१९७५ ची आणीबाणी : एक सत्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |



माझी मोठी मुलगी १२ वर्षांची, दुसरी नऊ वर्षांची, मुलगा सहा वर्षांचा, मोठा वाडा, मी वनवासी समाजाची एक मुलगी दत्तक घेतली होती, ती १६ वर्षांची होती. अशा चार मुलांनी मिळून घर सांभाळले. तुम्ही स्वत:ला आमच्या जागेवर ठेवून विचार करा म्हणजे कळेल. अशी परिस्थिती आम्ही विरोधकांच्याबाबतीत निर्माण केली का? असे हाल आम्ही यांचे केले का? मग यांना आणीबाणीची दुर्बुद्धी कशी सुचली, हेच कळत नाही! ‘भविष्यातील आणीबाणी आणण्याचे (सत्ता आल्यावर) विराधकांचे स्वप्न तर नाही?’ हाच प्रश्न पडतो!

 

आज अद़ृश्य आणीबाणी, अघोषित आणीबाणी असल्याची ओरड सर्वच विरोधक करीत आहेत. कुठे यांना आणीबाणी दिसली? खरी आणीबाणी आम्ही पाहिली, भोगली, सहन केली. तिची यांना आठवण करून देणे गरजेचे आहे.

 

प्रसारमाध्यमे

 

आणीबाणीत सर्वप्रथम प्रसारमाध्यमांवर बंदी येते! इथे प्रसारमाध्यमे सर्रास शासनाच्या विरोधात लिहितात. केंद्र शासनाने व राज्य शासनाने शेतकऱ्यांबाबत, कामगारांबाबत, मध्यमवर्गीयांबाबत, दिव्यांगांबाबत, वयोवृद्धांबाबत, आरोग्याबाबत... घेतलेले निर्णय यांचा त्यांना सोईस्कररीत्या विसर पडतो. सगळीकडे शासनावर टीका, विरोध, विरोधकांच्या मतांना प्रसिद्धी, हे सर्व आज सुरू आहे. मग त्यांना आणीबाणी कुठे दिसली, कुठे जाणवली? अहो, आणीबाणीचे नावसुद्धा तुम्हाला उच्चारता आले नसते! आजतर इलेक्ट्रॉनिक मीडियावर रोखठोक, चर्चासत्र, आरोपपत्र यावर सर्रास चर्चा होते, आरोप होतात, वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे. कुठे आणीबाणी दिसली तुम्हाला?

 

मोर्चे, आंदोलन, जाळपोळ

 

मोर्चे, आंदोलन, जाळपोळ हे आणीबाणीत सर्व बंद असते. आज मोर्चांना कुठे बंदी आहे? “आमचे अधिकार आम्हाला द्या!” रस्त्यावर, आज संघटनेच्या माध्यमातून हा नारा देता येतो. हे आणीबाणीत अपेक्षित नाही. मराठा मोर्चा, धनगरांचा मोर्चा, अनुसूचित जाती-जमातींचे मोर्चे, कम्युनिस्टांचे, आदिवासींचेमोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले, हे तर लोकशाहीचे प्रतीक आहे! लोकशाही जीवंत असण्याचे प्रतीक आहे. त्यात दगडफेक, जाळपोळ, एसटी गाड्यांचे नुकसान, खाजगी वाहनांची जाळपोळ हे सर्व करायला मुभा मिळाली. हे आणीबाणीत अपेक्षित नाही. मुस्कटदाबी, लोकशाहीला प्रतिबंध, मानव अधिकाराचे हनन, याला आणीबाणी म्हणतात! मग तुम्ही तर आजही आपले विचार सडकेवर, प्रसारमाध्यमांतून, जाहीर भाषणांतून मांडता, शासनाला शिव्या देता. कुठे आहे आणीबाणी ते सांगा?

 

न्यायालयाची मुस्कटदाबी

 

आज कुठे विरोधकांना न्यायालयाच्या अधिकाराची मुस्कटदाबी झालेली दिसते? तसे असते तर वरवरा राव, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा यांना पोलीस कोठडी अपेक्षित होती. त्यांचा पूर्वेतिहासही महत्त्वाचा होता, मग यांना नजरकैद न्यायालयाने कशी दिली? ती आणीबाणीत देता आली नसती. आज शासनाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात पीआयएल टाकण्याची एक प्रथा सुरू झाली आणि खूपदा शासनाच्या निर्णयाविरुद्ध निकाल दिला जातो. हे आणीबाणी असती तर घडले असते काय? आज विरोधकांना शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात कुठेच नाव ठेवायला जागा नाही म्हणून हवेत वार करणे सुरू आहे. असे म्हणतात, झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागविणे कठीण असते. तसे यांचे आहे. यांचा नेता बोलतो, तेच हे बोलतात! मग ते खरे-खोटे तपासत नाही. तपासण्याची हिंमतही नाही. ‘नेता बोले दल हाले!’

