कुटुंब रंगलंय उद्योगात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 


आज शंभर कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या ‘अशिदा इलेक्ट्रॉनिक्स’चा जन्म हा प्रतिकूलतेतून झाला. ‘प्रतिकूल तेच घडेल आणि प्रतिकूलतेतही आहे अनुकूलता,’ अशी सावरकरांची वचने ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती, अशा भाऊ तथा मनोहर कुलकर्णी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने व एस.डी. नाईक आणि सुनील कुलकर्णी यांच्या सहकार्याने ‘अशिदा’ नावाचा वटवृक्ष बहरला.


उद्योजकाचे नाव: सुनील कुलकर्णी

कंपनीचे नाव: अशिदा इलेट्रॉनिक्स प्रा. लि.

कंपनीचे उत्पादन: इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन-डिस्ट्रिब्युशन

व्यावसायिक कार्यक्षेत्र: देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल: १०० कोटी

प्रेरणास्त्रोत: वडील - कै. मनोहर कुलकर्णी

कर्मचारी संख्या: ४०० हून अधिक

भविष्यातील लक्ष्य: आगामी ३ वर्षांत २०० कोटी

 

कोपरीतल्या सिंधी कॉलनीतील २३ क्रमांकाच्या इमारतीतील दीडशे फुटाची जागा, त्यात दहा-बारा कुटुंबसदस्यांसह एक अनोखं अस्तित्व बाळसं धरत होतं. १९७० साली इमर्जन्सी ट्यूबलाईटच्या उत्पादनाने प्रवास सुरू झाला. लोकलने लोहार चाळीतून सुटे पार्ट्स आणणे आणि घरातील सगळ्यांनीच लहान-मोठी जबाबदारी घेत ट्युबलाईट बनविणे, असा शिरस्ता. भाऊ १९६५-७० या काळात एका रेडिओ कंपनीत कामाला होते. तिथे असताना रेडिओची ट्रान्झिस्टर आवृत्ती ही भाऊंच्या प्रयत्नातून विकसित झालेली. मूलत: संशोधक स्वभाव व चिवट मेहनत याची देणगी भाऊंना होतीच. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण आणि पुढे धुळ्यात डिप्लोमाचे त्यांचे शिक्षण झाले. बंगळुरूच्या आयटीआय कंपनीत आरएनडी विभागात नोकरी केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांनंतर भाऊ तसेच त्यांचे मेव्हणे श्रीकृष्ण नाईक यांनी ‘अशिदा’ची पायाभरणी केली.

“तात्काळ पैशांच्या मागे नवी पिढी लागते. परिश्रम, संशोधन आणि नाविन्य असल्याशिवाय उद्योगजगतात यशाचे शिखर गाठता येत नाही. केवळ उद्योजक म्हणून नव्हे, तर एखाद्या उद्योगात आपण कर्मचारी म्हणूनदेखील सेवा बजावत असू, तर त्या उद्योगाशी आपला दीर्घकालीन स्नेह असण्याची गरज आहे. फळाची अपेक्षा बाळगणे चुकीचे नसले, तरी कर्म अपरिहार्य आहे.” 
 
