राहुल गांधींसमोरील आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

निवडणूक आयोगाने छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राजकीय हालचालींना आता अधिकच वेग आला आहे. या निवडणुका देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या, तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या दृष्टीने या निवडणुका अस्तित्वाची कसोटी पाहणार्या ठरणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांनी कोणाला दिवाळी करण्याची संधी मिळते आणि कोणाचे दिवाळे निघते, याचा निर्णय 11 डिसेंबरला होणार्या मतमोजणीने होणार आहे.
 
भाजपा आणि कॉंग्रेस या दोघांनीही या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या पाचपैकी छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे, तर मिझोरमध्ये कॉंग्रेसची. 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेतील सत्ता कॉंग्रेसने कायम ठेवली, तरी त्याचा देशाच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण मिझोरम हे ईशान्य भारतातील अतिशय छोटेसे असे राज्य आहे. मात्र, मिझोरमधील सत्ता गमावली तर मात्र कॉंग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. कारण सध्या देशातील फक्त अडीच राज्यांतच कॉंग्रेसची सत्ता आहे. यात पंजाब, मिझोरम आणि कर्नाटकचा समावेश आहे. कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला. कुमारस्वामी सरकारमध्ये कॉंग्रेस दुय्यम भूमिकेत आहे. त्या अर्थाने कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची अर्धीच सत्ता आहे.
अशा स्थितीत मिझोरमसारखे राज्य गमावणेही कॉंग्रेसला अतिशय महागात पडू शकते. दुसरीकडे ईशान्य भारतातील सातपैकी सहा राज्यांत सध्या भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. मिझोरमची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण तयारी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि ईशान्य भारताचे प्रभारी राम माधव त्या दृष्टीने कामालाही लागले आहेत. त्यामुळे मिझोरमची निवडणूक यावेळी कॉंग्रेससाठी सोपी राहिलेली नाही.
 
 
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाचे डॉ. रमणिंसह, मध्यप्रदेशात शिवराजिंसह चौहान, तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहे. छत्तीसगडमध्ये डॉ. रमणिंसह आणि मध्यप्रदेशात शिवराजिंसह चौहान मागील 15 वर्षांपासून सत्तेत आहेत. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे पाच वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणूक लक्षात घेता या तीन राज्यांतील सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे.
 
 
या तीनही राज्यांतील सत्ता भाजपाने आपल्याकडे कायम ठेवली, तरी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार करून कामाला लागलेल्या भाजपाचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला मिळू शकतो. मात्र, यातील एकही राज्य भाजपाने गमावले तर त्याचा संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांवर नसला, तरी संबंधित राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर काही प्रमाणात निश्चित परिणाम होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही याची जाणीव आहे. त्यामुळे मोदी आणि शाह किमान या तीन राज्यांतील विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने आपल्या प्रयत्नात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत, याबाबत शंका नाही.
अमित शाह यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. या तीन राज्यांत भाजपाने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले असले म्हणजे कायम ठेवले असले, तरी या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, त्यांच्या नावावर आणि त्यांच्या कामावरच लढवल्या जाणार आहेत. या तीन राज्यांत भाजपाच्या दृष्टीने ही सर्वात जमेची बाब म्हणावी लागेल. एकदा पंतप्रधान मोदी प्रचाराच्या मैदानात उतरले की, देशातील कोणताच राजकीय पक्ष भाजपाला पराभूत करू शकत नाही, अशी भाजपाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खात्री आहे. निवडणुकीच्या मैदानात आत्मविश्वास आवश्यक असला, तरी अतिआत्मविश्वास अनेकवेळा धोकादायक ठरत असतो. दुसरीकडे प्रचाराचा सर्व भार पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सोडून, तळागाळातील कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात रिलॅक्स होणे योग्य ठरणार नाही.
 
