जाहिरात : ६५ वी कला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |



१४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ‘जाहिरात दिन’ साजरा झाला. त्यानिमित्त जाहिरात क्षेत्राचा परिचय करून देणारा हा लेख.....


जाहिरात ही ६५वी कला आहे, असे म्हटले जाते. अत्यंत पुरातन अशा या कलेमध्ये अनेक बदल, स्थित्यंतरे होत आहेत. अगदी पुरातन काळामध्ये ओरडून आपल्या उत्पादनाची माहिती सांगण्यापासून ते आज आपल्या हाती असलेल्या मोबाईलमधील जाहिरातीपर्यंतचा प्रवास अत्यंत मनोरंजक आहे. एका व्यक्तीपासून अगदी ५०० हून अधिक जाहिरात व्यावसायिकांचा समावेश असलेली जाहिरात एजन्सी असो की अगदी कॅलिग्राफीच्या साहाय्याने हाताने रेखाटलेली जाहिरात किंवा ब्लॉकने तयार केलेली जाहिरात व आता आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केलेली जाहिरात ही स्थित्यंतरे गेल्या अनेक शतकांत होत गेली व आगामी काळातही होतीलच यात शंका नाही. जोपर्यंत एका व्यक्तीपासून विचार, सेवा किंवा उत्पादनांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता राहील, तोपर्यंत जाहिरातीचे अस्तित्व व गरज राहणारच यात तीळमात्रही शंका नाही. पुरातन काळापासून बॉन्झ प्लेट, दगड असे साहित्य वापरून जाहिरात होत असे. इजिप्तमध्ये पुरातन काळात जाड कागद वापरून हाती जाहिरात करत असत. यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक संदेश असे. अरब देशात तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिकेत भिंती किंवा दगड रंगवून जाहिरात करत असत. प्रामुख्याने हरवलेल्या व्यक्तीच्या शोधाकरिता बरेचदा ही जाहिरात असे. भारतामध्येही इसवी सन पूर्व ४००० मध्ये पाषाण वापरून जाहिरात केल्याचा उल्लेख आढळतो. चीनमध्येही कवितेच्या व गीतांच्या स्वरूपात जाहिरात करत असत. जसजशी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली तसतशी जाहिरातींची माध्यमेही बदलत गेली.

 

१९व्या शतकात इंग्लंडमध्ये साप्ताहिकामध्ये जाहिरातीची सुरुवात झाली. प्रामुख्याने विविध पुस्तकांचा प्रचार करण्याकरिता या जाहिराती देत असत. यानंतर वाचकांच्या प्रकारांप्रमाणे जाहिराती साप्ताहिकात देण्याचे चलन झाले, जेणेकरून योग्य वाचकांपर्यंत उत्पादन सेवा याबाबतचा संदेश पोहोचविता येईल. जून १८३६ मध्ये एका फ्रेंच दैनिकात पैसे घेऊन अधिकृतरित्या जाहिरात छापण्यात आली. यानंतर जसजशी उत्पादनाची सेवेची लोकप्रियता व व्याप्ती वाढली तसेतसे हे काम करण्यासाठी व्यावसायिकांची गरज वाढली व त्यातूनच जाहिरात एजन्सी या संकल्पनेचा उगम झाला. १८६९मध्ये जगातील पहिली पूर्ण जाहिरात एजन्सी एन. डब्लू. आयेर अॅण्ड सन्स या जाहिरात एजन्सीची स्थापना करण्यात आली. भारतातील पहिल्या जाहिरात एजन्सीची सुरुवात १९०२ मध्ये झाली. बी. दत्ताराम अॅण्ड कंपनी ही एजन्सी मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर बरेच वर्ष फक्त नियतकालिके किंवा दैनिके यामध्ये जाहिराती होत होत्या. ऑलिव्ही अॅण्ड माथर व हिंदुस्तान थॉमसन असोसिएटसची सुरुवात भारतात १९२०मध्ये झाली. जसजसे माध्यमांमध्ये तांत्रिक बदल होत गेले तसतसे जाहिरातींचे स्वरूपही बदलत गेले. १९६७मध्ये ‘विविध भारती’ या रेडिओवर पहिली जाहिरात, तर १९७८मध्ये दूरदर्शनवर पहिल्यांदा जाहिरात केली गेली. यानंतर १९८२मध्ये भारतात रंगीत टेलिव्हिजनची सुरुवात झाल्यानंतर टीव्हीवरील जाहिराती, प्रायोजित कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

 

१९९२मध्ये तत्कालीन सरकारने आपल्या आर्थिक नीतीमध्ये बदल केल्यामुळे माहितीचे नवे युग अवतरले. अनेक नव्या वाहिन्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतात आल्या. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये आपली सेवा देण्यास प्रारंभ केल्याने त्यांना त्यांची उत्पादने सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरिता प्रिंट, टेलिव्हिजन, रेडिओ, आऊटडोअर अशा विविध माध्यमांची गरज वाटू लागली. त्यातच इंटरनेटचे जाळे वेगाने पसरल्यामुळे इंटरनेट हेदेखील जाहिरातीचे नवे माध्यम झाले. त्यानंतर आलेल्या सोशल मीडियामुळे जाहिरातींचे विश्व अजूनच विस्तीर्ण झाले. आज भारतातील जाहिरातींचा व्यवसाय हा सुमारे ६३ हजार कोटी रुपयांचा असून तो भारताच्या जीडीपीच्या ०.४५ टक्के एवढा आहे. यामध्ये प्रिंट मीडियाचा वाटा ४१.२ टक्के एवढा असून टेलिव्हिजन जाहिरातींचा वाटा ३८.२ टक्के, डिजिटल मीडिया ११ टक्के; तर रेडिओ, आऊटडोअर व सिनेमांचा वाटा १० टक्के एवढा आहे. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वर्ष २०२० पर्यंत डिजिटल मीडियाचा व्यवसाय २५ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. आजही लाखो नोकऱ्या या क्षेत्रात असून येणाऱ्या काळातही रोजगार देणारे ‘जाहिरात’ हे मोठे क्षेत्र ठरणार आहे, यात शंका नाही.

 

-अभिजीत दि. चांदे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@