पूर्वी जलसंधारण खाते ‘सॉईल रजिस्टीव्हीटी मीटर’ वापरत असे. परदेशी बनावटीचे हे उत्पादनबिघडल्यानंतर त्याची दुरुस्ती व देखभाल होत नसल्याने खात्याला त्याचा फायदा होत नसे. भाऊंकडे हे उत्पादन दुरुस्तीसाठी आले खरे, मात्र त्याची दुरुस्ती करण्याऐवजी भाऊंनी अशाच प्रकारचे स्वतंत्र व पूर्वीच्याही उत्पादनापेक्षा दर्जेदार उत्पादननिर्माण केले. या उत्पादनामुळे खात्याला तर उपयोग झालाच, पण अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी या सॉईल मीटरच्या (मृदामापक) साहाय्याने स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. हे मशीन इतके यशस्वी झाले की, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी या मशिन्स घेतल्या. काहींनी तर चक्क या मशीनवरआपली पीएच.डी केली. सॉईल मीटर यशस्वी होत असताना दुसरीकडे एमएसईबीचे असेच परदेशातूनआयात केलेले व नादुरुस्त झालेले ऑटो रिक्लोजर मशीन दुरुस्तीसाठी आले. भाऊंनी पुन्हा एकदा स्वतंत्र उत्पादन त्यातून विकसित केले. मग ‘अशिदा’चा प्रवास विजेच्या वेगाने झेपावला. १९७४ साली कोपरी कॉलनीत १०० फुटांची जागा घेऊन ‘अशिदा’ने पहिला कारखाना सुरू केला. त्यानंतर अगदी थोड्याच कालखंडात ठाण्यातील कुंजयानी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सुरुवातीला एक व नंतर पाच गाळ्यांमध्ये आपला पसारा वाढवला. पण, गाळ्यांमध्ये सामावेल, असा ‘अशिदा’चा वेग नव्हताच मुळी. आज ठाण्यात ‘अशिदा’च्या चार मोठ्या फॅक्टरी आहेत आणि ‘अशिदा’ वार्षिक २०० कोटींचे स्वप्न घेऊन त्याच वेगाने मार्गक्रमण करीत आहे.
 

एव्हाना ‘अशिदा’ नावाचा ब्रॅण्ड उदयाला आला होता. १९८३-८४ मध्ये एका फ्रेंच कंपनीने पाठवलेल्या महाकाय क्रेन्सच्या भरवशावर भातसा धरण उभे राहत होते. आयात केल्यानंतर काही महिन्यांतच या क्रेन्स नादुरुस्त झाल्या. या क्रेन्स आणि त्यांचे कंट्रोल पॅनल ‘अशिदा’ने उभे केले. आजचे भातसा धरण हे भाऊ तसेच सुनील कुलकर्णी यांच्या अपरिमित परिश्रमाचे प्रतीक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘कुटुंब रंगलंय उद्योगात’ असे ‘अशिदा’च्या बाबतीत म्हणता येईल. भाऊ व सुनील कुलकर्णी यांचे चिरंजीव सुजय तथा सुयश हेदेखील आता कंपनीची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी कंपनीच्या विविध जबाबदार्यांमध्ये आपला मोलाचा वाटा उचलत आहेत. एमएसईबीनंतर ‘अशिदा’ने सर्वात मोठे योगदान रेल्वे खात्यात दिले. रेल्वेची ‘नेत्रा’ नावाची बग्गी ही ‘अशिदा’च्या कौशल्यविकासातून उभी राहिलेली आदर्शवत अशी भारतीय तंत्रकौशल्याचा नमुना आहे, जिने आज युरोपियन एकाधिकारशाही मोडीत काढली.

 
 
 
शंभर कोटींच्या उलाढालीमुळे असंख्य लघुउद्योजकांना ‘अशिदा’चा आधार मिळाला. आज ४०० हून अधिक कर्मचारी ‘अशिदा’च्या सेवेत कार्यरत आहेत. ‘वेल्थ क्रिएटर’ असताना ‘अशिदा’चे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अमूल्य आहे. भाऊ सामाजिक तसेच उद्योगजगतातील एक दुर्मीळ व्यक्तिमत्व. या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी बांधिलकीने काम केले. त्यांचा हाच वारसा आज ‘अशिदा’ परिवार पुढे घेऊन चालला आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या बेरीस्ते येथील शाळेच्या उभारणीत ‘अशिदा’चा मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक स्कॉलरशिप असो की विविध क्लबचे सामाजिक उपक्रम असो, ‘अशिदा’ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. सुनील कुलकर्णी आज ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. ‘समर्थ भारत व्यासपीठा’च्या सिग्नल शाळेच्या उभारणीतदेखील कुलकर्णी दाम्पत्य व ‘अशिदा’ परिवाराचे अनन्यसाधारण योगदान आहे.
 

- भटू सावंत

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@