छोटी दुनिया, बडा नाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


रासायनिक उद्योगक्षेत्रात सिंथेटिक यार्न फायबर आणि एरोसोल उद्योगात ३५ वर्षांचा भरभक्कम अनुभव गाठीशी घेऊन व्यवसायाला सुरुवात करणार्या राकेश जैन यांच्या प्रवासात एक गोष्ट नेमकी दिसते ती म्हणजे, उद्योग कितीही लहान असो, तुमचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असेल, तर यश तुमच्या पायाशी लोळण घालेल. १९९३ साली सुरू झालेल्या ‘सारा-केम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची कहाणीही तशीच वेगळी आहे.

 

उद्योजकाचे संपूर्ण नाव : राकेश जैन

कंपनीचे नाव: सारा-केम (इंडिया) प्रा. लि.

कंपनीचे उत्पादन : सिंथेटिक फायबर आणि एरोसोल इंडस्ट्री

व्यावसायिक क्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

कर्मचारी संख्या : २५

वार्षिक उलाढाल : २० कोटी

भविष्यातील लक्ष्य : सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती


नवी मुंबईतील वाशी भागात राहणार्‍या राकेश जैन यांनी १९७६ साली रसायनशास्त्रातून पदव्युत्तर पदवी मिळवली. १९७६ ते १९८१ पर्यंत त्यांनी ‘नायलॉन अ‍ॅण्ड पॉलिस्टर यान’ कंपनीत काम केले. त्यानंतर ‘ओर्के पॉलिस्टर’ पाताळगंगा येथे ते कार्यरत होते. या दरम्यान गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे ते प्रमुख होते. १४ वर्ष नोकरी केल्यानंतर जून १९९० मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. ‘सारा-केम’ ही कंपनी भागीदारीत सुरू झाली. याअंतर्गत एरोसोल प्रोडक्टची सुरुवात केली. प्रामुख्याने दाढी करण्याचे स्प्रे, एअर फ्रेशनर्स आदी उत्पादनांसाठी त्याचा वापर होतो. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील कंपन्यांना उत्पादन पुरवण्याचे काम कंपनीतर्फे केले जाई. याशिवाय सिंथेटिक फायबर उत्पादन करण्यास जैन यांनी सुरुवात केली. कंपनीने त्यांची उत्पादने निर्यात करण्यावर भर दिला. देशभरात आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये कंपनी त्यांच्या उत्पादनांची निर्यात करते.

 
उद्योगाची सुरुवात भलेही छोटी करा, मात्र विनम्रपणे, सातत्याने, कठोर परिश्रम घेत उद्योग वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवा. हेच प्रयत्न तुम्हाला उद्योगविश्वातल्या मोठ्या वाटचालीसाठी कार्यक्षम बनवतील.” 
 
 
कंपनीला लागणारा कच्चा माल आणि तयार होणार्‍या उत्पादनांबाबत बारकावे माहीत असल्याने जैन यांना त्यांचा ग्राहकवर्ग ओळखण्यात जास्त अडचणी आल्या नाहीत. १९९३ पर्यंत कंपनीने एका छोट्याशा जागेत उत्पादन करण्यास सुरुवात केली. १९९२ मध्ये नवी मुंबई एमआयडीसीत जागा खरेदी करून ऑफिसची निर्मिती केली आणि १९९३ पासून कंपनीच्या सध्याच्या जागेत कार्यालयाची बांधणी करण्यात आली. १९९७ मध्ये कंपनी ‘सारा-केम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणून उदयास आली. २०१८ मध्ये जैन यांच्या व्यवसायाला एकूण २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. एरोसोल उत्पादनांची निर्मिती करण्यात कंपनीचा भर आहे. याचा वापर प्रामुख्याने नायलॉन पॉलिस्टर उद्योगांमध्ये होतो. आकडेवारीनुसार भारतात १९९७ मध्ये सुमारे १०-१२ पॉलिस्टर उत्पादक कंपन्या होत्या. त्यावेळेस प्रामुख्याने भारताला तैवान आणि कोरिया या देशांतून पॉलिस्टरची आयात करावी लागत होती. आज परिस्थिती बदलली असून सुमारे दीडशे कंपन्या पॉलिस्टरची निर्मिती करतात. जैन यांचीही कंपनी त्यावर अवलंबून असल्याने कंपनीचा विकास त्यासोबतच होत गेला. कंपनीतील कर्मचारी आणि व्यवस्थापकीय मंडळाची मेहनत, गुणवत्तेतील सातत्य ‘सारा-केम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे हे उत्पादन देशाील अग्रगण्य एरॉसोल उत्पादनांपैकी आहे. देशभरातील एरॉसोल उत्पादनांपैकी ५० टक्के वाटा हा कंपनीचा आहे. एरॉसोल कंपन्यांसाठी लागणारा कच्चा मालही ‘सारा-केम’ पुरवते. थोडक्यात, एरॉसोल उत्पादनांची एक खिडकी म्हणजे ‘सारा-केम’ आहे. पुढील काही वर्षांत ग्राहकोपयोगी सेवा आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करण्याकडे कंपनीचा भर असणार आहे. येत्या काळात २५-५० थेट रोजगारांची निर्मिती यातून केली जाणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने इतर संबंधित परवानगी घेण्याची प्रक्रिया, नव्या व्यवसायासाठी लागणार्‍या आवश्यक गोष्टींची जमवाजमव सुरू केली आहे.
 
 

व्यवसायाचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना, एका नोकरदार कुटुंबात जन्मलेल्या जैन यांनी मोठ्या धाडसाने त्याकाळात उद्योगक्षेत्रात पाऊल टाकले. १९९० मध्ये तुलनेने व्यवसायाची सुरुवात करण्यास सोपे होते, असे जैन यांचे मत आहे. कमीत कमी गुंतवणूक, कमी स्पर्धा याचा फायदा व्यवसायाला झाला. सुरुवातीपासूनच जैन यांनी स्वतःच्या पैशावरच व्यवसाय करण्याचे ठरवले. ही पद्धती आजही कायम आहे. ‘सारा-केम’ कंपनी पूर्णतः त्यांच्याच गुंतवणुकीवर चालते. त्या काळात लघुउद्योजकांना भांडवलासाठी मदत करण्यास बँका तयार होत नसत. त्यामुळे जैन यांनी स्वतःच्या पैशावरच उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. कंपनीतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत केली जाते. शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल राकेश जैन आणि ‘सारा-केम’ कंपनीचा विशेष गौरव करण्यात आला आहे. नवी मुंबईतील एसआयएस, डी. वाय. पाटील आदी शिक्षणसंस्थांसोबतही कंपनी गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. बाजाराचे सूक्ष्म निरीक्षण, आव्हाने ओळखण्याची समज आणि व्यावसायिक विचार याच गोष्टी जैन यांनी ओळखून एक यशस्वी उद्योग उभा केला.


तेजस परब

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@