राजाचे नाक कापणारे माकड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 

जसे राहुल गांधींना रोज नव्या नव्या आकड्यांचे स्वप्न पडते, तसेच राऊतांचे! आताही संजय राऊतांनी राफेल घोटाळा बोफोर्स घोटाळ्याचा बाप असल्याचे असंबद्ध विधान केले. अर्थात, भाजपविरोधासाठी काँग्रेसचा मुका घेत ‘जिंकलंस भावा’ अशी साद घालणाऱ्या संजय राऊतांना याशिवाय निराळे काही येण्याची शक्यता नाही, हेही खरेच.

 

एक प्रसिद्ध कहाणी आहे. एकदा एक राजा आपल्या अवतीभवती सतत घोंघावणाऱ्या माशांमुळे त्रस्त होतो. तेव्हा या माशांना मारण्यासाठी राजा एक माकड पाळतो. राजाजवळ माशा आल्या की, पाळीव माकड त्यांना हाकलण्याचा प्रयत्न तर करतेच, पण राजा जसे हातवारे, हावभाव करे, तसेच अनुकरणही करू लागे. कधी हे पाळीव माकड राजाला तलवार चालवताना पाही, तर कधी भाला. एके दिवशी राजा झोपलेला असताना नेमकी राजाच्या नाकावर माशी बसते आणि तलवार चालविण्याचे अनुकरण करणाऱ्या माकडाला चेव चढतो. माकड त्याच भरात राजाच्या नाकावरील माशी मारण्यासाठी सरळ तलवार उगारतो आणि... हाय रे... माशी जगली-मेली माहिती नाही, पण माकडाच्या तलवारीच्या वाराने राजाचे नाक मात्र कापले जाते. कहाणी इथे संपते. इथे ही कहाणी देऊन आम्हाला काही सुचवायचे नाही, पण शिवसेनेत सध्या जे काही चालले आहे, ते पाहता ही कहाणी आठवल्याशिवाय राहत नाही.

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदी व्यवहारावरून केलेल्या आरोपांचा खुळखुळा वाजवण्याचा प्रकार सध्या काँग्रेससह सर्वच विरोधक करताना दिसतात. सत्तेत राहून, सत्तेच्या सगळ्या लाभांची चव चाखणारी आणि वर पुन्हा नाक वर करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पाण्यात पाहणारी शिवसेना तरी यात कशी मागे राहील, तेही संजय राऊतांसारखा बेभान माणूस सेनेत असताना? शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना भाजपविरोधात उगाळायला एखादा मुद्दा मिळाला की, त्यांच्या अंगात हत्तीचे बळ वगैरे संचारल्यासारखे वाटते. आताही त्यांनी बालिशपणात अव्वल असलेल्या राहुल गांधींशीच आपली तुलना होऊ शकते, हे सिद्ध करत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून बेछूट आरोपबाजी करण्याचा सपाटा लावला. जे झालेच नाही, ते झाले असे दाखवून देण्याचा संजय राऊतांचा अट्टाहास असा की, आपण नेमके काय बोलत आहोत, हे वास्तवाशी ताडून पाहण्याचे भानही त्यांना राहिले नाही. म्हणूनच राफेल विमान खरेदी व्यवहारात प्रत्येक विमानामागे ७०० ते १ हजार कोटींचा घोटाळा झाला, म्हणण्यापासून रोज नवनव्या आकड्यांचा मटका फोडायला राऊतांनी सुरुवात केली. जसे राहुल गांधींना रोज नव्या नव्या आकड्यांचे स्वप्न पडते, तसेच राऊतांचे! आताही संजय राऊतांनी राफेल घोटाळा बोफोर्स घोटाळ्याचा बाप असल्याचे असंबद्ध विधान केले. अर्थात भाजपविरोधासाठी काँग्रेसचा मुका घेत ‘जिंकलंस भावा’ अशी साद घालणाऱ्या संजय राऊतांना याशिवाय निराळे काही येण्याची शक्यता नाही, हेही खरेच.

 

शिवसेनेत मुळात बाळासाहेबांनी आक्रमकता रुजवली मात्र ती फक्त त्यांनाच शोभायची. अर्थात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे राजकारण आणि आताचे राजकारण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता इकडे-तिकडे टिवल्या-बावल्या करणार्‍यांनाही आपण बाळासाहेबांसारखे असल्याचे वाटते व त्यांच्याकडून स्वतःला आक्रमक असल्याचे भासवण्याचा खेळही खेळला जातो. दुसरीकडे जनतेला दररोज भेडसावणारे प्रश्न, समस्या, अडचणींबाबत आक्रमक असणे चुकीचे नाहीच, पण ज्याचा संबंध थेट देशाच्या सुरक्षेशी आहे, त्याबाबत आक्रमक होऊन चालत नाही. पण, ‘महापौर आमचाच’ म्हणत गल्लीत दादागिरी करत वावरणाऱ्या शिवसेना नेत्यांना अन् शिवसेनेला हे कोण सांगणार? शिवाय शिवसेनेत सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक बोलतात की खा. संजय राऊत, अशी स्पर्धा लागल्याचेही गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींवरून दिसते. मात्र, आक्रमकतेचा कितीही आव आणला तरी दोघांचीही प्रतिमा आक्रमक नव्हे, तर हास्यास्पद झाल्याचेच वेळोवेळी समोर आले. ज्या कोणत्याही वेळी उद्धव ठाकरे वा संजय राऊतांनी अशा प्रकारचे एखादे विधान केले, त्यावेळेपासून सोशल मीडियासह सगळीकडेच हास्याचा बार उडाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. यातूनच शिवसेनेची वाटचाल ‘चिवसेने’कडे झाली. परिणामी, शिवसेनेला कोणीही गांभीर्याने घेईनासे झाले. आताही राफेल विमान खरेदी व्यवहारावरून घोटाळ्याचा आरोप करून शिवसेनेने आपले ‘चिवसेनेत्व’ दाखवून दिले. त्याचीही काही कारणे आहेतच.

