उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत साध्य करावेडॉ. सुभाष भामरे यांचे निर्देश : जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समितीची सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |
 
उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत साध्य करावे
डॉ. सुभाष भामरे यांचे निर्देश : जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समितीची सभा
 
धुळे, १३ ऑक्टोबर
तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. या सर्व योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या एलपीजी गॅस सिलिंडर जोडणीचे उद्दिष्ट डिसेंबर पर्यंत साध्य करावे, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे दिले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन आदी उपस्थित होते.
 
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले की, केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांची प्रत्येक विभागाने प्रचार व प्रसिद्धी करीत लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास व कृषी विभागाच्या आयुक्तांच्या उपस्थितीत धुळ्यात बैठकीचे आयोजन करण्यात यावे. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे गांभीर्य बाळगत डिसेंबर २०१८ अखेर एक लाख सहा हजार ४८७ लाभार्थ्यांच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या जोडणीचे काम पूर्ण करावे. याबाबत केलेल्या कामगिरीचा आठवडाभरात अहवाल सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
धुळे शहरासाठी राबविण्यात आलेल्या १३६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेबाबत संबंधित विभागाला पत्र पाठवीत. या योजनेतील दोषींवर, हलगर्जीपणा करणार्‍यांवर कोणती कार्यवाही केली याचाही अहवाल मागविण्यात यावा, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी दिले. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे. शेतकर्‍यांचे प्रबोधन करून या योजनेचे लाभ शेतकर्‍यांना सांगावेत. धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबविण्यात येत असून अशीच कामगिरी यापुढेही सुरू ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, तालुका आणि गावस्तरावर पथकांची स्थापना करण्यात आली आहे. महानगरपालिका, पोलिसांच्या सहकार्याने शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.
 
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, अटल अभियान- नावीन्य आणि शहरी परिवर्तन, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, एकात्मिक बालविकास सेवा योजना, सर्व शिक्षा अभियान, माध्यान्ह भोजन, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, भूमी अभिलेख आधुनिकीकरण, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आदी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत अशासकीय सदस्य सुनील बैसाणे, अनुप अग्रवाल यांनी सहभाग घेत विविध सूचना मांडल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@