गोष्ट पाच तरुणांच्या पॅशनची, संघर्षाची..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 
 
 
 
नितीन मेटकर, तुषार वाघ, मनु जडागौडा, अर्पित श्रॉफ आणि निलेश जोशी. साधारणपणे एकाच वयाचे, कॉर्पोरेट विश्वातील एकाच क्षेत्रात नोकरी करणारे तरुण. हे सारे तरुण एकामागोमाग एक एकत्र येतात काय आणि बघता बघता क्रिटिकल इक्विपमेंटस आणि केमिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एक आघाडीची आणि ७० हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी उभी करतात काय... 

 

उद्योजकांचे नाव : नितीन मेटकर, तुषार वाघ

कंपनीचे नाव  : ‘अॅक्मे प्रोसेस सिस्टिम्स प्रा. लि.’

कंपनीचे उत्पादन व कार्यक्षेत्र : क्रिटिकल इक्विपमेंटस आणि केमिकल टेक्नॉलॉजी

कर्मचारी संख्या : २००

वार्षिक उलाढाल : ७३ कोटी

भविष्यातील लक्ष्य : २०२५ पर्यंत १००० कोटींची उलाढाल


आज देशात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत शिकणार्‍या किंवा कोणत्या ना कोणत्या कंपनीत नोकरी करणार्‍या कोणत्याही युवकाला प्रेरणादायी वाटावी अशी एक यशोगाथा. अर्थात, या पाच तरुणांनी मिळून घडवलेली, यशस्वीपणे चालवलेली ‘अॅक्मे प्रोसेस सिस्टिम्स प्रा. लि.’ ही कंपनी. विशेष म्हणजे हे पाचही जण सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. पैकी नितीन मेटकर हे खानदेशातल्या धुळे जिल्ह्यामधील शिरपूरचे. वडील एमएसईबीत नोकरीला. बारावीपर्यंतचे शिक्षण शिरपूरमध्येच पूर्ण करणार्‍या नितीन मेटकर यांनी जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण (बी.टेक.) पूर्ण केले. यानंतर त्यांनी नोकरीसाठी मुंबईत बरीच शोधाशोध केली. त्यानंतर ते पुण्यात आले आणि एका खासगी कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. तिथे साधारण पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरीला रामराम करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तो धाडसी यासाठी की, तो सारा काळ होता २००८-२००९ दरम्यानचा अर्थात, जागतिक मंदीचा. मेटकर यांच्या नोकरीच्या काळातच त्यांची ओळख त्याच कंपनीत काम करणार्‍या मनु जडागौडा यांच्याशी झाली होती. जडागौडा यांनाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि त्यातून नवं काही निर्माण करण्याची इच्छा होतीच. त्यामुळे या दोघांनीही नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आणि अॅक्मे प्रोसेस सिस्टिम्स प्रा. लि. ची पायाभरणी झाली.

 
 
“तुमच्याकडे जर ‘पॅशन’ असेल आणि त्यासोबतच शिस्त आणि समर्पण असेल, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. पडेल ते काम करण्याची तुमची तयारी हवी. अगदी तुमचा एखादा कामगार आला नाही तर त्याचं कामही तुम्हाला करता आलं पाहिजे. तरच तुमची वाढ आणि खर्‍या अर्थाने प्रगती होऊ शकते.” 
 

अर्थात हे सारं जेवढं वाचायला सोपं वाटतंय, तेवढं करणं नक्कीच नव्हतं. ऐन जागतिक मंदीच्या काळात चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायला जाणं, हा मध्यमवर्गीय मानसिकतेवर पडलेला जणू एखादा बॉम्बच होता. या दोघाही तरुणांना या निर्णयासाठी प्रचंड विरोध झाला. अगदी त्यांच्या कुटुंबीयांनीही विरोध दर्शवला. ‘एखाद्या ज्योतिषाकडे दाखवून ये’ म्हणून सल्लेही दिले. तरीही हे दोघे आपल्या निर्णयावर ठाम होते आणि सार्‍या प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता त्यांनी ’अॅक्मे ’ सुरू केलीच. त्यानंतर मेटकर-जडागौडा यांच्यासोबतच त्यांच्या पूर्वीच्या कंपनीत नोकरीला असणारे अर्पित श्रॉफ हेही या दोघांना येऊन मिळाले. विशेष म्हणजे, सुरुवातीलाच या तिघांच्या नव्या कंपनीला तब्बल पावणेदोन कोटींची ऑर्डर मिळाली. त्यानंतर अॅक्मे ने हळूहळू परंतु निर्धारपूर्वक आणि परिश्रमपूर्वक वाटचाल केली आणि त्याचं त्यांना फळही मिळत गेलं. या काळात त्यांनी कधीही आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड केली नाही. प्रसंगी थोडाफार तोटा सहन केला, पण दर्जा कायम ठेवला. याचा फायदा त्यांना मिळत गेला आणि उत्पादनांना बाजारपेठही मिळत गेली. नवनवीन ऑर्डर्स मिळत गेल्या. दरम्यानच्या काळात मेटकर, जडागौडा नि श्रॉफ या तिघांना तुषार वाघ आणि निलेश जोशी हे आणखी दोन जुने मित्र येऊन मिळाले. मग या पाच जणांच्या नेतृत्वाखाली कंपनीने अधिकच दिमाखाने वाटचाल केली.

