अलाहाबाद लवकरच होणार प्रयागराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |


 

अलाहाबाद: कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलाहाबादचे नाव लवकरच ‘प्रयागराज’ होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नवे नाव प्रयागराज करण्याची घोषणा केली आहे. अलाहाबाद येथे कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाची बैठक पार पडली. यानंतर योगी आदित्यनाथ पत्रकारांशी बोलत असताना ही घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, “अलाहाबादमध्ये गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्यांचा संगम होतो. त्यामुळे अलाहाबाद सर्व प्रयागांचा राजा आहे. त्यामुळेच त्याला ‘प्रयागराज’ म्हटले जाते. त्यामुळे अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. त्यावर जर व्यापक सहमती झाली, तरच आपण या शहराला ‘प्रयागराज’ असे नाव देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी ठरविले होते. ही सहमती प्राप्त झाल्यामुळेच हे नवे नामकरण केले जाणार आहे.”

 

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या फलकांवर अलाहाबादऐवजी ‘प्रयागराज’, असे लिहिण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वीच अलाहाबादचे नाव अधिकृतरित्या बदलून प्रयागराज करण्याची शक्यता आहे. येथे पुढील वर्षी म्हणजे २०१९ साली १५ जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. योगींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “कुंभमेळ्याची तयारी समाधानकारक पद्धतीने सुरू असून सरकार ३० नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करेल. कुंभमेळ्यासाठी १ लाख २२ हजार शौचालये तयार केली जाणार आहेत. कुंभमेळ्यादरम्यान लोकांना ‘स्वच्छ भारत’चा संदेश दिला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाचे नाव यापूर्वीच प्रयागराज झाले आहे. त्यामुळे आता लवकरच अलाहाबाद जिल्ह्याचे नावही ‘प्रयागराज’ होईल. दरम्यान, अलाहाबादच्या नामांतराबाबत घोषणा होताच, त्यावर विरोधी मतेही तातडीने व्यक्त झाली. समाजवादी पक्षाने अपेक्षेप्रमाणे या निर्णयाला विरोध जाहीर केला. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यात घुसून सपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@