रिलायन्सच्या निवडीसाठी दबाव नव्हता : एरिक ट्रॅपियर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |


 

 
 
 
 
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारामध्ये भागीदार कंपनी नियुक्त करण्याबाबत आमच्यावर कोणताही दबाव, बंधन नव्हते. रिलायन्सची निवड आम्हीच केली होती आणि रिलायन्स डिफेन्सबरोबर केवळ १० टक्केच ऑफसेट गुंतवणुकीचा करार करण्यात आला असल्याचा स्पष्ट खुलासा डसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी केला. यामुळे राफेलवरून कित्येक दिवस सुरू असलेल्या वादंगाला आणि आरोप-प्रत्यारोपांना चोख प्रत्युत्तर मिळाल्याचे दिसत आहे.
 

एका आघाडीच्या फ्रेंच माध्यमसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये एरिक ट्रॅपियर यांनी राफेल व्यवहारासंबंधी सविस्तर माहिती दिली. रिलायन्सला काम देण्याच्या अटीवरच राफेल करार करण्यात आला, असा दावा गुरुवारी एका फ्रेंच वर्तमानपत्राने केला होता. या पार्श्वभूमीवर एरिक म्हणाले की, “भारतात संरक्षण खरेदी व्यवहारात ऑफसेट करार करणे कायद्याने बंधनकारक आहे. ऑफसेट करार बंधनकारक असला तरी प्रकल्पासाठी भागीदार म्हणून कोणाला निवडायचे ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. रिलायन्स समूहाशी भागीदारी करण्यासाठी आमच्यावर कोणतेही बंधन नव्हते. कंपनीने स्वत:च रिलायन्सला जॉईंट व्हेंचर-पार्टनर म्हणून निवडल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. रिलायन्स डिफेन्ससोबत केवळ १० टक्केच ऑफसेट करार करण्यात आला आहे. आता आमची कंपनी आणखी शंभर भारतीय कंपन्यांबरोबर बोलणी करत असून ३० कंपन्यांबरोबर भागीदारी निश्चितदेखील करण्यात आली असल्याचेही एरिक ट्रॅपियर यांनी स्पष्ट केले. राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी हे रोज या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आहेत. दुसरीकडे राफेलच्या मुद्द्यावर नेमकी भूमिका काय घ्यायची, यावरून विरोधी पक्षांमध्येही मतमतांतरे व त्यावरून गटतट निर्माण झाले आहेत. अशा तापलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर खुद्द डसॉल्ट एव्हिएशनच्या सीईओंनीच मुलाखतीत दिलेल्या या माहितीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@