 

खरी आणीबाणी आम्ही भोगली

 

२५ जून १९७५ ला आणीबाणी तुम्ही लागू केली. लाखो लोकांना अटक करीत असताना, आमच्या गुन्ह्याचा एक कागद, एक चिठ्ठा तुम्ही दिला नाही. आमचा काय गुन्हा आहे, हे विचारण्याचा अधिकार नव्हता. फक्त अटक वॉरंट असायचा, तोही आमच्या घरच्यांना दाखविला जात नव्हता! कोणत्या तुरूंगामध्ये नेणार, त्याचा उल्लेख नसायचा. तीन-तीन महिने घरच्या लोकांना आपली माणसं कुठे आहे, हे कळायला मार्ग नसायचा. खऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना पकडले, तर त्यांची मानसिक तयारी झालेली असायची पण, इथे तर काहीही पार्श्वभूमी नसताना उचलून न्यायचे, भीतीचे वातावरण सगळीकडे पसरले होते. प्रत्येकाच्या मनात भीती, मला तर नेणार नाही. ही आणीबाणी आम्ही भोगली. (१९७५ ते १९७७ ) २० महिने सहन केली. महिलांचाही समावेश राजकीय कैद्यांमध्ये होता. कशासाठी हे अटकसत्र? कशासाठी जीवघेणे अत्याचार? मला आठवतं, २४ नोव्हेंबर १९७५ ला मला पहाटे घरी अटक झाली. १० पोलीस, २ हेडकॉन्स्टेबल गाडी घेऊन आले व माझ्या घरच्या लोकांना कुठलाही कागद न देता मला अटक करून नेले. तीन-तीन खून केलेल्या महिलांच्या, नाशिकच्या सबजेलमध्ये खुनींच्या सान्निध्यात दोन दिवस होते. त्यात दोन पागल खुनी होत्या. दिवसभर त्याच माझ्या सान्निध्यात होत्या. रात्री ५०० पॉवरचे बल्ब माझ्या खोलीत लावायचे. रात्रभर झोपू द्यायचे नाहीत. जेवणात कच्च्या पोळ्या, ५४ पत्तीची भाजी, मुगाचे पाणी हे जेवण असायचे. ही ट्रीटमेण्ट अट्टल गुन्हेगारांसाठी होती, ती आम्हा राजकीय कैद्यांना दिली. इंग्रजांनाही लाजवेल एवढे भयावह वातावरण तुरूंगामध्येही होते. लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम त्या वेळी केले गेले. त्यानंतर मी उपोषण सुरू केले. नंतर मला पुणे कारागृहात पाठविले. तिथे धावस्पर्धेत भाग घेतला असता माझा हात फ्रॅक्चर झाला. तिथे समाजवादी, भाजप, इतरही महिला नेत्या होत्या. सर्वात लहान ‘मिसा’वाली मीच होते. मला दवाखान्यात पाठविण्याकरिता प्रयत्न सुरू झाले. माझा हात प्रचंड सुजला होता. प्रचंड वेदना होत होत्या तरी, तीन दिवस मला तसेच काढावे लागले. शेवटी महिला कारागृह व पुरुषांच्या कारागृहामधील लोकांनी उपोषण सुरू केले, तेव्हा चौथ्या दिवशी मला उपचारासाठी पाठविण्यात आले. कोणता गुन्हा होता आमचा? ना गाड्या फोडल्या, ना जाळपोळ केली, ना दगड मारलेत, ना खून केले. मग कुठल्या गुन्ह्याची एवढी कडक शिक्षा आम्हाला दिली गेली? घरी पत्र लिहिण्याचीसुद्धा मुभा आम्हाला सुरुवातीला नव्हती. अशी परिस्थिती इंग्रजांच्या काळात होती म्हणतात! सर्वात अत्यंत वाईट प्रसंग-हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग-एका सत्याग्रही महिलेच्या बाबतीत घडला. तिला तीन लहान मुले होती. तिचे पती हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. तिच्या सुटकेसाठी आम्ही प्रचंड प्रयत्न केले, परंतु तत्कालीन शासनाला जाग आली नाही. शेवटी आम्ही पर्याय शोधला व पे्रतच कारागृहापाशी आणले व तिला नमस्कारासाठी, तिच्या मुलांना भेटण्यासाठी कारागृहाचे दार उघडण्याचा आग्रह केला, परंतु तुरूंगाधिकाऱ्याने ऐकले नाही. आम्हाला तसा आदेश नाही म्हणून सांगितले. कुठे होती माणुसकी,कुठे होता मानवधर्म, जणू माणुसकीचाच खून झाला होता! तिला नमस्कारसुद्धा करायला मिळाला नाही. दरवाजाच्या फटीतून जे दिसले ते दर्शन! अशा माणुसकीलाकाळिमा फासणाऱ्या घटना इथे घडत होत्या! हे विरोधी पक्षांनी एकदा आठवून पाहावे. (आज तर तुम्हाला काहीही करण्याची मुभा असल्यासारखे कायद्याच्या चौकटीच्याबाहेर वागता) आम्ही, आमचे कुटुंब हे अत्याचार विसरू शकत नाही, विसरणार नाही. मनात कोरलेल्या जखमा कशा भरून शकतील? परंतु, पुन्हा अघोषित आणीबाणीच्या नावाखाली त्या जखमेवरची खपली निघाली, ते काढण्याचे कामही विरोधकांनीच केले. पुन्हा एकदा जखमांना वाचाफुटली.

