ठाण्यातील थीम पार्क व बॉलिवूड पार्क घोटाळा दाबण्याचा शिवसेनेचा प्रयत्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |

ठाणे : ठाण्यातील थीम पार्क व बॉलिवूड पार्कच्‍या घोटाळा प्रकरण दाबण्‍याचा शिवसेना व आयुक्‍तांकडून प्रयत्‍न होत असल्‍याचे चित्र सध्‍या ठाण्‍यात दिसत आहे. एकीकडे आयुक्‍त या घोटाळ्याचा केंद्रबिंदु असलेल्‍या नितिन देसाई या कंत्राटदाराला व आरोप असलेल्‍या मोहन कलाल यांच्‍या सोबत बंद दाराआड चर्चा करीत असून दुसरीकडे शिवसेनेच्‍या टेंबीनाका येथील देवीचा देखावा साकारणारे नितिन देसाई पालकमंत्री तसेच या घोटाळ्याची चौकशी करणा-या समिती सदस्‍य सभागृहनेते नरेश म्‍हस्‍के एकत्र राजरोजपणे दिसत असल्‍याने या प्रकरणात शिवसेना व आयुक्‍त कुणाला वाचवत तर नाही ना असा प्रश्‍न उपस्थित राहत असल्‍याचा थेट आरोप भाजपा नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केला आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी देखील या प्रकरणात शिवसेनेच्‍या भुमिकेवर प्रश्‍नचिन्‍ह उभे केले होते.

 

ठाण्यातील थीम पार्क व बॉलिवूड पार्क हे दोन्ही प्रकल्प सध्या प्रचंड चर्चेत व भ्रष्टाचाराच्या संशयामुळे वादात सापडले आहेत. थीम पार्क प्रकल्पाची स्थायी समिती सभेत चर्चा झाली त्यावर प्रसिद्धी माध्यमातून सविस्तर पणे कशा प्रकारे प्रत्येक कामाचे अंदाजखर्च वाढवून देण्यात आले व प्रत्यक्ष किंमत खूपच कमी हवी अशा बातम्या आल्या. त्यानंतर महासभेत वादळी चर्चा होऊन चौकशी समिती नेमण्याचा ठराव मंजूर झाला. त्यादिवशी सभागृहात आयुक्त स्वतः हजर नव्हते तरी त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन फक्त या विषयावर निवेदन दिले व फक्त अधिकारी नाही तर आमदार, सत्ताधारी शिवसेनेचे सभागृहातील काही पदाधिकारी पण यात सामील आहेत आणि त्यांनी पण चौकशीस तयार राहिले पाहिजे असे सांगून चौकशी करण्याचे मान्य केले. वास्‍तविक ४८ तासात ठराव करून चौकशी सुरु करायची हे ठरले असतांना सुद्धा सत्ताधारी शिवसेनेने ठरावच वेळेत केला नाही त्याच वेळी या भ्रष्टाचारात सत्ताधारी शिवसेना कोठेतरी जोडली असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त झाला. चौकशी समितीत सर्वपक्षीय नगरसेवक हवे असे देखील ठरले प्रत्यक्षात मात्र समितीत कोण आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे व समितीचे कामकाज सुरु होईल कि नाही हे मोठे प्रश्नचिन्ह आहे याप्रकरणात आयुक्त व शिवसेना नेमके कोणाला वाचवत आहेत असा प्रश्न भाजपा नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला आहे.
 

थीम पार्क व बॉलिवूड पार्क या प्रकरणात भ्र्रष्टचाराचे आरोप होत असताना तसेच याविषयी चौकशी प्रस्तावित असण्याच्या पार्श्वभूमीवर सल्लागार व ठेकेदार नितीन देसाई यांना, ज्या अधिकाऱ्यावर आरोप आहेत त्या मोहन कलाल यांच्या बरोबरच मा. आयुक्तांनी भेटणे हे मूळात प्रशासकीय आदबीला धरून नाही. चौकशी समितीने चौकशी दरम्यान ठेकेदारास सुनावणी देणे अपेक्षित आहे असे पायंडे असतांना एव्हढ्या मोठ्या आयएएस अधिकाऱ्याकडून अशी चूक होणे अपेक्षित नाही अशी अपेक्षा देखील पाटणकर यांनी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्षे, प्रत्येक वर्षी आनंद दिघे नवरात्रीचे डेकोरेशन पुण्याच्या दगडू हलवाई गणपतीच्या धर्तीवर किंवा अगदी तसेच करायचे. हि दिघे यांची प्रथा आताच्या शिवसेनेने मोडली असे दिसते. ज्या ठेकेदाराची चौकशी खुद्द शिवसेनेच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेते नरेश म्हस्के, सभापती राम रेपाळे समितीत बसून करणार आहेत त्या ठेकेदाराला भेटायचे पालकमंत्री, शिवसेना आमदार, म्हस्के यांनी टाळणे आवश्यक होते. नितीन देसाई हे एकटेच असे सेट उभारणारे नाहीत. त्यामुळे थीम पार्क व बॉलिवूड पार्क दोन्ही कामाच्या भ्रष्टाचारात शिवसेनेच्या दबावाखालीच आयुक्तांनी निर्णय घेतले का हे त्यांनी ठाणेकरांना सांगणे जरुरीचे आहे अशी अपेक्षा मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाचा कारभार पारदर्शी आहे असे प्रमुखांनी सांगणे आणि प्रत्यक्ष तसा विश्वास ठाणेकरांच्या मनात निर्माण करणे हे आता पालकमंत्री आणि प्रशासन यांची जबाबदारी आहे. असे सांगत पाटणकर यांनी आयुक्त व शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@