 
 

आज अॅक्मे कंपनीत ८५ अभियंत्यांसह सुमारे २०० कर्मचारी कार्यरत आहेत. आम्ही एखाद्या संस्थेप्रमाणे उभे राहिलो आहोत, असा दावा नितीन मेटकर करतात. पुण्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये तशा कंपन्या पुष्कळ आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये ही कंपनी उठून दिसते ती यामुळेच. अर्थात, या सार्‍या प्रवासात संकटंदेखील भरपूर आली. विशेषतः आर्थिक संकटं अनेकदा आली. परंतु, त्यातून सावरून अॅक्मे कंपनी पुन्हा पुन्हा उभी राहिली. पाच जणांचं नेतृत्व असल्यामुळे आणि हे पाचही जण एकमेकांचे उत्तम सहकारी आणि तितकेच चांगले मित्र असल्यानेच हे शक्य झाल्याचे मेटकर सांगतात. आज कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल ७३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. २०२५ पर्यंत हीच उलाढाल १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट कंपनीच्या नेतृत्वाने निर्धारित केले आहे. लक्ष्य मोठं आहे, अवघड आहे परंतु आम्ही ते निश्चितच गाठू, असं कंपनीची धुरा वाहणारे हे पाचही जण आत्मविश्वासाने सांगतात. कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या क्रिटिकल इक्विपमेंटस आणि केमिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील उत्पादनांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक ब्रँड म्हणून उभं राहण्याचंही त्यांचं स्वप्न आहे. आज भारतासह जगभरातील २५ देशांमध्ये ही कंपनी पोहोचली आहे.

 
 

या सर्व प्रवासात कुटुंबीयांची साथ फार महत्त्वाची ठरल्याचे हे पाचही जण सांगतात. ऐन उमेदीच्या काळात या व्यवसायात स्वतःला वाहून घेतल्याने सकाळी लवकर उठून घराबाहेर पडणं आणि रात्री अपरात्री कधीतरी घरी येणं हे वेळापत्रक जणू रोजचंच. अशात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना समजून घेतलं, भक्कम पाठिंबा दिला. आज या पाचही जणांच्या कुटुंबांचेदेखील एकमेकांशी तितकेच जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत आणि यातून हे एक एकत्रित विशाल कुटुंबच निर्माण झालं आहे. एकीकडे हे असं सारं भव्य नेत्रदीपक यश मिळवत असताना अॅक्मे च्या नेतृत्वाने सामाजिक भान आणि बांधिलकीदेखील जपली आहे. विदर्भातील वर्ध्यात एका सामाजिक संस्थेत तिघा मुलींच्या वर्षाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च या कंपनीतर्फे केला जातो. तसेच, लघुउद्योग भारतीशीही कंपनी जोडली गेली आहे. एकीकडे नवं काहीतरी करण्याची जिद्द, संकटं अंगावर घेण्याचं धाडस आणि या सार्‍याला उद्यमशीलतेची जोड यातून निर्माण झालेली आणि पुढे यशाचे एकेक टप्पे गाठत गेलेली ‘अॅक्मे प्रोसेस सिस्टिम्स प्रा. लि.’ ही कंपनी अशाप्रकारे या पाच तरुणांच्या चिकाटीतून, परिश्रमांतून घडलेली एक यशोगाथा म्हणून आज आपल्या सर्वांसमोर दिमाखात उभी आहे.


 

- निमेश वहाळकर
 
        

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@