उद्यमशीलतेची प्रयोगशाळा

    01-Oct-2018
Total Views |


 

 

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुरू केलेल्या प्रदीप ताम्हाणे यांच्या ‘विनकोट’ कंपनीने अल्पावधीत जगभरात ख्याती मिळवली. १९९७ साली सुरू झालेली ‘विनकोट’ ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटिंग करणारी एकमेव कंपनी आहे. आज ‘विनकोट’ कंपनी जगातील पन्नासहून अधिक औषधनिर्मिती करणाऱ्या देशांना उत्पादन निर्यात करते.


उद्योजकाचे नाव: प्रदीप ताम्हाणे

कंपनीचे नाव: विनकोट रेडीमिक्स फॉर टॅबलेट कोटिंग

कंपनीचे उत्पादन: रेडीमिक्स कोटिंग पावडर

व्यावसायिक कार्यक्षेत्र: देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल: २५ टक्के वाढ

कर्मचारी संख्या: ६५ कर्मचारी

भविष्यातील लक्ष्य: व्यवसायवृद्धी करणे

 
नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला आई आपल्या मुलांना नेहमीच देत असते. त्या सल्ल्यानुसार साधारण ७०च्या दशकात पेण येथून गणपती मूर्ती आणून त्या विकायच्या, असा निर्णय ताम्हाणे कुटुंबीयांतील भावंडांनी घेतला. कोकणातील पेणहून १२१ गणपती मूर्ती आणून व्यवसायाचा त्यांनी श्रीगणेशा केला. काही वर्षांत हा व्यवसाय चांगलाच वाढीस लागला. पाच हजार मूर्तींपर्यंत जाऊन पोहोचला. तेव्हापासून व्यवसाय करण्याची वृत्ती प्रदीप ताम्हाणे यांच्या मनात निर्माण झाली. विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर लहानपणापासूनच संशोधक वृत्ती असल्याने एका कंपनीत ८०० रुपये पगारावर त्यांनी नोकरी सुरू केली. औषधी गोळ्यांवरील रंगीत आवरण तयार करणाऱ्या एका अमेरिकन कंपनीच्या लंडनस्थित शाखेत प्रदीप ताम्हाणे यांनी नोकरीची दुसरी इनिंग सुरू केली. अमेरिकन कंपनीत रेडीमिक्स पावडर औषधी गोळ्यांसाठी तयार करत असे. भारतातदेखील त्या कंपनीच्या उद्योगाचा विस्तार व्हावा आणि भारतात बाजारपेठ मिळावी, अशी इच्छा त्या कंपनीची होती. पण, त्या काळात या औषधी गोळ्यांना कोटिंग करणारी अद्यावत यंत्रणा भारतात नव्हती. त्यामुळे अमेरिकन कंपनीची फक्त १३ किलो पावडर भारतात विकली जायची, मात्र प्रदीप ताम्हाणे यांना कंपनीने निवडले. त्यावेळी ताम्हाणे यांनी प्रोडक्शन निर्मितीचा व्यवसाय सुरू केला, काही दिवसांतच पावडरविक्रीचे हे प्रमाण पाच हजार किलोंवर गेले. २५०० रुपये किमतीची रेडीमिक्स पावडर २५ ते ३० हजार रुपयांना विकली जाई. दरातील प्रचंड तफावत या कंपन्यांच्या लक्षात येत होती. याबाबत ताम्हाणे यांनी अमेरिकन कंपनी व्यवस्थापनाला याची वारंवार माहिती दिली. मात्र, असे तंत्रज्ञान पुरविणारी ती जगातील एकमेव कंपनी असल्याने कंपनी व्यवस्थापनाने ताम्हाणे यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. ताम्हाणे यांनी शोधून काढलेल्या वापराच्या तंत्रज्ञानावर लंडन येथे एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
“कोणताही व्यवसाय निवडताना त्याची संपूर्ण माहिती करून घेणे, येणाऱ्या समस्येवर दहा-बारा उत्तरे शोधून मार्ग काढणे, आपल्या उत्पादनाचा दर्जा इतरांपेक्षा जास्त कसा असेल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, त्याला धैर्याने सामोरे जावे, मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या उत्पादनापेक्षा वेगळे काय करू शकतो, याचा ध्यास घ्यावा, जे काय करायचे ते भारतात करावे, हे करताना प्रत्येकाने भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा.”  
 
