कौतुक स्वच्छ भारताचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |


स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे...” या उक्तीप्रमाणे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ’स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत व्यापक अभियान उभे राहिले. देशभरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे फलाट, रस्ते आणि सरकारी कार्यालयांमध्ये त्याची काटेकोर अंमलबजावणीही झाली. सुरुवातीला विरोध करणारे नंतर स्वतः झाडू घेऊन सफाईसाठी पुढे आले. ऑक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अवघ्या देशाला स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. पूर्वी रस्त्यावर, रेल्वे स्थानकात, सार्वजनिक वाहनांमध्ये सर्रास कचरा टाकणार्‍यांच्या मानसिकतेत थोडा का होईना बदल झाला. मात्र, स्वच्छतेसाठी ओळख असलेल्या जपान आणि त्याचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या अभियानाची दखल घेत भारताला ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत सहकार्य करण्याची तयारी दाखवली, हे विशेष...

 
 

देशातील कचरा सफाईपेक्षा नागरिकांच्या मनात हा देश आपले घर आहे, ते स्वच्छ ठेवायलाच हवे, ही भावना जितक्या लवकर रुजवता येईल, तितके चांगले. यासाठीच जपानने मदतीचा हात पुढे करण्यास तयारी दर्शवली आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात ‘स्वच्छ भारत’ साठी सर्वतोपरी मदत करण्यास जपान तयार असल्याचेही म्हटले आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या ‘महात्मा गांधी स्वच्छता परिषद’ (एमजीआयएससी) या कार्यक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. ‘एमजीआयएससी’ अंतर्गत जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी आणि प्रसाधनांच्या परिस्थितीत सुधारणा करणे, या परिषदेत या आव्हानांवर चर्चा केल्यास मार्ग निघण्यास मदत होईल, असा विश्वासही आबे यांनी व्यक्त केला. या परिषदेमुळे आशियाई देशांच्या स्वच्छतेबाबतच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास भारतासोबत जपानही कटिबद्ध आहे, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. भारताच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले महात्मा गांधी स्वच्छता संमेलन चार दिवस सुरू होते. संमेलनाच्या समारोपावेळी २ ऑक्टोबर २०१८ हा दिवस ’संमेलन स्वच्छता दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जगभरातील देशांचे स्वच्छतामंत्री, जल, स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे मंत्री व मान्यवर सहभागी झाले होते.

 
 

एकीकडे या अभियानाचा जगभर गौरव होत असताना बहुतांश लोकांची मानसिकता अद्याप तशीच आहे. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी आणि कचरा निर्मूलन’ या विषयांवर बोलणे सोडले तरीही अद्याप रस्ता, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबत लोकांमध्ये अनास्थाच दिसते. कचरा उचलणे, परिसर स्वच्छ करणे या कामांना कमी लेखून उलट कचरा करणारेच जास्त. याची उदाहरणे, पिचकार्‍या मारून रंगवलेल्या भिंती, रेल्वेस्थानके सुशोभित केल्यावरही ती अस्वच्छ करणारे प्रवासी, रस्त्यालाच कचराकुंडी समजणारी वृत्ती आजही आहेच. याउलट भारताचे कौतुक करणार्‍या जपानमध्ये स्वच्छतेची पाळेमुळे बालपणातच त्यांच्यावर रुजवली जातात. जपानमध्ये विद्यार्थी दरदिवशी किमान १५ मिनिटे साफसफाई करतात. पुढे आयुष्यभर ही सवय कायम राहावी यासाठी ही सवय लावली जाते. पाळीव प्राण्यांसोबत हिंडताना त्यांच्यासाठी त्याची विष्ठा जमा करण्यासाठी एक भांडे सोबत ठेवले जाते, अशा गोष्टी भारतात पाहायला मिळणे तसे कठीणच. इथे सफाई कर्मचार्‍यालाही ‘कचरावाला’ अशीच हाक मारली जाते. पण, जपानमध्ये सफाई कामगाराला ‘आरोग्य अभियंता’ हे पद आहे. त्याचा पगारही पाच ते आठ हजार डॉलर प्रतिमहिना इतका असतो. या पदासाठी तोंडी व लेखी परीक्षाही घेतली जाते. जपानवर प्रकृतीची मेहेरनजर तशी कमीच. भूकंप, पूर आदी घटनाही त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या. मात्र, त्यातूनही सावरून त्यांनी देशाचे स्थान जगाच्या पाठीवर कायम अढळ ठेवले आहे. शिंजो आबे यांनी दिलेल्या या प्रतिसादानंतर भारतातील सुजाण नागरिक म्हणून तरी जपानकडून काही चांगल्या गोष्टी आत्मसात करायला काहीच हरकत नाही. आपल्या मनातील ‘कचरा’ म्हणजेच कचरा करण्याच्या प्रवृत्तीचा नायनाट करण्याची खर्‍या अर्थाने गरज आहे. सर्व गोष्टी सरकारवर ढकलून देण्याऐवजी आपली जबाबदारी उचलून, ”मी कचरा करणार नाही,” इतकी प्रतिज्ञा घेतली तरी उत्तम.

 
- तेजस परब  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@