जगण्याची क्वालिटी टेस्टिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 

 

प्रत्येकाला त्याचा एक स्वत:चा ‘फॅमिली डॉक्टर’ असतो. एकविसाव्या शतकात ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना बदलण्याचे काम एका ध्येयवेड्या कंपनीने केले. त्या कंपनीचे नाव म्हणजे ‘एन्व्हायरो केअर.’ ‘एन्व्हायरो केअर लॅब’ आज टेस्टिंग उद्योगातील मापदंड मानली जाऊ लागली आहे. केवळ व्यवसायाचेच नव्हे, तर जगण्याचे नवे मंत्रदेखील ती देऊ पाहत आहे.


उद्योजकाचे नाव : निलेश अमृतकर

कंपनीचे नाव : एन्व्हायरो केअर लॅब

कंपनीची सेवा : एनालिटीकल टेस्टिंग

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

प्रेरणास्त्रोत : कै. सुरेश अमृतकर

कर्मचारी संख्या : २००

भविष्यातील लक्ष्य : उलाढालीच्या ३० टक्के अधिक

 

‘निरोगी आरोग्य’ ही संकल्पना उपचारांपुरती मर्यादित न राहता आता निरोगी आरोग्यासाठी निरोगी वातावरण, पर्यावरण, अन्न इत्यादी अनेक घटकांची एकत्रित परिणीती व्हावी लागते. आपण जे श्वसन करतो, आपण जे खातो, ते दर्जात्मक आणि निरामय आहे की नाही, हे शोधून काढण्याचा ध्यास ‘एन्व्हायरो केअर लॅब’ने घेतला. अन्न, पाणी, मातीपासून ते थेट आवाजापर्यंतचे तंत्रशुद्ध विश्लेषण करायचे काम ‘एन्व्हायरो केअर लॅब’ करते. सुरेश रामदास अमृतकर यांनी १९७४ साली कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. सुरेश अमृतकरांच्या नेतृत्वाखाली ‘एन्व्हायरो केअर’ची विजयी घौडदौड सुरू होती. यादरम्यान निलेश अमृतकर हे त्यांचे सुपुत्र सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये एम.एससी करून पीएच.डी करत होते. पीएच.डी नंतर बायोकॉन कंपनीत एक्झिक्युटिव्ह सायंटिस्ट म्हणून नोकरी केली. सुरेशरावांचा आग्रह होता की, परांपरागत आलेल्या उद्योगात पुढची पिढी सहभागी होण्यापूर्वी तिने कुठेतरी नोकरी करून सर्वप्रथम अनुभव गाठीशी घेण्याची गरज आहे. ‘एन्व्हायरो केअर’ ही स्वत:ची कंपनी असतानादेखील आपल्याला शिक्षणानंतर थेट त्या कंपनीत वडिलांनी काम करण्याची संधी दिली नाही, याचे निलेश अमृतकरांना सुरुवातीला दु:ख वाटले. मात्र, २००४ साली त्यांनी जेव्हा ‘एन्व्हायरो केअर’मध्ये कामाची सुरुवात केली, तेव्हा प्रत्येक निर्णय प्रक्रियेत पूर्वी केलेल्या नोकरीच्या अनुभवांचा फायदा त्यांना होऊ लागला व सुरेशरावांचा धोरणी निर्णय किती दूरदर्शी होती याची जाणीव त्यांना झाली.

“दर्जा, ध्येयवेडेपणा, कामाप्रती बांधिलकी असल्याशिवाय कुठलाही उद्योग उभा राहू शकत नाही. जगासमोर स्वत:ला आधी सिद्ध करावे लागते,तरच जग तुमची दखल घेते. त्यामुळे स्वतंत्रपणे उभे राहण्याचा निश्चय नवउद्योजकांनी करायला हवा. स्वतंत्रपणे उभे राहत असताना मात्र कुणाला तरी गुरुस्थानी मानणे आवश्यक आहे.”