अनेक देशांतील औषधनिर्मिती करणारे उत्पादक, तंत्रज्ञ त्या व्याख्यानास उपस्थित होते. या व्याख्यानाला ४५ मिनिटांत सादरीकरण करण्याची अट घालण्यात आली होती, मात्र ताम्हाणे यांचे व्याख्यान सुरू असताना उपस्थितांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यामुळे व्याख्यानासाठी देण्यात आलेली वेळ अपुरी पडली. अखेरीस ताम्हाणे यांना कंपनी व्यवस्थापनाकडून व्याख्यानाची वेळ वाढवून देण्यात आली. तब्बल साडेतीन तासांनंतर त्यांचे व्याख्यान संपले. उपस्थितांना ते व्याख्यान आवडले. भारतात कलर कोटिंगचे जे तंत्रज्ञान पुरवितो त्याची किंमत कमी करून घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असा विचार ताम्हाणे यांच्या मनात आला आणि त्यांनी भारतात विक्री होत असलेल्या कोटिंग पावडरचा असलेला प्रचंड दर कमी करावा, असे व्यवस्थापनाला सुचविले. मात्र, त्यासंदर्भातील ताम्हाणे यांचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच, “तुम्हा भारतीयांना आमचं तंत्रज्ञान आम्ही सांगू त्या किमतीत घ्यावंच लागेल,” असे अमेरिकी कंपनी मालकाने ठणकावले. याचवेळी भारताविषयी कायम अभिमान बाळगणाऱ्या ताम्हाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता, नोकरीचा राजीनामा अमेरिकन वरिष्ठांना सादर केला आणि कंपनीने दिलेल्या सर्व सुविधांचा त्याग करून पुन्हा मायभूमी गाठली.
 

 

अमेरिकन कंपनीला टक्कर देऊन इंग्लंडला तीन वर्षे नोकरी केलेल्या ताम्हाणे यांनी स्वत:ची भारतीय कंपनी सुरू करण्याचा ठाम निर्धार मनाशी केला. हा विचार ताम्हाणे यांनी आईवडील आणि त्यांच्या पत्नीला सांगितला. त्यांच्या कल्पनेला घरच्यांनी पूर्णत: पाठिंबा दिला आणि घरातल्या किचनमध्येच सुरू झाली एक प्रयोगशाळा. रात्री सगळ्यांची जेवणे उरकल्यानंतर रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत ही प्रयोगशाळा चाले. दीड महिन्यांच्या अविश्रांत संशोधनानंतर यश मिळालं आणि अखेरीस रेडीमिक्स पावडरचं तंत्रज्ञान भारतात विकसित झालं. प्रदीप ताम्हाणे यांनी भारतात परत येऊन विनकोट कलर्स अॅण्ड कोटिंग प्रा. लि.नावाची स्वतःच्या मालकीची कंपनी जिद्दीच्या जोरावर सुरू केली. आजमितीला कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या उद्योगसमूहात सध्या ६५ जणांना नोकरीची संधी मिळाली आहे. विनकोट कंपनी म्हणजे एक कुटुंबच. या ठिकाणी येणाऱ्या कामगाराला घरगुती वातावरणात काम केल्यासारखे वाटावे, असे वातावरण आहे. कंपनीला जास्त फायदा झाला तर तो अधिकारी कर्मचार्यांपासून ते अगदी कंपनीच्या सुरक्षारक्षकापर्यंत देण्यात येतो. कंपनीत येणारा कामगार हा कार्यक्षम राहावा यासाठी विशेष लक्ष पुरवण्यात येते. संध्याकाळी कामाची वेळ संपल्यानंतर कामगाराला जास्त वेळ थांबविले जात नाही. त्याने जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसोबत घालवला पाहिजे, याकडे ताम्हाणे यांचा कटाक्ष असतो. एकेकाळी पत्र्याच्या घरात राहणारे कामगार आता फ्लॅटमध्ये राहतात, हेदेखील कंपनीच्या यशाचे ‘गुडविल’च म्हणावे लागेल.
 

- श्रीकांत खाडे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.