हाडाचा नव्हे, धातूचा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 

 
व्यवसायात सर्वार्थाने रुळलेल्या उद्योजकाची आपण ‘हाडाचा उद्योजक’ म्हणून स्तुती करतो. पण, प्रदीप मेटल्सच्या प्रदीप गोयल यांच्या बाबतीत ‘धातूचा उद्योजक’ हाच शब्दप्रयोग सार्थ ठरतो. कारण, प्रदीप गोयलही अगदी धातूसारखेच बळकट, कठोर आणि स्वत:ला परिस्थितीनुरुप ढाळणारे. व्यावसायिक जीवनात अनेक संकंटांचा सामना करत कोट्यवधींची उलाढाल करणार्‍या या ‘वेल्थ क्रिएटर’ची ही यशोगाथा...

उद्योजकाचे संपूर्ण नाव : प्रदीप गोयल

कंपनीचे नाव : प्रदीप मेटल्स लिमिटेड

कंपनीचे उत्पादन : धातू उद्योगासाठी लागणार्‍या मशिनरीचे उत्पादन

व्यावसायिक क्षेत्र : धातू उद्योग

कर्मचारी संख्या : ६६०

वार्षिक उलाढाल : १५० कोटी

प्रेरणास्रोत : अटल बिहारी वाजपेयी

भविष्यातील लक्ष्य : कंपनीची उलाढाल दुप्पट करणे


अमेरिकेतील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून मायदेशात नोकरीसाठी आलेल्या एका यशस्वी उद्योजकाचा प्रवास परदेशी नोकरी करण्याची इच्छा बाळगणार्‍या प्रत्येक तरुणाला फेरविचार करायला लावणारा आहे. आयआयटी कानपूरमध्ये मटेरियल सायन्समधून पदवी घेतलेल्या प्रदीप वेदप्रकाश गोयल यांचा सुरुवातीपासून अमेरिकेतील मोठ्या कंपनीत नोकरी करण्याकडे कल होता. मुंबईतील शीव भागात गोयल यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांनी वाराणसी विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. मुकुंद स्टिल लिमिटेड या कंपनीत ते नोकरीवर होते. त्यामुळे प्रदीप यांचाही कल अभियांत्रिकी क्षेत्राकडेच होता. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने ‘मेटलर्जिस्ट’ पदवीत आयआयटी कानपूरमधून ते प्रथम आले. तत्कालीन राष्ट्रपतींतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी या अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात मटेरियल सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. धातू उद्योग क्षेत्रातील उत्पादनांसाठी लागणार्‍या अद्यावत यंत्रणा, तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी घेतली. १९८० मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील एअर प्रोडक्ट अॅण्ड केमिकल लिमिटेड या कंपनीत त्यांनी नोकरीही सुरू केली. नोकरीची तीन वर्षे अशीच निघून गेली. 

 
 

