मिशन इंडिया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |



डॉ. अब्दुल कलाम यांच्या दि. १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी असलेल्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.


भारताचे जगविख्यात शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दि. १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी रामेश्वर येथे झाला आणि जणू अंतराळात एक वैज्ञानिक सूर्य उदयास आला. तथापि, लहानपणीच वडिलांचे छत्र गमाविल्याने आपल्या गावात वर्तमानपत्रे विकणे अशी लहानमोठी कामे करून त्यांनी आपला शिक्षणाचा खर्च भागविला. अर्थातच, त्यांचे बालपण खूपच कष्टात गेले. तद्नंतर कलाम यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी. एस्सीची पदवी संपादन केल्यानंतर मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत त्यांनी एरॉनॉटिक्सचे प्रशिक्षण, तर अमेरिकेतील ‘नासा’ या संशोधन संस्थेत एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. १९५८ ते १९६३ या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेत सामील झाले. त्यानंतर कलाम यांनी १९६३ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासासंबंधी संशोधनात भाग घेतला. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना कलाम यांनी क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमातून सांघिक कामगिरीवर भर देत आपल्या सहकाऱ्यांमधील उत्तम कलागुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत उपयोग करून घेण्यात त्यांची हातोटी होती. क्षेपणास्त्र विकास क्षेत्रातील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे भारतासह जगभरात कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अग्नीसह त्रिशूल, आकाश, नाग या अग्निबाणांचीही त्यांनी निर्मिती केली. जुलै १९८० मध्ये डॉ. कलाम यांनी अवकाशात ‘रोहिणी’ हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला. थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्यासमवेत त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस रिचर्स सेंटरमध्ये प्रोग्राम प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.

 

डॉ. कलाम यांची केवळ भारतातच नव्हे तर, साऱ्या जगात एक ‘देशभक्त शास्त्रज्ञ’ म्हणून ख्याती होती. १९९४ मध्ये त्यांचा ‘माय जर्नी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘अदम्य जिद्द’, ‘इंडिया-माय ड्रीम’, ‘सायंटिस्ट टू प्रेसिडेंट’, ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘उन्नयन’, ‘इंडिया २०२०-अ व्हिजन फॉर दी न्यु मिलेनियम’, ‘इग्नाईटेड माइंड्स’, ‘एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन’ आदी पुस्तके डॉ. कलाम यांनी लिहिली. डॉ. कलाम यांनी विज्ञान व क्षेपणास्त्र विकास क्षेत्रात जी भरीव कामगिरी केली, या पार्श्वभूमीवर अनेक लेखकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने पुस्तके लिहिली. त्यात ‘भारतरत्न कलाम’, ‘कलामांचे आदर्श’, ‘विद्यार्थ्यांचे कलाम’ (लेखक : डॉ. सुधीर मोंडकर), ‘रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन’ (शां. ग. महाजन), ‘कर्मयोगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’ (डॉ. शरद कुंटे), ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन’ (अरुण तिवारी), ‘एक मानवतावादी शास्त्रज्ञ’ (अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी), ‘टर्निंग पॉईंटस’ (अंजणी नरवणे), ‘टार्गेट थ्री मिलियन’ (सृजनपाल सिंह), ‘दी व्हिजनरी ऑफ इंडिया’ (के. भूषण), ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम-एक व्यक्तिवेध’ (माधुरी शानभाग), ‘इटर्नल क्वेस्ट’ (एस. चंद्रा) आदी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

 

विज्ञान, तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र विकास या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारने डॉ. कलाम यांना विविध राष्ट्रीय व सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यात ‘पद्मभूषण’-१९८१, ‘पद्मविभूषण’-१९९०, ‘भारतरत्न’ व ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’-१९९७, ‘वीर सावरकर पुरस्कार’-१९९८, ‘रामानुजन पुरस्कार’-२०००, ‘किंग्ज चार्ल्स पदक’-२००७, सिंगापूर येथे ‘डॉक्टर ऑफ इंजिनिअरींग’-२००८, ‘डॉक्टर ऑफ सायन्स’-२००७ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. डॉ. कलामांचा वाचन, लेखन व संशोधनाचा दांडगा व्यासंग होता. या पार्श्वभूमीवर डॉ. अब्दुल कलाम यांच्या दि. १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी असलेल्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने राज्यातील शैक्षणिक संस्था आणि शासकीय-निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/मंडळे, सार्वजनिक उपक्रम या कार्यालयांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. ‘वाचनाचा ध्यास’ लागणे हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. खरं तर, विद्यार्थी असो वा कर्मचारी प्रत्येकाने अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत, संशोधन कार्यात सहभागी होऊन देशाच्या विकासाला हातभार लावावा, म्हणजे हीच खरी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली ठरेल.

 

-प्रसाद ठाकूर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@