 

प्रादेशिक पक्षात पहिल्या-दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे सत्ता गेल्याचे शिवसेनेव्यतिरिक्त जगात अन्य कोणतेही उदाहरण नाही. एका मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या जोरावर टीचभर माणसे किती मस्ती करू शकतात, याचे जिवंत उदाहरण शिवसेनेच्या रूपात आपल्याला दिसते. याच मुंबई महापालिकेतल्या सत्ता अन् सत्तेतून आलेल्या मस्तीच्या जीवावर ठाकरे पिता-पुत्र अन् संजय राऊतांचे सोंग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारविरोधात कमालीचा द्वेष पसरविताना दिसतात. पण, मोदीद्वेषाने तना-मनाची कितीही लाही लाही झाली तरी सत्तेतून बाहेर पडण्याचा खराखुरा आक्रमक निर्णय मात्र कधी घेत नाही. कारण, या तिन्ही सोंगाड्यांना चांगलेच माहितीय की, सत्तेतून बाहेर पडलो तर गेल्या चार-साडेचार वर्षांत कसेबसे सांभाळलेल्या ‘शिवसेना’ नामक वगनाट्यावर पडदा पडेल आणि राज्यातले व केंद्रातले मंत्री, आमदार, खासदार मात्र सरकारमध्येच राहतील. म्हणूनच सातत्याने खिशात ठेवलेल्या राजीनाम्याच्या धमक्यांवर लोकांनी यथेच्छ चेष्टा केली तरी शिवसेनेचे मंत्री केंद्रात व राज्यात निर्ढावलेपणाने सत्तेतच बसल्याचे दिसते. इतक्या ओढाताणीनंतरही ही मंडळी नेमका कुठला गोंद लावून सत्तेच्या खुर्च्यांना चिकटली आहेत, हे मात्र कळत नाही.

 

राफेल विमान खरेदी व्यवहारांत खरेच घोटाळा झाल्याचे संजय राऊतांचे म्हणणे असेल, तर ते अशा लोकांसोबत सत्ता कशी उपभोगतात, हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो. यातूनच शिवसेनेची डबल ढोलकी प्रतिमा अधिक ठसठशीतपणे जनतेसमोर येते. पण, ही डबल ढोलकी वाजवण्यातच स्वार्थ लपलेला असल्याने ठाकरे आणि राऊतांना त्याशिवाय दुसरा पर्यायही दिसत नाही. खरे म्हणजे, शिवसेनेला आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना, नेत्यांना आता गरज आहे, ती अभ्यासाची. राफेल विमान खरेदी व्यवहाराची जी माहिती देणे गरजेचे आहे, ती विविध ठिकाणी उपलब्ध आहेच. जरा डोळसपणे पाहिले की, ती दिसेलही, पण डोळ्यांवर मोदी आणि भाजपविरोधाची झापडे लावलेल्यांना हा अभ्यासही करता येणार नाही. या लोकांना येईल ते कशाशी कसलाही संबंध नसलेले असंबंद्ध बोलणेच. तेच संजय राऊत आताही करत आहेत आणि त्यांच्यामागे ‘चिवसैनिक’ही टाळ्या पिटत आपल्या नेत्याच्या बिनडोकपणाला पुरेशी साथ देत आहेत. “राफेल खरेदी व्यवहार बोफोर्सचा बाप आहे,” असे म्हणण्यापर्यंत मजल मारलेल्या संजय राऊतांना बोफोर्स घोटाळ्याची तरी कितीशी माहिती आहे, हा प्रश्नही त्यामुळेच निर्माण होतो. कारण, बोफोर्स घोटाळ्यांच्या आरोपावेळीच जे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले होते, तशा पुराव्यांचा लवलेशही राफेलप्रकरणी दिसत नाही. तरीही सगळ्यांचेच हवेत बाण मारणे सुरू आहे आणि संजय राऊतांनाही असेच बाण आपल्या धनुष्यातून सोडण्याचा मोह झाला. पण, धनुष्यातून सोडलेल्या बाणापुढे लक्ष्यच नसेल तर? तर बाण उलटण्याचीच भीती अधिक. त्यामुळे संजय राऊत यांनी आता फक्त आपण सोडलेला बाण आपल्यावरच उलटणार नाही ना, याची काळजी करावी, तेच त्यांच्या हिताचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@