सामाजिक कार्यातून समाजपरिवर्तन शक्य : भैयाजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2018
Total Views |


 


मुंबई: सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सत्ता क्षेत्र या सर्व क्षेत्रांचा सांगड घातल्यास समाजाचा विकास शक्य आहे. सामाजिक कार्यातूनच समाजपरिवर्तन होत असते, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भारत विकास परिषद महाराष्ट्र प्रांत आणि समस्त महाजन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माण में समृद्ध वर्ग की रचनात्मक भूमीका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते. यावेळी रिद्धी सिद्धी बुकीयन्स लिमिटेडचे संचालक पृथ्वीराज कोठारी, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेशचंद्र गुप्ता, लक्ष्मी देवी डेव्हलपर्सचे प्रविणभाई जैन, महानगर संचालक सुरेशची भगेरीया, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी निवास जाजू, आ. मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सत्ता क्षेत्र या क्षेत्रांपैकी कोणत्याही एका क्षेत्रात बिघाड झाल्यास समाजाचे अधपतन होते. प्रत्येक क्षेत्राला सुयोग्य स्थितीत ठेवण्यासाठी त्यांचे नेतृत्व आणि ती त्या क्षेत्राची मोठी शक्ती आहे, असे भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले. या पाच क्षेत्रांचा सदुपयोग झाला तेव्हा आपण प्रगती केली आणि जेव्हा या व्यवस्थांचा दुरूपयोग केला गेला तेव्हा आपण मागे जात गेलो. धर्म क्षेत्राकडे पाहिले तर मठ मंदिर आपल्या हातात ठेवणारे त्या क्षेत्राला कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. साधू, संत, कथाकार, किर्तनकार , प्रवचनकार यांच्या माध्यमातून आपण पुढे जायला हवे. धर्म क्षेत्रात आज मोठे आव्हान आहे आणि ते आव्हान पार करून आपण परिस्थिती सुधारली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

 

सर्वाचा मिळून समाज बनतो

 

सामाजिक क्षेत्राकडे पाहिले तर सर्वांचाच मिळून समाज बनतो. समजात तयार होणारी संकुचित वृत्ती आणि मतभिन्नता हे अतिशय वेदनादायक असल्याचे भैय्याजी म्हणाले. यात आज नेतृत्वाची गरज आहे. कोणीही कोणाकडे बोट दाखवून किंवा इतरांना त्रास देऊन पुढे जाण्याची गरज नाही. जरी भाषा, जात, धर्माच्या आधारावर आपण वेगळे असलो तरी आपली विचारधारा एक आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपली नाळ एकमेकांशी जोडली गेली आहे. मात्र, आज काही समाजकंटक यात खोडा घालण्याचा प्रयत्न करित आहेत आणि त्याची प्रचितीही आपल्याला येत आहे. तरी एकात्मतेची भावना आपण जगवली पाहिजे आणि आपल्याला आज मनाने मोठे होण्याची गरज आहे. तसेच कोट्यवधी लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याची आपल्याला गरज असल्याचे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

 

परिश्रमाच्या मूल्यावरच आपला अधिकार

 

आपण परिश्रम करतो, परंतु त्या परिश्रमातून मिळणा-या मूल्यावरच आपला अधिकार असतो. आर्थिक क्षेत्रात परिश्रमाला महत्त्व आहे. देशाचा विचार करून आपण सर्वांनी आपले योगदान देत राहिले पाहिजे. आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने कार्य करणा-यांमुळे आज देशाची प्रगती झाली आहे आणि आपल्या देशाची हीच परंपरा आहे, असे भैय्याजी जोशी यांनी यावेळी नमूद केले.

समन्वयाशिवाय पर्याय नाही

अध्ययन क्षेत्राचा विचार करताना भैय्याजी जोशी यांनी मार्स्कचे उदाहण दिले. ते म्हणाले की पं. दीनदयाल उपाध्याय यांनी मार्क्सचे अध्ययन अपूर्ण असल्याचे म्हटले होते. त्याच्या अध्ययनात केवळ संघर्षाचा समावेश होता. मात्र, समन्वयाशिवाय अध्ययन पूर्ण होऊ शकत नाही. विद्वानांनी आपल्या समाजाच्या भल्यासाठी आपल्या विद्वत्तेचा वापर केला पाहिजे. आज अनेक जण आपल्या विद्वत्तेचा समाजात, राजकारणात द्वेश पसरवण्यासाठी उपयोग करित असतात. मात्र, समाजाचा सर्वांगिण विकासासाठी विद्वत्तेचा वापर केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

 

कला क्षेत्र समाजाचे दिशादर्शक

 

कला क्षेत्र हे समाजाचे दिशादर्शक आहे. कलाकारांनी समाजाच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. समाजाला दिशा देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांपैकी कला क्षेत्र हे एक आहे. सकारात्मक कला ही समाजाला योग्य दिशेने घेऊन जात असते, असे भैय्याजी यावेळी म्हणाले.

 

प्रामाणिक सत्ताधा-यांमुळे देशाचा विकास

 

आजच्या काळात राजकारणीच सर्वेसर्वा आहेत ही आपली आणि त्यांचीही धारणा झाली आहे, हे आपण आणि त्यांनीही मानले आहे. अनेकदा समाजाची सेवा करण्यासाठी मते मागण्यासाठी आपल्या घरी हे लोक येत असतात. मात्र, ती व्यक्ती हरली तर त्यांच्या मनातून समाजसेवा निघून जाते. अशीच काहीशी स्थिती जिंकून आलेल्या लोकांचीही असते. परंतु राजकारणात काही प्रामाणिक लोकही आहेत, हे विसरून चालणार नाही. प्रामाणिक काम करणा-या सत्ताधा-यांमुळेच देशाचा विकास झाला असल्याचे ते म्हणाले. आज आपण प्रत्येक क्षेत्रात विकास केला तरच आपली प्रगती होऊ शकते हे आपण जाणले पाहिजे. श्रमाला पर्याय नाही आणि श्रमालाही सन्मान आहे हे आपण जाणले पाहिजे. सर्व सामाजिक आणि धार्मिक नेतृत्व एकत्र आल्यानंतरच हे शक्य होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

देश म्हणजे आपली माता

 

आपला देश ही आपली माता आहे ही आपली भूमिका आहे. जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हाच आपण भारत माता की जयचा जयघोष करतो. आपण या भारतमातेचे सुपुत्र आहोत हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. मात्र, आज आपल्या देशात असेही काही लोक आहेत जे भारत माता की जय बोलायलाही तयार होत नाहीत. समाजाच्या, देशाच्या विकासासाठी देशाला आई म्हणून तिची काळजी घेणारेच जबाबदार असल्याचे भैय्याजी म्हणाले. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे आहोत आणि देशाच्या विकासासाठी हातभार लावण्यात आपण कधी ना कधी वाटा उचलला असेलच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाला माता म्हणणाराच या देशाचा खरा सुपुत्र आहे. आपण या देशाचे एक घटक आहोत हे आपण जाणले पाहिजे. देशातील सशक्त नाही तर देशातील अशक्य घटक ही देशाची ताकद मानली पाहिजे. कारण त्यांच्या नव्या गोष्टी शिकण्याला आणि करण्याला वाव असतो. सर्वच देशाच्या विकासात आपले योगदान देत असतात आणि सशक्त भारताच्या रूपाने पुढे येत असतात. २०२० साली भारत हा सुपर पावर बनेल असे सर्व म्हणतात. पण भारत हा सुपर राष्ट्र बनला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

@@AUTHORINFO_V1@@