच सरकारने आणलेला अध्यादेश फाडून टाकणं अशा गोष्टींना, ‘आले युवराजांच्या मनात’ असे स्पष्टीकरण दिले जाते. लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतात ही अवस्था तर गेली ८६ वर्षं एकाच घराण्याची निरंकुश सत्ता असलेल्या सौदी अरेबियाची काय कथा? या लेखाचा विषय अत्यंत गंभीर आहे. २ ऑक्टोबर रोजी, सौदी अरेबियाच्या इस्तंबूलमधील वाणिज्य दूतावासातून वरिष्ठ पत्रकार जमाल हाशोग्जी गायब झाले. हतिस चेंगिझ या आपल्या प्रेयसीशी लग्न करता यावे म्हणून घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, काही कागदांवर सह्या करण्यासाठी दूतावासाने त्यांना बोलावले होते. पण आत गेलेले हाशोग्जी दोन तास झाले तरी बाहेर न आल्याने बाहेर वाट पाहणाऱ्या चेंगिझ यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे तुर्कीची तपास यंत्रणा जागी झाली. आज दोन आठवडे झाल्यानंतरही हाशोग्जींचा काही ठावठिकाणा नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, त्याच सकाळी सौदी अरेबियाहून आलेल्या १५ मारेकऱ्यांनी दूतावासातच त्यांची हत्या करून त्यांच्या शरीराची विल्हेवाट लावली असावी, असे आरोप तुर्कीने केला. अमेरिकेने हॅक केलेल्या संदेशांतही हाशोग्जी यांचे अपहरण करण्याच्या योजनेबाबत सौदी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याचे उघड होत आहे. या आरोपांमुळे पश्चिम आशियासह पाश्चिमात्त्य राष्ट्रांमधील राजकारणही ढवळून निघाले आहे. ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले हाशोग्जी हे काही साधेसुधे पत्रकार नव्हते. ‘सौदी गॅझेट’ या वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात करून कालांतराने ते ‘अरब न्यूज’ आणि ‘अल वतन’ या सौदीतील आघाडीच्या वर्तमानपत्रांचे मुख्य संपादक बनले. अफगाणिस्तानमध्ये जाऊन ओसामा बिन लादेनची मुलाखत घेणाऱ्या पहिल्या पत्रकारांपैकी ते एक. सौदीत वृत्तपत्र स्वातंत्र्य नसून अल-सौद घराण्याने अनेक वर्तमानपत्रं आणि टीव्ही वाहिन्यांतील मोठा हिस्सा विकत घेतला असल्याने तेथे संपादकांना राजघराण्याची मर्जी सांभाळावी लागते. ती हाशोग्जींनी सांभाळली. आपली हुशारी आणि कट्टर इस्लामला पाठिंबा यामुळे त्यांनी अनेकदा सौदीतील उच्चपदस्थांचे सल्लागार म्हणून काम केले. सौदी गुप्तचर संस्थेचे प्रमुख आणि नंतर सौदीचे अमेरिकेतील राजदूत बनलेल्या राजपुत्र तुर्की बिन फैजल यांचे ते सल्लागार असल्याने त्यांच्याकडे कायमच आतल्या गोटातील बातम्या असायच्या.
 

जानेवारी २०१५ मध्ये राजे अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सौदीचे संस्थापक इब्न सौद यांचे २५ वे अपत्य असलेले सलमान सौदीचे राजे झाले. त्यांचीही प्रकृती खूप काही चांगली नसल्यामुळे राज्यकारभार स्वीकारताच त्यांनी आपली खुर्ची बळकट करण्यासाठी अनेक दशकांच्या परंपरेला फाटा देत आपला ३० वर्षांचा मुलगा महंमद बिन सुलतान यांना उपयुवराज आणि संरक्षण मंत्रीपद दिले. जून २०१७ मध्ये शक्तीशाली युवराज नयीफ यांना हटवून त्यांच्या जागी महंमद यांची नेमणूक केली. हसतमुख आणि चेहऱ्यावर निरागसता असणाऱ्या युवराज महंमद यांनी सत्तेवर येताच सौदीमध्ये सुधारणांचा धडाका लावला. महिलांच्या गाडी चालवण्यावरचे निर्बंध उठवण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून सौदीच्या अनेक राजपुत्रांना आणि उच्चपदस्थांना अटक करण्यात आली. सौदीची राष्ट्रीय तेल कंपनी आराम्कोच्या समभागांची भांडवली बाजारात नोंद करून त्यातून मिळणाऱ्या प्रचंड पैशांतून संपूर्णतः सौरउर्जेवर चालणारे निऑम शहर बांधणे तसेच कोकणातील नाणार येथे भव्य पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्पात गुंतवायच्या योजना आखल्या गेल्या. त्यामुळे पाश्चिमात्त्य जगात युवराज महंमदचे कौतुक सुरू झालेकालांतराने या सुधारणावादी मुखवट्यामागे दडलेला क्रूर चेहरा वेळोवेळी बाहेर येऊ लागला. आजवर महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर सौदी राजपुत्रांमध्ये सहमतीने निर्णय व्हायचे पण युवराज महंमद यांनी स्वतःचे घोडे दामटवणे सुरू केले. कतार न्यूज एजन्सीद्वारे प्रसारित केलेल्या कथित फेक न्यूजसाठी आखाती अरब राष्ट्रे आणि इजिप्तसह कतारवर आर्थिक निर्बंध लादणं, येमेनमधील इराण समर्थक हुतींविरुद्ध कारवाई करताना नागरी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक केल्याने त्यात हजारो निरपराध्यांचे झालेले हत्याकांड, लेबनॉनचे पंतप्रधान साद अल हरीरी सौदी दौऱ्यावर आले असताना त्यांचे अपहरण करून त्यांना टीव्हीवरच राजीनामा द्यायला लावणे, असे अनेक निर्णय महंमद यांनी अत्यंत एककल्लीपणे घेतले आणि ते पुरते फसले. आज येमेन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून कतार इराण आणि तुर्कीच्या जवळ ओढला गेला आहे.

