पारंपरिक ज्ञानाच्या प्राचीन वाटा आपण बुजवल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |


 


ठाणे : 'नव्या भौतिक साधनांना उपयोगात आणण्यासाठीची हुशारी' असा ज्ञानाचा संकुचित अर्थ आज झाला आहे. पारंपरिक ज्ञानाला आपण अडाणी ठरवले असून ज्ञानाच्या पारंपरिक वाटा आपण बुजवल्या आहेत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे यांनी व्यक्त केली.
 
दै. 'मुंबई तरूण भारत'द्वारा आयोजित 'संस्कृती संवाद' या विशेष कार्यक्रमात लेखिका, कवयित्री व संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. अरूणा ढेरे यांनी निवडक साहित्यप्रेमी व वाचकांशी संवाद साधला. ठाणे येथील नौपाडा भागातील गोखले मंगल भवनमध्ये डॉ.प्रकाश कवठेकर यांच्या पंचवटी आयुर्वेदिक केंद्राच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, मुंबई तरूण भारतचे संपादक किरण शेलार, बिझनेस हेड रविराज बावडेकर उपस्थित होते. यावेळी अरूणा ढेरे यांनी साहित्य, संस्कृतीशी संबंधित विविध पैलूंवर उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. प्रारंभी त्यांनी त्यांच्या साहित्यिक प्रवासाची थोडक्यात माहिती दिली. 'शब्दांच्या मोहातून लिहिण्यास सुरूवात केली' असे सांगत मला पुस्तकांच्या घरात राहायला मिळाले, हे माझे भाग्य असल्याचे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, संस्कृती, परंपरा याची काहींना भीती वाटते तर काहींना ओझे परंतु संस्कृतीतील पोषक, सत्वशील घटकांशी मी जोडली गेले. ज्या समाजाला पाय टेकवण्यास जमीन आहे, असा आपला समाज आहे. आज जगभरात इतिहास, भूतकाळ नाकारण्याची लाट असताना मी मात्र पुन्हा पुन्हा माझ्या संचिताचा विचार करते, असे प्रतिपादन अरूणा ढेरे यांनी केले.
 
कुटुंबव्यवस्थेचा नव्याने विचार होण्याची गरज
 
संस्कृती हा मोठा अवकाश असून त्यात टाकाऊ आणि टिकाऊ असे दोन्ही असल्याचे त्या म्हणाल्या. कुटुंबव्यवस्था हादेखील संस्कृतीचा भाग आहे. आपल्याकडे व्यक्ती केंद्र नव्हते तर कुटुंब होते. आज जगभरात समाजरचनेत विविध प्रयोग होत आहेत. त्यामुळे आता कुटुंबव्यवस्थेबाबतही नव्याने विचार होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, आज आत्यंतिक व्यक्तीवादही वाढत असून निरनिराळी उत्पादने तुमच्यावर लादली जात आहेत. आज आयुष्याला वेग आला असून जीवनाचे पुनरावलोकन करण्यासाठी आपल्याला वेळच मिळत नसल्याचे त्या म्हणाल्या. यातून एकाकीपण येत असून हे एकाकीपण तरूणांमध्येही वाढत असल्याचेही निरीक्षणही त्यांनी नोंदवले. यावेळी डॉ. अरूणा ढेरे यांनी महाभारतातील पात्रे, त्यांचा पुनर्विचार, मिथकांचा पुनर्विचार तसेच द्रौपदी, रूक्मिणी या नायिकांबाबत सविस्तर भाष्य केले. मिथकांमध्ये आपणच भर घालतो, त्यांना अर्थ देतो. मिथक ही मानवाला मिळालेली देणगी असल्याचे त्या म्हणाल्या. भगवद्गीतेमध्ये हिंदू, भारतीय संस्कृतीच्या पलीकडे जाऊन मानवाला काहीतरी देण्याची क्षमता असून त्या दृष्टीकोनातून तिचा विचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
 
संवादाची माध्यमे जिवंत राहायला हवीत
 
संस्कृती ही बाह्य वेशभूषा इ. पुरती मर्यादित नाही. आपल्या संस्कृतीने जे काही दिले आहे त्यातूनही आपल्याला नवे काही मिळू शकते. परंतु यासाठी संवादाची माध्यमे जिवंत राहायला हवीत, असेही मत अरूणा ढेरे यांनी नोंदवले. स्त्री आणि सृष्टी यांच्यावर आपण केलेल्या अत्याचारातून स्त्री आणि सृष्टीचे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ते एकमेकांशी जोडलेले असल्याचे त्या म्हणाल्या. 'नव्या भौतिक साधनांना उपयोगात आणण्यासाठीची हुशारी' असा ज्ञानाचा संकुचित अर्थ आज झाला आहे. पारंपरिक ज्ञानाला आपण अडाणी ठरवले असून ज्ञानाच्या पारंपरिक वाटा आपण बुजवल्या आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी दै. मुंबई तरूण भारतचे मुख्य उपसंपादक विजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रविराज बावडेकर यांनी आभार व्यक्त केले.
 

माहितीच्या हापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@