त्यांच्याकडच्या शस्त्रांचे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |



सरसंघचालकांवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी लोकशाहीत करता येणे शक्य आहे. पण, ज्या नक्षल्यांचे समर्थन प्रकाश आंबेडकर करतात त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचे काय?

 

खरे तर आंबेडकरी चळवळीने समाजाला नेतृत्व करणा-या अनेक व्यक्ती दिल्या. केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातही आंबेडकरी चळवळीने नवे प्रवाह निर्माण केले. रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ ही यापैकीच काही नावे. नाकारता न येणा-या अन्यायातून निर्माण झालेली वेदना आणि वेदनेच्या सच्चाईतून निर्माण झालेल्या परिस्थितीत झगडण्याची ताकद, ही खरी आंबेडकरी चळवळीतील ऊर्जा. खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी जे केले तोदेखील एक प्रकारचा विद्रोहच होता. मात्र, बाबासाहेबांना मार्क्सपेक्षा बुद्ध जवळचा वाटला. बाबासाहेबांची स्वत:ची क्षमता इतकी अफाट होती की, संपूर्ण देशाला एकत्र बांधणारी घटना त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या साहाय्याने निर्माण केली. बाबासाहेब विद्रोही होतेच. गांधीजींनी जो संघर्ष दक्षिण आफ्रिकेत केला, त्याच प्रकारचा संघर्ष बाबासाहेबांना दुर्दैवाने आपल्याच समाजात व देशात करावा लागला. बाबासाहेब लढले, मात्र सनदशीर मार्गाची कास त्यांनी कधीही सोडली नाही. त्यांनी हिंसेचा मार्ग चुकूनही अवलंबिला नाही आणि हिंसेचे समर्थनही कधी केले नाही. आंबेडकरांच्या अंगभूत क्षमता आणि पयार्र्य देण्याची ताकद हेच यामागचे खरे कारण. हा सगळा संदर्भ पुन्हा देण्याचे कारण म्हणजे, बाबासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणा-या आणि त्यांचेच आडनाव लावणा-या प्रकाश आंबेडकरांनी जे क्लेषकारक उद्योग चालविले आहेत ते.

 
 
प्रकाश आंबेडकरांनी मोर्चा काढला. प्रकाश आंबेडकरांनी काढलेला हा पहिला मोर्चा नव्हता. अधूनमधून ते मोेर्चे काढतच असतात. आता मुद्दा असा की, नेमका ते कशासाठी मोर्चा काढतात? कुठल्याही समाजातील युवकांसमोर आज जे प्रश्न आहेत, ते आंबेडकरी विचारांचे अनुयायी असलेल्या तरुणांसमोरही आहेत. त्यांचे शिक्षणाचे हक्क, रोजगार अशा विषयांसाठी प्रकाश आंबेडकरांनी कधी मोर्चा काढल्याचे कोणालाही लक्षात नाही. मात्र, यावेळी त्यांनी जो मोर्चा काढला तो. रा. स्व. संघाच्या विरोधात. प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे आहे की, “रा.स्व. संघाकडे हत्यारे आहेत. शस्त्रपूजनाला जी शस्त्रे रा. स्व. संघ पूजनाला वापरतो त्याच्या आधारावर संघ हिंसा घडवून आणू शकतो.” सरसंघचालकांवर मोक्का लावला जावा, अशी अचरट मागणीदेखील त्यांनी करून टाकली आहे. शिक्षणाने वकील असलेल्या प्रकाश आंबेडकरांना पूजण्याची शस्त्रे आणि हिंसा करण्याची शस्त्रे यातील फरक कळत नाही, असे नाही. किंबहुना, ज्या नक्षलवाद्यांचे ते समर्थन करतात, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे या पूजनाच्या शस्त्रापेक्षा अधिक घातक आणि गंभीर आहेत, याची त्यांना कल्पना नाही, असेदेखील म्हणता येणार नाही. मात्र, माणसाने एकदा द्वेषाने आपले डोके भरून घेतले की, तो कुठल्या थराला जाऊ शकतो, याचे अस्सल उदाहरण म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांची सगळीच राजकीय कारकीर्द एक शोकांतिकाच. आडनावाचा वारसा त्यांच्याकडे, मात्र राजकारणाचे सगळे मार्ग रामदास आठवलेंकडे गेल्यामुळे प्रकाश आंबेडकरांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे असंबद्ध बोलण्यात आणि वागण्यात या माणसाचा सध्या कुणीही हात धरू शकत नाही. विधानसभेत एकही आमदार नसताना आणि लोकसभेत एकही खासदार नसताना प्रकाश आंबेडकर सरकार स्थापन करण्याची भाषा करतात. नुसते सरकार स्थापन नव्हे, तर पोलिसांच्या बदल्या करण्याच्या वार्ता करतात. अवघड प्रश्न विचारला म्हणून पत्रकारालाच अर्वाच्य भाषेत धमकाविणारेही प्रकाश आंबेडकरच! बाबासाहेबांच्या मोठेपणाच्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यात मोठमोठाली आमिषे दाखवून इस्लाम स्वीकारायची विनंती करण्या-या नवाबाची गोष्ट नेहमी सांगितली जाते. इथे तर ओवेसीसारख्या धर्मांध नेत्याशी प्रकाश आंबेडकरांनी सोयरीक जुळविली आहे. त्यांच्याबरोबर आता प्रकाश आंबेडकर तिसरी की चौथी आघाडी उघडण्याची व मोदींना हरविण्याची स्वप्ने पाहात आहेत.
 