 

या घटनेमुळे अमेरिकेत अस्वस्थता पसरली आहे. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिणाऱ्या हाशोग्जी यांच्या संभावित हत्येमुळे अमेरिकेच्या लोकशाहीवादी, उदारमतवादी प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे सौदीविरुद्ध निर्बंध लादण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष ट्रम्पवर दबाव टाकत आहे, पण युवराज महंमद यांची ट्रम्प यांचे जावई जारेड कुशनर यांच्याशी असलेली घनिष्ठ दोस्ती आणि अमेरिकेकडून ११० अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रं विकत घ्यायचा करार यामुळे अमेरिकेचे हात बांधले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सौदीचे सुलतान सलमान यांच्याशी फोनवर २० मिनिटं बोलले. त्यात सौदीने हात झटकल्याने ट्रम्प यांनी परराष्ट्र सचिव माइक पोम्पिओ यांना रियाधला पाठवायचा निर्णय घेतलानिवडणुकीमधील घोटाळे, आपल्या राजकीय विरोधकांना तसेच विरुद्ध लिहिणाऱ्या पत्रकारांना अटक केल्याबद्दल तुर्कीचे अध्यक्ष इर्दोगान पाश्चिमात्त्य देशांच्या निर्बंधांचे धनी झाले आहेत, पण हाशोग्जी यांच्या संभावित हत्येची संधी साधून त्यांनी अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलली. अमेरिकन ख्रिस्ती धर्मोपदेशक अँड्—यू बर्न्सन यांना तुर्कीने हेरगिरी आणि बंडाला खतपाणी घातल्याच्या आरोपावरून दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना ३५ वर्ष तुरुंगात काढावी लागली असती. या प्रकरणामुळे तुर्कीने अचानक बर्न्सन यांची सुटका केली. तुर्कीवरील कर्जाचा डोंगर आणि लिराचे घसरते मूल्य यामुळे तुर्कीला सौदीशी थेट वाकड्यात शिरणे परवडणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई न करता तुर्कीचे अध्यक्ष भाषणांतून सौदीविरुद्ध आरोप करत आहेत. तसेच हाती आलेले पुरावे वृत्तमाध्यमांद्वारे उघड करत आहेत. सौदीकडून या घटनेची किंमत वसूल करण्याचा त्यांचा हेतू असावा.

 

ही घटना घडताच तुर्की, इराण, कतारसह इराक, लेबनॉनसारख्या सौदी विरोधक देशांनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. या धक्क्यातून सावरल्यानंतर सौदीचे मित्र असलेल्या अरब देशातील तसेच सौदी देणग्यांवर पोसली गेलेली वृत्तमाध्यमं एकत्र येऊन युवराज महंमद यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील महिन्यापासून इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेथून होणारी निर्यात घटू लागली आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. सौदी आणि आखाती अरब राष्ट्रांनी अतिरिक्त उत्पादन करून हा तुटवडा भरून द्यायचा वायदा केला असला तरी हाशोग्जी प्रकरणात अमेरिका आणि पाश्चिमात्त्य देशांनी सौदीवर निर्बंध लादल्यास सौदी तेलाचे उत्पादन कमी करून तेलाचा भडका उडवू शकतो. कदाचित हाशोग्जी यांची संभावित हत्या पचवण्यात सौदी अरेबिया यशस्वी होईलही, पण पुढची अनेक दशकं सौदीची सत्ता राबविण्याची शक्यता असलेल्या युवराज महंमद बिन सलमान यांच्या कार्यपद्धतीवर आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. तसा थेट संबंध नसला तरी ही घटना केवळ घराणेशाहीच्या पायावर उभ्या असलेल्या आणि ‘आले युवराजांच्या मनात’ या पद्धतीने चालणाऱ्या राजकीय पक्षांच्या समर्थकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@