शून्यातून उद्योगनिर्मितीचा वसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |
 
 

उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नाही... निवृत्तीसाठी अवघी काही वर्षे शिल्लक... मात्र, मनातून व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणार्‍या प्रभाकर खिरे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ’अलंकार फॅब्रिकेटर्स अ‍ॅण्ड इंजिनिअर्स’ (एएफई) या कंपनीची स्थापना केली. आज त्यांची दुसरी पिढी म्हणजे, मिलिंद खिरे हे कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार म्हणून यशस्वी धुरा सांभाळत आहेत.

 

उद्योजकाचे संपूर्ण नाव : मिलिंद खिरे

कंपनीचे नाव : अलंकार फॅब्रिकेटर्स एण्ड इंजिनिअर्स

कंपनीचे उत्पादन : रासायनिक उत्पादनांसाठीची यंत्रसामग्री बनवणे

व्यावसायिक क्षेत्र : देशांतर्गत

कर्मचारी संख्या : २५

प्रेरणास्रोत : प्रभाकर खिरे

भविष्यातील लक्ष्य : तीन नव्या युनिटची निर्मिती

 
 

अभियांत्रिकी अभियंता ही पदवी घेतलेल्या प्रभाकर खिरे यांची उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती. अशात व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. निवृत्तीनंतर उतारवयात आरामदायी आयुष्य घालवण्याच्या वयात खिरे यांनी ’एएफई’ सुरू केली. १९९६ साली सुरू झालेल्या ‘अलंकार फॅब्रिकेटर्स अ‍ॅण्ड इंजिनिअर्स’ (एएफई) या कंपनीची उलाढाल कोट्यवधींमध्ये आहे. कंपनीची सूत्रे त्यांचे पुत्र मिलिंद खिरे यांनी स्वीकारली. वडिलांकडूनच व्यवसायाविषयी मिळालेली प्रेरणा त्यांना आज उद्योजक म्हणून यशस्वी होण्यास मदत करते. खिरे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या कंपनीत अभियंत्याची गरज होती. कोणाचीही चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या कंपनीत काम करण्यावर भर देत ते सेवेत रूजू झाले. मिलिंद खिरे आज कंपनीचे ’मॅनेजिंग पार्टनर’ आहेत. कंपनीच्या यशाच्या भरारीत त्यांचाही मोठा वाटा आहे. नवी संकल्पना आणि सृजनशीलतेतून तयार झालेल्या गोष्टीचा आनंद एखाद्या साचेबद्ध चाकोरीत नाही, असा विचार त्यांनी सुरुवातीपासूनच ठेवला आणि वडिलांचा व्यवसाय एका उंचीवर नेऊन ठेवला.

 

“उद्योगात यशस्वी होण्याची त्रिसूत्री अशी की नव्या संकल्पना स्वीकारा, मेहनत करा आणि संयम ठेवा देशातील स्टार्टअप अयशस्वी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे नवउद्योजकांकडे नसलेला संयम. अयशस्वी व्हाल तेव्हा त्याची कारणे शोधा आणि त्या चुका टाळा.”

  

कंपनीची सुरुवात करताना त्या काळात सूक्ष्म व लघुउद्योगांसाठीची वाढती संधी ही ’एएफई’साठी फायदेशीर ठरली. उद्योजकांनी मला काय बनवता येते, त्यापेक्षा बाजारात काय विकले जाते, त्याकडे लक्ष द्यायला हवे. याचा तंतोतंत अवलंब प्रभाकर खिरे यांनी केला. त्या काळात उद्योगांसाठी लागणारी मशीन्स, सुटे भाग बनविणार्‍या कंपन्यांची संख्या तुलनेने कमी होती. या क्षेत्रात मागणीही प्रचंड होती. बाजारातील गरजेनुसार उत्पादन करून ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी झाले‘एएफई’तर्फे पेट्रोकेमिकल्स, अॅग्रो केमिकल्स, फूड फ्लेवर, वॉटर ट्रीटमेंट, बायोटेक केमिकल्स, कलर इंडस्ट्री आदी उद्योगक्षेत्रांत लागणार्‍या मशीन्स बनविण्याचे काम केले जाते. या सर्व क्षेत्रांतील कंपन्या ‘एएफई’च्या ग्राहक आहेत. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात सरकारच्या विविध परवानग्या घेण्यापासून ते उद्योगासाठी भांडवल उभारण्यापर्यंत मोठ्या अडचणी आल्या. त्यात व्यवसायाची पार्श्वभूमी नाही. पैसा, जागा, मनुष्यबळ उभे करणे त्यावेळेस आव्हानात्मक होते. मात्र, त्यावरही तोडगा काढून प्रभाकर खिरे यांनी कंपनीची दिशा निश्चित केली. या क्षेत्रात आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खेळत्या भांडवलाचा प्रश्न आजही कायम आहे. त्यावर मात करून पुढे जाणार असल्याचा मिलिंद खिरे यांचा निर्धार आहे.  

  
 
 

‘एएफई’तर्फे येत्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती केली जाईल. भविष्यात सुरू केल्या जाणार्‍या विविध कारखान्यांसाठी कंपनीला कुशल मनुष्यबळाची जास्त गरज आहे. तितकेसे कुशल कारागीर मिळत नसल्याने कंपनीतर्फे कर्मचार्यांना अद्यावत कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. कंपनीतर्फे कुशल कारागीर व विद्यार्थी तयार होतील, यासाठी खास प्रशिक्षणवर्ग भरविण्यात येतात. या क्षेत्राला अजूनही कुशल कारागीरांची गरज असून कंपनी त्या दृष्टीने योजना आखत आहे. कंपनीतर्फे विविध संस्थांशी सलग्न होऊन यांसारखे प्रशिक्षण दिले जाते. कंपनी एक परिवार असल्याचे मिलिंद खिरे मानतात. कर्मचार्‍यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना प्रशिक्षण, आजारपण किंवा अन्य काही मदत हवी असल्यास ते जातीने लक्ष देतात. कंपनीच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना येणार्‍या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी मदत करणे, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यावर ‘एएफई’चा भर आहे. 

तेजस परब

 

   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@