अत्याचारपीडितांसाठीचा ‘देवदूत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |
 
 

लैंगिक अत्याचारपीडितांसाठी न्यायाची लढाई सुरू केलेल्या ६३ वर्षीय नोबेल पुरस्कार विजेते डॉ. डेनिल मुकवेगे हे त्यांच्या कार्याद्वारे अत्याचाराविरोधात लढा देणार्‍यांसाठी एक पथदर्शी ठरले आहेत.

 
लैंगिक अत्याचाराविरोधात सध्या समाजमाध्यमांवर सुरू झालेल्या ‘हॅशटॅग मी टू’ या मोहिमेतून सध्या बॉलिवूडमधील प्रकरणे नव्याने उघडकीस येत आहेत. काहीजण समर्थनार्थ तर काहीजण त्याविरोधात आपापली मते मांडतही आहेत. त्यातच समाजमाध्यमांवरील या ’मालमसाल्या’चा प्रसिद्धी माध्यमेही ‘टीआरपी’साठी चांगलाच वापर करून घेत आहेत. मात्र, दुसरीकडे या सार्‍या गोष्टीत अत्याचारपीडितांसाठी झटणार्‍या एका स्त्रीरोग तज्ज्ञाला वयाच्या ६३व्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात येते ही या एका नाण्याची दुसरी बाजू ठरेल. डॉ. डेनिल मुकवेगे जागतिक पातळीवर स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात लढणारे एक स्त्रीरोग तज्ज्ञ. युद्धात स्त्रियांवर केल्या जाणार्‍या लैंगिक हिंसाचाराविरोधात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने लढा दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पीडितांना न्याय देण्यासाठी आयुष्य वेचणार्‍या या अवलियाचा झालेला सन्मान हा लैंगिक हिंसाचाराविरोधात सुरू झालेल्या लढ्यातील एक मोठा विजय आहे. यंदा शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी ३३१ नावे आली होती. त्यात २१६ व्यक्ती आणि ११५ संस्था होत्या. त्यातून लैंगिक अत्याचारविरोधात काम करणार्‍या नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मुकवेगे यांना नोबेल पुरस्कार मिळाला हे विशेष. 
 
 
डॉ. डेनिस मुकवेगे हे मुळचे ‘डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ कांगो’मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सुमारे ३५ हजार बलात्कार पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी काम पाहिले आहे, अशा घटनांतील पीडितांचे समुपदेशन आणि उपचारांचे ते विशेषज्ज्ञ आहेत. कांगोमध्ये सुरू असलेल्या धर्मांध युद्धामध्ये अनेक महिला बलात्कार, शोषण आदींच्या शिकार बनल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धानंतरही सर्वात मोठ्या संघर्षाला सामोरा गेलेला देश म्हणजे कांगो. सुमारे ५० लाख नागरिक या युद्धाचे बळी ठरले. लाखो लोक भूकबळी गेलेला हा देश. सगळीकडे राखरांगोळी झालेली असताना त्यातूनच एखाद्या देवदूतासारखी अविरत सेवा बजावत राहण्यासाठी अंगात एक दैवीशक्तीच असावी लागते. याची प्रचिती त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान येते. कांगोमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी एक रुग्णालय सुरू केले होते. युद्ध सुरू झाल्यावर झालेल्या हल्ल्यात संपूर्ण रुग्णालय उद्ध्वस्त झाले. हल्ल्यात रुग्णालय कर्मचारी आणि रुग्णांसह ३५ जण ठार झाले. या धक्क्यातून सावरून त्यांनी बुकाबू येथे युद्धातील जखमींना उपचारासाठी तंबू ठोकून रुग्णालय सुरू केले. त्याच ठिकाणी शस्त्रक्रीया विभाग आणि प्रसुतिगृह सुरू केले. मात्र, १९९८ मध्ये युद्धात पुन्हा सर्व उद्ध्ववस्त झाले. तरीही ते हरले नाहीत. १९९९मध्ये पुन्हा सर्व सुरू केले आणि सुरू झाले पीडितांना आधार देण्याचे कार्य...१९९९मध्ये त्यांच्याकडे आलेल्या पहिल्या पीडित महिलेच्या दोन्ही मांड्यांवर गोळ्या घातलेल्या होत्या. युद्धातील जखमी समजून डॉ. मुकवेगे यांनी उपचार सुरूही केले. पण अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार काही मिनिटांत उघडकीस आला. या पीडित महिलेप्रमाणे सुमारे ४०-४५ महिला त्यांच्याकडे आल्या. युद्धातील यौनहिंसेच्या शिकार ठरलेल्या. युद्ध केल्यानंतर ते नराधम रात्रीच्यावेळेस संपूर्ण गावावर हल्ला करून महिलांवर अत्याचार करत. या सर्वांवर उपचार करतानाची रात्र त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
 
 

 
 
 
 
डॉ. मुकवेगेंतची उपचार करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. उपचारासाठी पीडितेची मानसिक तयारी कितपत आहे, याची तपासणी करून त्यानंतर ते पीडितेवर शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेच्या देखभालीचीही विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या आहाराची औषधांचीही व्यवस्था रुग्णालयामार्फत केली जाते. पीडितेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर अत्याचाराविरोधात लढाईसाठी पीडितेला कायदेशीर मदतही ते करतात. या कामामुळे त्यांचे विरोधकही तितक्याच वेगाने वाढत गेले आणि शत्रूही...परदेश दौर्‍याहून परतत असताना पाचजण ‘एके-४७’ रायफल घेऊन त्यांची वाट पाहत उभे होते. गाडीत बसल्यावर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी डॉ. मुकवेगेंनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षारक्षकावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यांची गाडीही हल्लेखोरांनी पळवली. त्यातून कसाबसा जीव वाचवत त्यांनी घर गाठले, अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणारत समाजकार्य थांबवणारे ते मुळीच नव्हते.
 
 
 
कांगो देशातील महिलांच्या लढवय्येपणामुळेच त्यांना या कार्यासाठी बळ मिळते,” असे डॉ. मुकवेगे म्हणतात. “शोषणाविरोधात मदत करणे ठीक पण, समोरच्याविरोधात बोलण्यासाठी तयार होणे, कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी मोठी हिंम्मत लागते. ती येथील महिलांमध्ये आहे आणि त्यातूनच या कामासाठी बळ प्रेरणा मिळते,” असे डॉ. मुकवेगे यांचे मत आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पीडितांसाठी लढा देणार्‍या या अवलियाचे काम जगासाठी प्रेरणादायी आहे. आंतरराष्ट्रीय कायदे देशात लागू करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचल्याबद्दल त्यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे. ओस्लो शहरामध्ये येत्या दि. १० डिसेंबर रोजी त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. युद्धात लैंगिक अत्याचार एक शस्त्र म्हणून वापर करणार्‍याविरोधातील लढाई सुरू ठेवल्याबाबत केलेला त्यांचा गौरव आणि त्यांचे कार्य हे अनेकांसाठी पीडितांसाठी प्रेरणादायी आहे.
 
 
- तेजस परब 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@