संवादातील समतोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |


 


टीनएज वयोगटातील मुलांशी संवाद जितका मुक्त आणि दुहेरी होईल; त्यामध्ये मुलांना त्यांचे विचार, भावना मांडण्याची संधी मिळेल तितकी ही मुले पालकांशी जास्त जोडली जातात. वेगवेगळे रोमांचक प्रयोग करून पाहण्याच्या या वयामध्ये, भोवताली अनेकविध प्रलोभने असताना तर हा संवाद खूप गरजेचा आहे.

 

एका सहकाऱ्याने मला विचारले की, त्याचा दहा वर्षांचा मुलगा टीव्हीवर कुटुंब नियोजनाच्या उत्पादनाची जाहिरात लागली की ‘हे काय आहे?’ असे विचारतो; तेव्हा काय सांगावे त्याला? मी त्याला सांगितले की, सध्या तरी, ‘ही मोठ्या लोकांनी वापरण्याची वस्तू आहे. तू मोठा झालास की तुला समजेल.’ इतके उत्तर पुरेसे आहे. मुलांमध्ये खूप उत्सुकता असते हे जरी खरे असले तरी ‘प्रत्येक गोष्ट आपल्याला आत्ता समजेलच आणि समजलीच पाहिजे असे नाही’ हेही त्यांना कळायला हवे. अर्थात, मुलांच्या अशा प्रश्नांवर पालक काय उत्तरे देतात याचबरोबर किती शांतपणे आणि ठामपणे उत्तरे देतात हेही महत्त्वाचे आहे. ‘गप्प बस रे, तुला कळणार नाही ते.’ किंवा ‘तुला कशाला नसत्या चौकशा रे? तू तुझा अभ्यास कर बरं.’ आपला गोंधळ लपवण्यासाठी कळत-नकळत काढलेले असे उद्गार म्हणजे या उत्सुकतेला अधिकच हवा देण्यासारखे आहे. यातून मग उत्सुकता शमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग चोखाळले जाण्याची आणि त्याद्वारे चुकीचाच ‘अभ्यास’ होण्याची शक्यता वाढते.

 

मानवी शरीराच्या ठेवणीबद्दल, स्त्री-पुरुषाच्या शरीरात असणाऱ्या वेगळेपणाबद्दल मुलांना लहानपणापासून प्रश्न पडायला लागतात. हे प्रश्न पालकांना मोकळेपणाने विचारात येतील असे वातावरण घरात असायला हवे. प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येक वेळी सविस्तर उत्तर द्यायला हवे असे नाही तरी, त्यातील किमान शुद्ध नैसर्गिकता जितकी स्पष्टपणे, मुलांपर्यंत पोहोचेल तितके फायद्याचे ठरते. पालकांना निरोगी व संतुलित दृष्टिकोनासह मुलांचे कोणतेही प्रश्न हाताळणे शक्य आहे. मुख्य म्हणजे आपण काहीतरी गंभीर, गुप्त माहिती घेत आहोत असे मुलांना वाटण्यापेक्षा नैसर्गिक, शास्त्रीय ज्ञान घेत आहोत हे मुलांना समजेल असा संवाद गरजेचा आहे. त्यातूनच ‘चांगला स्पर्श’ आणि ‘वाईट स्पर्श’ याविषयीचे ज्ञान देता येते. मुले मोठी असोत अथवा लहान, त्यांना आपण २४ तास आपले संरक्षणकवच देऊ शकत नाही. तसे करणे हे त्यांच्याच प्रगतीत अडथळा आणणारे आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला शिकवणे, इतरांचे स्पर्श ओळखायला शिकवणे आणि गरज असेल तेव्हा मुलांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे या बाबी आजच्या पालकत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. मध्यंतरी एका शाळेच्या वसतिगृहातील सातवीच्या मुलींबरोबर गटसत्र घेताना त्यांना ‘चांगले-वाईट स्पर्श’ याविषयी पूर्वी झालेल्या सत्राची आठवण करून दिली. त्याच्या पुढे जाऊन नजरांनी केलेले ‘स्पर्श’ आणि शब्दांनी केलेले ‘स्पर्श’ यावर त्यांच्याशी झालेली चर्चा जास्त रंगली. या सत्राच्या माध्यमातून या मुलींना परस्परांबद्दल वाटणाऱ्या प्रेम, आकर्षण, हेवा, तिरस्कार, असुया अशा भावना, त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकता आला. ‘स्पर्श’ या विषयाची विविधांगी चर्चा या सत्राला खूप वेगळ्या पातळीवर घेऊन गेली. हे सत्र संपताना मुलींना मानवी नातेसंबंधांबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन मिळू शकला आणि स्वतःच्या अंतरंगांत डोकावण्याची समृद्ध दृष्टीही.

 

टीनएज वयोगटातील मुलांशी संवाद जितका मुक्त आणि दुहेरी होईल; त्यामध्ये मुलांना त्यांचे विचार, भावना मांडण्याची संधी मिळेल तितकी ही मुले पालकांशी जास्त जोडली जातात. वेगवेगळे रोमांचक प्रयोग करून पाहण्याच्या या वयामध्ये, भोवताली अनेकविध प्रलोभने असताना तर हा संवाद खूप गरजेचा आहे. या वयात मुलांच्या घरातील बाहेरील वर्तनामध्ये बऱ्याचदा फरक दिसून येतो. त्यामुळे मुलांना संवाद साधण्याची पालकांव्यतिरिक्त इतरही ठिकाणे उपलब्ध असायला हवीत. त्यात नातेवाईक असतील, शिक्षक असतील, मुलांच्या मित्रमंडळींचे पालक असतील, तज्ज्ञ असतील; ज्याठिकाणी मुलांना व्यक्त होणे आवडेल त्यांच्यावर शिक्केबाजी होणार नाही तिथे त्यांना ती मोकळीक जरूर द्यावी. मुले आता मोठी व्हायला लागली आहेत. पालक त्यांना प्रत्येक ठिकाणी पुरणार नाहीत हे स्वीकारणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, मुलांशी लैंगिकतेबाबत संवाद सुरु करताना कुटुंबातील, मित्रपरिवारातील एखाद्या डॉक्टर व्यक्तीची मदत घेणे फायद्याचे ठरू शकते. कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्त इतरांशी झालेला मनमोकळा संवाद मुलांना महत्त्वाची सामाजिक कौशल्येही शिकायला मदत करतो.

 

 
- गुंजन कुलकर्णी 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@