सन २००४ साली निलेश अमृतकरांनी कंपनीत कामाला सुरुवात केली. मात्र, अवघ्या दोन वर्षांत म्हणजे सन २००६ मध्येच त्यांचे पितृछत्र हरपले. त्या दोन वर्षांत जागतिक बँकेच्या एका अवाढव्य प्रकल्पावर काम करण्याची संधी निलेश अमृतरकरांना मिळाली. मादागास्कर देशातील एन्व्हायर्नमेंटल मॅपिंग’चे काम ‘एन्व्हायरो केअर लॅब’ला मिळाले. हे काम अत्यंत दर्जात्मक पद्धतीने ‘एन्व्हायरो केअर’ने पूर्ण केले. युरोपियन स्टॅण्डर्ड चांगला दर्जा ‘एन्व्हायरो केअर’ने या कामात दिला. एका कामासाठी निलेश अमृतकर यांनी मादागास्करचा १७ हजार किमीचा प्रवास केला. या एका कामामुळे त्यांना प्रचंड शिकायला मिळाल्याचे ते सांगतात. हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपली सगळी स्थावर मालमत्ता गहाण ठेवली होती. काम तर यशस्वी झाले, मात्र पितृछत्र हरपल्याने एक पोकळी निलेशरावांच्या आयुष्यात जाणवत होती. त्यातच लॅबचे काम तोट्यात जाऊ लागले. तरीही न डगमगता नवनवीन आव्हानांचा शोध निलेश अमृतकरांनी घेतला. २००६ साली फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अॅक्ट आला. या कायद्यामुळे अनेक कंपन्या तसेच संस्थांना विविध प्रकारच्या चाचण्या करून घेणे भविष्यात बंधनकारक होईल, हे विचारात घेऊन ‘एन्व्हायरो केअर लॅब’ने आपला एनालिटीकल टेस्टिंग लॅब विषयातील पसारावाढवत नेला. निलेश अमृतकर आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी एक नवीन मशीन विकत घेत. व्यवसायात चढउतार येतच राहिले. मात्र, ‘क्वालिटी टेस्टिंग म्हणजे एन्व्हायरो केअर लॅबअसा प्रतिशब्द रुढ होऊ लागला. निलेश अमृतकर नेहमी म्हणतात, “आपल्या तिरंग्यात जे तीन रंग आहेत; त्यांना त्याग, भरभराटी व शांती यांची प्रतिके म्हणून ओळखले जाते. नव्या जगात मात्र या रंगांचा अर्थ वेगळ्या अर्थाने रुढ करण्याची गरज असून विश्वास, आनंद आणि दर्जा म्हणजेच ‘भारतीय तिरंगा’ असा आदर्श जगासमोर उभा राहायला हवा.

 
 

 

‘एन्व्हायरो केअर लॅब’ आज २००हून अधिक तज्ज्ञ लोकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देत असताना पुणे, बंगळुरू व ठाणे येथे आपल्या मोठ्या लॅबच्या माध्यमातून दिवसाला जवळपास २०० सॅम्पलचे टेस्टिंग करत आहे. याचबरोबर भारतात १५ ठिकाणी कंपनीच्या लॅब असून तिथे टेस्टिंगचे सॅम्पल स्वीकारले जाते. ‘टिसा’, प्रमोद हळबे यांच्यासारख्यांमुळे जगण्याची नवी प्रेरणा मिळत राहिली, असे नम्रपणे निलेश अमृतकर कबूल करतात. कंपनीला आतापर्यंत इंदिरा गांधी प्रियदर्शनी अॅवॉर्ड, स्कॉच अॅवॉर्डसारखे दर्जेदार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे करत असताना कंपनी २००१ पासून स्टुडंट इंटर्नशीप प्रोग्रॅमराबवत आहे. मुंबई विद्यापीठाच्या एम.एससी एन्व्हायर्नमेंटलमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला ‘सुरेश अमृतकर एन्व्हायरो केअर पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. त्याचबरोबर ‘एन्व्हायर्नमेंट मॅनेजर’ म्हणून काम करत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या नावाने १ हजार ६०० झाडे लावून एक वेगळा गौरव करणे व त्यांना ‘एन्व्हायरो केअर ग्रीन अवॉर्ड’ देणे असे उपक्रम २००२ सालापासून कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत.
 

-भटू सावंत

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@