 

बाबासाहेबांनी मार्क्स नाकारला होता. प्रकाश आंबेडकर माओवाद्यांचे समर्थक झाले आहेत. ‘भारत के तुकडे’ फेम जेएनयु गँगलाही प्रकाश आंबेडकरांचे खुले समर्थन आहे. लोकशाहीत मोर्चे काढायला हरकत नाही. सरकार बनवून आपली धोरणे राबवायला लोकशाहीतच वाव आहे, पण सरकार उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पाहणा-या नक्षल्यांचे समर्थन करायचे आणि लोकशाही मार्गाने निवडून येऊन पंतप्रधान होण्याचे स्वप्नही पाहायचे, अशा दोन गोष्टी एकाच वेळी करण्याचे उद्योग केवळ आणि केवळ प्रकाश आंबेडकरच करू शकतात. डावे, उजवे आणि भांडवलवाद याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरवादी विचारांचा एक विचारप्रवाह निर्माण केला. दुर्दैवाने बाबासाहेबांनंतर या समाजाला बाबासाहेबांइतके प्रभावी नेतृत्व लाभले नाही. ज्यांच्या हाती थोड्याफार सत्तेची पदे आली त्यांनीही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन उभे राहण्यातच धन्यता मानली. प्रकाश आंबेडकरांना सत्तेच्या पाय-या कधीच चढता आल्या नाहीत. मात्र, त्यांनी जे केले आहे त्यापेक्षा उफराटे अन्य काहीच असू शकत नाही. माणूस विद्वान असूनही योग्य दिशेने लढण्याची क्षमता नसल्याने प्रकाश आंबेडकर राजकीय क्षितिजावर धडपडतच राहिले. ज्या रिकामटेकड्या डाव्यांचा आज त्यांना आधार वाटतो, ती मंडळी निव्वळ पोकळ आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे यांच्याकडे लोकांच्या कुठल्याही प्रश्नासाठी लढण्याची तयारी नाही. मुद्दे नाहीत. कार्यकर्ते नाहीत. यांची सगळीच लढाई लुटूपुटूची असते. आंबेडकरी चळवळीतून जसा एक निराळा विचार नाणावला, तसेच स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात डाव्या विचारांची माणसेही उभी राहिली होती. यात डांगे होते, रणदिवे होते. मतांशी फारकत घेतली तरी त्यांचे योगदान नाकारता येत नाही. आता मोदी, संघ व ब्राह्मण यांच्याविरोधात जो अधिकाधिक गरळ ओकू शकतो, तो डाव्यांचा ‘मसीहा’ होतो. असा कुणी सापडला रे सापडला की, डावे देवदूत भेटल्याप्रमाणे आनंदतात. प्रकाश आंबेडकरांचे सगळे साथी तसेच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@