दरम्यान, अमेरिकेत असताना गोयल यांना तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी भेटीचा ओघ आला. वाजपेयीजी त्या काळात देशात उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्नशील होते. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या गोयल यांनाही त्यांनी भारतात येऊन या क्षेत्रात व्यवसाय करण्याचे आवाहन केले. इतर देशात चाकरी करण्यापेक्षा भारतात येऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा, असा सल्ला त्यांनी दिला. अमेरिकेतील नोकरी सोडून त्यांनी भारतात परत येण्याची इच्छा वडील वेदप्रकाश गोयल यांच्याजवळ बोलून दाखवली. वडिलांनीही त्यांना लगेच होकार दिला आणि १९८३ मध्ये निर्मिती झाली ती प्रदिप मेटल्स् लिमिटेडचीअमेरिकेतील स्थिरस्थावर नोकरी सोडून भारतात व्यवसाय करण्यासाठी येण्याचा धाडसी निर्णय त्यांनी व वेदप्रकाश गोयल यांनी घेतला खरा, पण खरे आव्हान पुढे होते. केवळ १० लाखांच्या भांडवलात सुरू केलेल्या कंपनीची सुरुवात तर जोमाने झाली, मात्र पुढील काही काळ अडचणींचा ठरला. काही वर्षांतच कंपनीतील कर्मचार्‍यांनी संपाचे अस्त्र उगारले. कर्मचारी संघटनांनी त्याकाळात विरोध करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, कामकाज थांबल्याने पैसा उभारायचा कसा, कर्जे फेडायची कशी, असा प्रश्न गोयल पिता-पुत्रांसमोर होता. कंपनी सोडून पुन्हा अमेरिकेत नोकरीसाठी निघून गेले. मात्र, सहा महिन्यांनी कर्मचार्‍यांतील तणाव निवळला. कामगारांनीही संप न करण्याचे आश्वासन दिले. वेदप्रकाश गोयल यांनी प्रदीप यांना भारतात परतण्याचा सल्ला दिला आणि ते पुन्हा कंपनीत रूजू झाले. त्यानंतर एकएक आव्हाने पेलत उद्योगाचा आलेख हा नवनवे शिखर सर करत गेला. उद्योग उभारताना अनेक बँकांनी कंपनीवर विश्वास ठेवत कर्जाची मदत केली. संघर्ष तरीही संपत नव्हता. १९९५-२००० दरम्यान आर्थिक मंदीचा फटका कंपनीलाही बसला. त्याकाळात कंपनीची सर्वच बाजूंनी पुनर्बांधणी करावी लागली. २००० सालापासून अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरत ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा पुरवण्यावर कंपनीचा भर राहिला. हळूहळू व्यवसायही तग धरू लागला आणि आज सुमारे दीडशे कोटींची उलाढाल प्रदीप मेटल्स करत आहे. जगभरातील कोणत्याही ठिकाणी प्रदीप मेटल्स लिमिटेडचे उत्पादन हे पाच दिवसात पोहोचविण्यात कंपनी यशस्वी झाली आहे. प्रदीप मेटल्स लिमिटेड आज जगभरातील देशांना त्यांची उत्पादने पुरवते. कंपनीत तयारी झालेली अत्याधुनिक उत्पादने ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचावीत याकडे कंपनीचा कल असतो. एकूण उत्पादनांपैकी मोठा भाग निर्यात केला जातो. एकूण व्यवसायापैकी ९० टक्के व्यवसाय हा परदेशातील ग्राहकांवर अवलंबून आहे. वाढती मागणी, अद्ययावत तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास हेच कंपनीच्या यशाचे गमक आहे.

 
 
 
प्रदीप गोयल एएसएम इंटरनॅशनल इंडिया चॅप्टरचे २००२ ते २००८ या काळात पाच वर्षे अध्यक्ष व तीन वर्षे सदस्य होते. उद्योजकांना मदत करण्यासाठी ते विविध औद्योगिक संघटनांसह कार्यरत असतात. इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडो मर्चंट चेंबर, ठाणे-बेलापूर असोसिएशनचे ते सदस्य आहेत. नोवेल मॅन्युफॅक्‍चरिंग प्रोसेस या तंत्रज्ञानावर त्यांनी संशोधन केले आहे. यात ५० टक्के ऊर्जाबचत आणि ५० टक्के ग्रीन हाऊस गॅस कमी करण्यात हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हे कंपनीचे लक्ष्य आहे. प्रदीप गोयल हे २००६ पासून मायक्रोव्हेव तंत्रज्ञानावर काम करत आहेत. कंपनीला अमेरिका आणि जपानकडून पेटंटही मिळाले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कंपनीच्या कक्षा आणखी रुंदावण्याचे उद्दिष्ट गोयल यांनी निश्‍चित केले आहे. येत्या काळात कंपनीला सुमारे १०० कुशल कामगारांची आवश्यकता भासणार आहे. नव्या तंत्रज्ञानाद्वारे वर्षाला ५० टक्के वाढ कंपनीला अपेक्षित आहे. प्रदीप मेटल्स लिमिटेडतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून ‘फ्रेन्ड्स ऑफ ट्रायबल सोसायटी’ आणि ‘एकल विद्यालय’ या संस्थांद्वारे शिक्षणासाठी गरजूंना मदत केली जाते. या संस्थेद्वारे लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवले जाते. सुमारे ७४ हजार शाळांमध्ये या संस्थेचा विस्तार आहे. प्रदीप गोयल यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचेही काम पाहिले आहे. इंजिनिअरिंग एक्पोर्ट्स प्रमोशन कौन्सिलतर्फे कंपनीला पुरस्कार मिळाला आहे. एमर्सन कंपनीतर्फे ‘बेस्ट एक्पोटर्स’ हा पुरस्कार मिळाला आहे. बँका आणि भांडवलदारांनी दिलेला पैसा हा केवळ उद्योगासाठी आणि परत करण्याचे भान ठेवून वापरल्यास मोठा फायदा होतो. छोट्याशा खोलीत सुरू झालेल्या कंपनीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे, याचे प्रदीप मेटल्स म्हणजे मूर्तीमंत उदाहरण. 
 
 

- तेजस परब

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@