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत खरी सत्त्वपरीक्षा पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची नाही, तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची होणार आहे. अमित शाह यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून आतापर्यंत जवळपास दीड डझनावर राज्यांतील निवडणुका भाजपाला जिंकून दिल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक यशस्वी अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा वारंवार उल्लेख करत असतात. मात्र, त्याउलट राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून एकही निवडणूक कॉंग्रेसला जिंकून दिली नाही. अमित शाह यांनी दीड डझनावर राज्यं जिंकली याचा दुसरा अर्थ, कॉंग्रेसने आपली तेवढी राज्यं गमावली.
 
 
 
राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. यातील हिमाचल प्रदेशातील आपली सत्ता कॉंग्रेसला गमवावी लागली, तर कर्नाटकात कॉंग्रेसने जनता दल सेक्युलरसमोर शरणागती पत्करत कशीबशी आपली इज्जत वाचवली. पंजाब विधानसभा निवडणूक कॉंग्रेसने जिंकली असली, तरी त्यात राहुल गांधी यांचे कोणतेही योगदान नाही. पंजाब विधानसभा निवडणूक जिंकण्याचे पूर्ण श्रेय कॅप्टन अमरिंदरिंसग यांना आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर मिझोरमधील आपली सत्ता टिकवण्यासोबत छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाकडून सत्ता हिसकवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, राहुल गांधी यांची आतापर्यंतची कामगिरी पाहता ते त्यांच्यासाठी कठीणच नाही तर अशक्य आहे.
राहुल गांधी यांची प्रतिमा, वारंवार निवडणुकीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारा विद्यार्थी, अशी आहे. देशातील सद्य:स्थिती पाहता, आपल्या पक्षाला जिंकून देणे तर दूर, पण स्वत: राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशच्या अमेठी आणि रायबरेली येथील आपल्या जागा कायम ठेवल्या तरी खूप, असे म्हणावे लागेल. राहुल गांधी यांच्या अशा प्रतिमेमुळेच आज देशातील कोणताही राजकीय पक्ष कॉंग्रेसशी आघाडी करायला तयार नाही. ज्या पक्षाच्या नेत्याची स्वत:च्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासोबत मित्रपक्षाला फायदा करून देण्याची क्षमता असते, त्या पक्षाशीच अन्य पक्षही आघाडी करायला तयार असतात.
भाजपासोबत आज जवळपास दोन डझन पक्ष आहेत, याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या बळावर आपल्या पक्षाच्या खासदारांना तर निवडून आणतात, पण सोबत मित्रपक्षाच्या उमेदवारांना जिंकून देण्यातही मोठे योगदान देत असतात.
 
 
राहुल गांधी यांच्याजवळ अशी क्षमता नसल्यामुळे, बसपा आणि सपासारखे पक्ष त्यांच्यापासून दूर पळत आहेत. तरीसुद्धा मित्रपक्ष तयार असले तर पंतप्रधान व्हायची आपली तयारी असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात, तेव्हा त्यांचे कौतुक करावेसे वाटते. जे मित्रपक्ष कॉंग्रेससोबत आघाडी करायला तयार नाही, ते आपल्याला पंतप्रधानपदासाठी कसा पाठिंबा देतील, असा प्रश्नही राहुल गांधी यांना का पडत नाही, याचे आश्चर्य वाटते.
राहुल गांधी आपल्या बोलण्याने आणि वागणुकीने देशातील जनतेचे वारंवार मनोरंजन करत असतात, त्यामुळे तर विधानसभा निवडणुका होत असलेल्या तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ‘देशातील सर्वात मोठा विदूषक!’ असा केला. राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कॉंग्रेसला एखाद्दुसर्या राज्यातही जिंकून दिले नाही, तर पंतप्रधानपदाचे स्वप्न तर दूरच, पण कॉंग्रेसचे अध्यक्षपदही कायम ठेवणे त्यांना कठीण जाईल. कारण कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हारणार्या नाही तर जिंकणार्या घोड्यावर पैसे लावत असतात.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@