ऑस्ट्रेलियात भारताची खरी कसोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 

वेस्ट इंडिजच्या संघाला व्हाईटवॉश देऊन पुन्हा एकदा मायभूमीत आम्हीच बादशहा हे भारतीय संघाने दाखवून दिले खरे, पण आता येणार्‍या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारत वेस्ट इंडिजप्रमाणे ऑस्ट्रेलियाला चारही मुंड्या चीत करते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल पण भारतीय संघाचे या विजयाने मनोबल नक्कीच वाढले असेल. त्यामुळे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली सध्या उघड्या डोळ्यांनी ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे स्वप्न पाहत आहेत.

 
 
ही मालिका नक्कीच सोपी नसेल, कारण इंग्लंडमध्ये भारतीय संघाची दैना सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र हा वेस्ट इंडिजचा दौरा भारतासाठी सरावाचा असला तरी, या मालिकेत भारताला अनेक नवे पर्याय मिळाले. त्यातला एक म्हणजे भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ. त्याचबरोबर रिषभ पंत सारख्या खेळाडूनेही आपली जागा भारतीय संघात जवळजवळ पक्की केल्यातच जमा आहे. त्यातच उमेश यादवला गवसलेला सूर भारतासाठी येणार्‍या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात जमेची बाजू ठरेल, यात काही वाद नाही. मात्र ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच घरात हरविणे भारतासाठी सोपे नक्कीच नसेल. भारताच्या गोलंदाजांनी आपली किमया दाखवली असली तरी भारताचे काही फलंदाज या मालिकेतही सपशेल अपयशी ठरेल. त्यातलाच एक म्हणजे के. एल. राहुल. त्यामुळे राहुलचे ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील स्थान धोक्यात आले आहे. त्यातच कसोटी सामन्यातील भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेही मधल्या फळीत अपेक्षेप्रमाणे आपला खेळ करत नसल्याने मधल्या फळीतील फलंदाजीची भिस्त ही विराट कोहलीवरच असेल. ऑस्ट्रेलिया दौर्‍याआधी भारताच्या सलामीवीर फलंदाज आणि त्यांना गवसलेला सूर तसेच, जलद गोलंदाजांचा चांगला फॉर्म यांचा सराव झाला असला तरी, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांतील वातावरण आणि खेळपट्टी वेगळी असल्याने या सराव सामन्यांचा कितपत फायदा होईल, हे डिसेंबर महिन्यातील कसोटी सामन्यातच कळेल. ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक पाहिल्यास भारताला दोनच सराव सामने खेळायला मिळत आहेत. त्यामुळे निराशाजनक कामगिरी झाल्यास पुन्हा सराव सामन्याची सबब भारतीय संघाकडून पुढे केली जाऊ शकते. तूर्तास तरी या मालिका विजयामुळे खुश असलेली विराट सेना, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीतील खर्‍या कसोटीस तयार आहे का?

दिव्यांग खेळाडूंची कमाल

दिव्यांग खेळाडूंची पंढरी म्हणजे पॅरा आशियाई स्पर्धा. इंडोनेशियातील जकार्तात यावर्षी या स्पर्धेस सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारताने सुवर्णपदकासोबत या स्पर्धेचा श्रीगणेशा केला. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीही भारताने दोन सुवर्णपदकांसोबत भारताचा शेवट गोड केला. यावर्षीच्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताने एकूण ७२ पदके जिंकत आपली सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत नवव्या स्थानावर राहिला. तर, २0१४ च्या स्पर्धेत भारताने एकूण ३३ पदके जिंकली होती. स्पर्धेच्या अंतिम दिवशी, भारताच्या प्रमोद भगतने बॅडमिंटन एकेरी प्रकारात इंडोनेशियाच्या उकुन रुकेंडीचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. याव्यतिरिक्त तरुण या खेळाडूने चीनच्या खेळाडूवर मात करत बॅडमिंटन खेळात आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताने तिरंदाजी, बॅडमिंटन, सायकलिंग, पॉवरलिफ्टिंग, जलतरण, टेबल टेनिस प्रकारात पदकांची कमाई केली. एकूणच भारतीय दिव्यांग खेळाडूंची यावर्षीची कामगिरी उल्लेखनीय होती, यात वादच नाही. त्यामुळे २0२0 साली जपानमध्ये होणार्‍या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतीय संघाकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे. मात्र, नेहमी खेळाडूंकडून अपेक्षा करणार्‍या चाहत्यांनी जरी दिव्यांग खेळाडूंवर प्रेम दाखवले असले तरी, पॅरा ऑलिम्पिक कमिटीचे मात्र या खेळाडूंकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र या पॅरा आशियाई स्पर्धांत दिसून आले. त्यामुळे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय दिव्यांग संघाने केवळ चांगली कामगिरी करावी, अशी आशा व्यक्त करून खेळाडूंसाठी काही करण्याची वेळ आली की, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे, असे काहीसे धोरण या कमिटीने स्वीकारले आहे. याचा प्रत्यय आला तो या स्पर्धेत जेव्हा खेळाडूंनी आपल्या आरोग्याकडे तसेच प्रशिक्षणातही कमतरता जाणवत असल्याची कबुली दिली तेव्हा. त्यामुळे कमिटी फक्त स्पर्धेनंतर श्रेय घेताना दिसली. त्यामुळे अशा कमिट्या खेळाडूंची हेळसांड होऊ नये याकरिता असतात की फक्त चांगली कामगिरी केली की, त्याचं श्रेय घ्यायला?

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@