 

माझी मैत्रीण सुमन पिंपळापुरे ही तर तीन वर्षांच्या मुलीला घेऊन आली होती. तिचे पतीही ‘मिसा’त होते. केवळ दोन मुली व एक मुलगा-सर्व १५ वर्षांच्या आतील होते. घरची परिस्थिती बेताची, कमविणारा तुरूंगामध्ये, आई तुरूंगामध्ये, मुले कशी जगणार? कुणाच्या भरवशावर जगणार? परंतु शासनाला त्या मुलांची, त्यांच्या जगण्याची काळजी नाही, कुठे मेली माणुसकी? यांनी आम्हाला माणुसकी शिकविणे कितपत योग्य आहे, हे मला सांगा? अधिकाराचा अतिरेक झाला होता. कुणी दिले होते हे अधिकार? मालतीबाई भागवत यांचे पोट दुखत होते म्हणून त्यांच्याकरिता औषध मागविले. त्यांनी गोळ्या पाठविल्या. तुरूंगाच्या दवाखान्यातून गोळ्या आल्या. त्या मी बघितल्या आणि माझं डोकं तडकलं. कारण त्या गोळ्या डोळ्यात टाकायच्या होत्या. अशा पद्धतीने आमच्या आरोग्याची थट्टा केली जायची. आमच्या जीवावर उठलेले लोक पाहायला मिळाले. औषधांची जाण नसलेले डॉक्टर होते तिथे. माझ्या पतीचा, सहा महिन्यांनी नागपूरला मला भेटायला येताना अपघात झाला. त्यांच्या पायाला प्रचंड दुखापत झाली. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले. मला निरोप मिळाला, परंतु मला जाता आलं नाही. मी स्वत: तब्येत दाखविण्याच्या निमित्ताने नाव नोंदवले, परंतु दोन दिवस परवानगी मिळाली नाही. शेवटी दोन दिवस अन्नत्याग केल्यानंतर नाव आले. नंतर मात्र मी डॉक्टरांनाच विनंती केली, “डॉक्टर, तुम्हीच यांची काळजी घ्या. मला येणे जमणार नाही.” विचार करा, माझी मोठी मुलगी १२ वर्षांची, दुसरी नऊ वर्षांची, मुलगा सहा वर्षांचा, मोठा वाडा, मी वनवासी समाजाची एक मुलगी दत्तक घेतली होती, ती १६ वर्षांची होती. अशा चार मुलांनी मिळून घर सांभाळले. तुम्ही स्वत:ला आमच्या जागेवर ठेवून विचार करा म्हणजे कळेल. अशी परिस्थिती आम्ही विरोधकांच्याबाबतीत निर्माण केली का? असे हाल आम्ही यांचे केले का? मग यांना आणीबाणीची दुर्बुद्धी कशी सुचली, हेच कळत नाही! ‘भविष्यातील आणीबाणी आणण्याचे (सत्ता आल्यावर) विराधकांचे स्वप्न तर नाही?’ हाच प्रश्न पडतो!

(क्रमश:)

- शोभा फडणवीस

(लेखिका राज्याच्या माजी मंत्री आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@