उमेशच्या यादवीने विंडीज भुईसपाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |



हैद्राबाद: फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि सांघिक कामगिरी आदी सर्वच बाबतीत उत्कृष्ट प्रदर्शन करत कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आणि पाहुण्या वेस्ट इंडिजला पुरते भुईसपाट केले. हैद्राबाद येथे झालेली मालिकेतील दुसरी व अखेरची कसोटी भारताने अवघ्या तिसऱ्या दिवशीच १० गाडी राखून जिंकली आणि एकहाती मालिकाविजय नोंदवला. या सामन्यात १० बळी घेणारा भारताचा गोलंदाज उमेश यादव सामनावीर ठरला तर पदार्पणातच धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

राजकोट येथील पहिल्या कसोटीत भारताकडून डाव आणि २७२ धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विंडीजने हैद्राबाद कसोटीत थोडी बरी सुरूवात केली. रोस्टन चेसच्या शतकाच्या जोरावर (१८९ चेंडूत १०६ धावा) विंडीजने पहिल्या डावात सर्वबाद ३११ अशी मजल मारली. परंतु, भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने ८८ धावांत ६ बळी घेत पाहुण्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर भारतालाही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले परंतु, ऋषभ पंत (९२), अजिंक्य रहाणे (८०) आणि पृथ्वी शॉ (७०) या तिघांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने सर्वबाद ३६७ अशी मजल मारत ५६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या विंडीजने एकेक फलंदाज खेळपट्टीवर अक्षरशः हजेरी लावून परतले आणि विंडीजचा दुसरा डाव अवघ्या १२७ धावांतच आटोपला. पाहुण्यांचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळीदेखील करू शकला नाही. दुसरीकडे उमेश यादवने ४५ धावांत ४ बळी घेत विंडीजची दुरवस्था करण्यात सिंहाचा वाटा उचलला. रवींद्र जडेजा (१२ धावांत ३ बळी) आणि रवीचंद्रन अश्विन (२४ धावांत २ बळी) यांनी यादवला सुरेख साथ दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात विजयासाठी अवघ्या ७२ धावांची गरज असलेल्या भारताने हे लक्ष्य हसतहसत पूर्ण केले. भारताची सलामीची जोडी पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुल यांनी प्रत्येकी नाबाद ३३ धावा करत संघाला १० गाडी राखून विजय मिळवून दिला.

 

पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ४ बळी घेणाऱ्या उमेश यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, भारताचा अवघ्या १८ वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने पदार्पणाच्या मालिकेतच केलेल्या लक्षवेधक कामगिरीबद्दल पृथ्वीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. पृथ्वीने स्वतःच्या कारकीर्दीच्या व या मालिकेच्या पहिल्या सामन्यात, अर्थात राजकोट कसोटीत १३४ धावांची सुंदर शतकी खेळी साकारत पहिल्यावहिल्या सामन्यातच सामनावीर पुरस्कार पटकावला होता. आता यानंतर या दौऱ्यात विंडीजचा संघ भारताविरुद्ध ५ एकदिवसीय सामने व ३ टी-२० सामने खेळणार आहे. रविवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.

 

मुंबईकर पृथ्वीची ‘शॉ’नदार कामगिरी :

 

पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावणारा सर्वात तरूण भारतीय खेळाडू

 

पदार्पणातच सामनावीर पुरस्कार मिळवणारा ६ वा भारतीय खेळाडू

 

पदार्पणात मालिकावीर पुरस्कार मिळवणारा जगातील १० वा तर भारताचा ४था खेळाडू

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@