उद्योगातून शपथ पर्यावरणरक्षणाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |
  
 

भविष्याचा विचार करून सुरू केलेला उद्योजक यशाची गुढी नक्कीच उभारतो. पाहता पाहता व्यवसाय जोर धरू लागतो आणि एका छोट्याशा जागेत सुरू केलेली कंपनी कोट्यवधींची उलाढाल करू लागते. यशस्वी उद्योजक हा मंत्र ओळखूनच व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवतात आणि बहरते एका उद्योगविश्वाची वेल. केडिया ऑर्गेनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे (केओसीपीएल) संस्थापक व संचालक रघुनाथ केडिया यांच्या यशाची कहाणीही अशीच.



उद्योजकाचे संपूर्ण नाव : रघुनाथ मदनलाल केडिया (संचालक), विरल रघुनाथ केडिया (संचालक)

कंपनीचे नाव : केडिया ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड (केओसीपीएल)

कंपनीचे उत्पादन : जैवइंधन निर्मिती (बायोडिझेल)

व्यावसायिक क्षेत्र : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय

कर्मचारी संख्या : ५५

वार्षिक उलाढाल : ५० कोटी

प्रेरणास्रोत : रतन टाटा

भविष्यातील लक्ष्य : जैवइंधन क्षेत्रात देशातील प्रमुख कंपनी बनणे


पारंपरिक इंधन (पेट्रोल, डिझेल) यांचे मर्यादित स्त्रोत वाढत्या व अस्थिर किमती यांना पर्याय देणार्‍या जैवइंधनाची निर्मिती करावी आणि व्यवसायासह पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, या उद्देशाने २००९ साली केओसीपीएल कंपनीची स्थापना झाली. कुटूंबातूनच व्यवसायाचे बाळकडू मिळाल्याने रघुनाथ यांनी व्यवसायात अवघ्या काही वर्षांतच जम बसवला. रसायनशास्त्रातून अभियांत्रिकीची पदवी मिळवलेल्या रघुनाथ केडिया यांना त्याच क्षेत्रात कामगिरी करायची होती. सुरुवातीला अनुभव गाठीशी बांधण्यासाठी नोकरीही केली. जैवइंधन आणि रासायनिक उद्योगक्षेत्रात ३० वर्षांचा अनुभव त्याच्यापाशी आहे. २००९ मध्ये अंबरनाथ येथील एका लहानशा जागेत त्यांनी केओसीपीएलची सुरुवात केली. जैवइंधनाची वाढती गरज लक्षात घेत त्यांनी उद्योगाची सुरुवात केली. 

 
“व्यवसाय करायचा असेल तर कठोर परिश्रमांशिवाय पर्याय नाही. त्या जोडीला भरपूर आत्मविश्वासही हवा. उद्योजकांकडून प्रेरणा घ्यावी मात्र, त्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी, तरच यशाची चव चाखायला मिळेल.” 
 

त्या काळात जैवइंधन उत्पादन करणारी केओसीपीएल ही पहिली कंपनी आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन बायोडिझेल आहे. जैवइंधनाची सध्याची मागणी पाहता या क्षेत्रात आणखी संधी आहेत. बायोडिझेल प्रामुख्याने कृषिपंप, रेल्वे, डिझेल पंप, ट्रॅक्टर, जहाज आदींमध्ये इंधनाच्या १० टक्के प्रमाणात वापरले जाऊ शकते, असे संशोधन आहे. केओसीपीएल आजमितीस देशातील प्रमुख कंपन्यांना जैवइंधनाचा पुरवठा करते. या क्षेत्रात आणखी आमूलाग्र बदल होतील, असा कंपनीचा विश्वास आहे. 

 
 

जैवइंधन उत्पादन करणारी देशातील अग्रगण्य कंपनी म्हणून केओसीपीएल गणली जावी, हे रघुनाथ यांच्यासमोर ध्येय आहे. त्यांच्याच विचारांनी प्रेरणा घेऊन केडिया यांची दुसरी पिढीही याच व्यवसायात उतरली आणि केओसीपीएलला नव्या स्फूर्तीचे पंख मिळाले. पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र अभियांत्रिकीची पदवी आणि मुंबईच्या एस. पी. जैन इन्टिट्यूटमध्ये एमबीएची पदवी पूर्ण करणारे विरल रघुनाथ केडियाही कंपनीत संचालक पदावर रूजू झाले. नवी आव्हाने, नव्या योजना आखण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानात देशाने मागे राहू नये. उद्योजकांनीही तर मुळीच नाही, असा विरल यांचा अट्टाहास आहे. उद्योग कोणताही असो...गरज असते ती भांडवलाची. केडिया कुटुंबीयांसमोरही हेच आव्हान होते. कंपनी सुरू करण्यासाठी पैसा हवा मात्र, त्यापूर्वीचा अनुभव वाईट होता. यापूर्वी केलेल्या उद्योगांमध्ये बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यातच मोठा हिस्सा जायचा. त्यामुळे कंपनीने बँकांकडून कर्ज घेऊच नये, अशी भूमिका घेत गुंतवणूदार उभे केले. केडिया यांच्या कर्तृत्वावरील विश्वासामुळे त्यांनीही मदत केली. केओसीपीएल सुरू करण्यासाठीही स्थानिक संस्था आणि सरकारच्या बर्‍याच परवानग्या घेणे गरजेचे होते. त्याशिवाय उद्योग सुरू करणेही शक्यच नव्हते. मात्र, त्यावरही मात करत त्यांनी कंपनीची सुरुवात केली. सध्या जरी गोष्टी काहीशा सोप्या झाल्या असल्या तरीही त्या काळात केओसीपीएलच्या परवानग्यांसाठी बराच अवधी लागला. त्यातूनही खचून न जाता केडिया यांनी कंपनीसाठीच्या परवानग्या मिळवल्या आणि यशस्वी उद्योग उभारला. कुशल कारागीर ही सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी गरज आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, अशी संचालक विरल केडिया यांची तळमळ आहे. ते ’राऊंड टेबल इंडिया’ या संस्थेसाठी कंपनीतर्फे काम पाहतात. शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. केडिया यांच्या कंपनीत आज ५५ कर्मचारी आहेत. कंपनीच्या दरवर्षीचा प्रगतीचा आलेख पाहता ही संख्या दुप्पट होईल, अशी अपेक्षा केडिया यांना आहे. येत्या काळात कंपनी मोठ्या प्रमाणावर बायोडिझेलचे उत्पादन करण्यावर भर देणार आहे. त्याची निर्यात आणि देशातील विक्री वाढविण्यावर कंपनीचा भर असेल. त्यासह पर्यावरणाला हानिकारक असलेल्या इंधनाचा कमी वापर व्हावा, यासाठी जागृती करण्याची योजना केडिया यांची आहे.

- तेजस परब

 
 
         माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@