तिचा सांस्कृतिक वारसा भाग-२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018   
Total Views |


 

मातृत्व : स्त्रीजीवन सुंदर व समृद्ध करणारा सांस्कृतिक वारसा...


मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. नवीन बाळाचा जन्म केवळ मातेसाठीच नाही, तर कुटुंबासाठी व समाजासाठीसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. सुदृढ बाळ आणि निरोगी माता हे समाजाच्या प्रगतीचे लक्षण मानले गेले आहे. स्त्रियांसाठीच्या अनेक परंपरा मातृत्वाशी संबंधित आहेत.

 

आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एक असे १६ संस्कार सांगितले आहेत. या संस्कारांपैकी, काही संस्कार पती आणि पत्नीला आरोग्यपूर्ण व तणावमुक्त पालकत्वाकडे घेऊन जातात. ‘गर्भाधान’ हा त्यापैकी पहिला संस्कार. लग्नानंतर आणि अपत्यप्राप्तीच्या आधी केला जाणारा संस्कार. या संस्काराचा मूळ उद्देश-पतीने पत्नीकडून तिच्यापासून संतान निर्मितीसाठी परवानगी मागणे असा होता. मधल्या काळात या संस्कारात अति जास्त डामडौल आला, खर्च, आहेर असले काय काय प्रकार आले आणि त्याला विरोध होऊन ही प्रथा जवळजवळ बंद पडली. ‘सीमंतोन्नयन’ हा गर्भारपणात केला जाणारा एक संस्कार. यामध्ये, पती गर्भवती पत्नीचे केस विंचरून, भांग पाडून, वेणी घालून देतो. गर्भवतीचे कौतुक करणे, तिचा उत्साह टिकवणे, गर्भारपणात तिला आनंदी ठेवणे आणि तिच्याकडे आपले लक्ष आहे, हे अधोरेखित करणारा हा एक लहानसा संस्कार. तर, प्रसूतीच्या आधी, ‘सोष्यन्तिकर्म’ या संस्कारात पती वाहत्या पाण्याच्या स्त्रोतातून, पाणी भरून आणतो. व ते पाणी पत्नीभोवती शिंपडून प्रार्थना करतो की, “हे पाणी जसे सहज वाहत होते, तसा तुझ्यातील गर्भ, तुला कष्ट न होता, सहज बाहेर येवो.”

 

गरोदर स्त्रीचे मन प्रसन्न करणाऱ्या या संस्कारांबरोबरच, डोहाळ जेवणाची परंपरा जुनी आहे. स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेला वारसा. सहा महिन्यानंतर जेव्हा गरोदर स्त्रीला अधिक आहाराची गरज असते आणि भूकसुद्धा लागते, त्या काळात सासर-माहेरच्या आप्त भगिनी, मैत्रिणी जेवायला बोलावतात. तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घालतात. बागेत नेऊन, नावेत बसवून, झुल्यावर बसवून, चंद्राच्या मखरात बसवून, तिला फुलांच्या माळांचे दागिने घालून, सजवून हा कार्यक्रम केला जातो. डोहाळ जेवणाची गाणी म्हणून गर्भवतीचे मन रिझवणे हा पण त्याचा एक भाग. तिला हिरवी साडी, हिरवा चुडा देतात. एकूण हेतू असा की, गरोदर स्त्रीला उत्साह वाटावा, आरोग्य लाभावे आणि ती आनंदात राहावी.

 

गौतम बुद्धाची आई माया, गरोदर असताना तिच्या सख्या तिला डोहाळ जेवणासाठी सजवत आहेत. डावीकडे ती खुर्चीत बसली असून, कोणी तिच्या पायात दागिने घालत आहे, कोणी वस्त्र, कोणी दागिने घेऊन आल्या आहेत. उजवीकडे तिचा पती, राजा शुद्धोधन सीमंतोन्नयन संस्कारासाठी आला आहे. अमरावती येथील दुसऱ्या शतकातील शिल्प. बाळाच्या जन्मानंतर बाळंतिणीसाठी शेक-शेगडी, मालिश आणि विशेष आहार हा सुद्धा स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेला वारसा आहे. नवजात बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठीचा हा खास आहार. या आहाराने गरोदरपण व बाळंतपणात झालेली आईच्या शरीराची झीज भरून येण्यास मदत होते. कंबरदुखीवर उपाय होतो, रक्त शुद्ध होते, गर्भाशय स्वच्छ होते आणि बाळासाठी भरपूर दूध तयार होण्यास मदत होते. या पारंपरिक आहारात समाविष्ट आहेत- डिंकाचे लाडू, अळिवाचे लाडू, अळिवाची खीर, मेथीचे लाडू, बदामाचा शिरा, खारीक, बाळंत शेपा, लोणकढी तूप, मेथीची भाजी, शेपूची भाजी, शतावरी इत्यादी आहार.

 

बाळाचे बारसे, हे पण मुख्यत्वे करून स्त्रियांचाच वरचष्मा असलेला संस्कार. बाळाची आई, दोन्ही आजी, आत्या, काकू, मावशा यांची बारश्यात कोण धावपळ! पाळणा सजवून, बाळाला त्यात निजवून, पाळणा म्हणून, गाणी गात होणारा हा कार्यक्रम. बाळाचे नाव ठेवणे, हा तर खास आत्याचा अधिकार! घरात ज्या स्त्रिया बाळाला सांभाळणार त्यांची आणि नवीन बाळाची गट्टी जमते ती इथे! मातृत्वाच्या प्रवासाला निघालेल्या आपल्या नायिकेच्या हातात आता पाळण्याची दोरी येते. बाळाला मोठं करायची जबाबदारी घेऊन येते. या टप्प्यावरदेखील वारसाच तिला साथ देतो, दिवसा बाळाला रिझवायला बडबडगीते आणि रात्री झोपवायला अंगाई देतो!

 

माझ्या आईने, मावशीने आणि नंतर आम्ही बहिणींनीदेखील लेकरांसाठी म्हटलेल्या एका अंगाईच्या काही ओळी-

 

ये गं तू गं गायी, वेळ झाली संध्याकाळ ।

खोळंबले माझे बाळ, दुधासाठी ॥

माझ्या गं सोनू बाळाचे, गोडसं जेवण ।

दुधाला विरजण, साखरेचे ॥

माझी गं तान्ही बाळ, तेला-हळदीने नहाते ।

त्याचे पाणी जाते, शेवंतीला ॥

माझे गं सोनू बाळ, खेळ खेळूनी दमले ।

विसाव्याला आले, आईपाशी ॥

अंथरूण केले, पांघरुनी शेला ।

निजविते तुला, तुझी आई॥

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@