दूरदृष्टीचा ‘विजय’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
जुन्नर तालुका म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची जन्मभूमी म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा एक स्वाभिमानी कप्पा इथे जपला गेला आहे. कारण, हे ठिकाण आहे शिवजन्मभूमीचे. या सर्व गुणसंपदेचे उत्तम उदाहरण म्हणून आज आपल्याला डोंबिवली येथील ‘हॉटेल बल्लाळेश्वर’चे मालक विजय बबन गावडे यांच्याकडे पाहाता येते. त्यांनी अल्पावधीत साधलेली ही प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे.
 

उद्योजकाचे नाव : विजय बबन गावडे

कंपनीचे नाव : हॉटेल बल्लाळेश्वर ग्रुप, डोंबिवली

कंपनीची सेवा : महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ

व्यावसायिक कार्यक्षेत्र : मुंबई, ठाणे, पुणे

वार्षिक उलाढाल : ६ कोटी

प्रेरणास्त्रोत : बबन गावडे, शशिकांत खामकर

कर्मचारी संख्या : १७०

भविष्यातील लक्ष्य : २०१९ पर्यंत १०१ शाखा

 

जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे विजय यांचा जन्म झाला. कौटुंबिक पार्श्वभूमी तशी बेताचीच. सामान्य शेतकरी कुटुंब असलेल्या या घराण्याची दूरदृष्टी मात्र फार अफाट. विजय यांचे आजोबा मारुती गावडे यांनी शेती व्यवसायाला पूरक असा काहीतरी जोडधंदा असावा, असा विचार त्यांनी कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना त्या काळात केला. त्यातूनच त्यांनी गावातच एक छोटेखानी हॉटेल सुरू केले आणि त्याच हॉटेलमध्ये पुढे विजय यांच्या वडिलांनी म्हणजे बबन गावडे यांनी सुधारणा केलीविजय यांनी शालेय जीवनापासूनच वडिलांना याकामी मदत करावयास सुरुवात केली. त्यातूनच त्यांचे व्यावसायिक ज्ञान प्रगल्भ होण्यास मदत झाली. या प्राप्त होणार्‍या ज्ञानाबरोबरच त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत विजय यांच्यासह त्यांचे दोन भाऊ गजानन आणि राजाराम हेदेखील याच व्यवसायात आले.

 

गावपातळीवर यशस्वी ठरलेल्या अन्नपदार्थांची चव गावाबाहेरील नागरिकांनाही चाखता यावी आणि आपल्या अंगभूत कौशल्यांना वाव मिळावा यासाठी विजय यांनी गावाच्या वेशीचे सीमोल्लंघन केले. त्यावेळी त्यांच्याकडे भांडवल होते, ते फक्त उत्तुंग स्वप्न आणि त्याला पूर्ण करण्याच्या दुर्दम्य निर्धाराचे. याकामी साहजिकच त्यांना घरच्यांच्या विरोधाचा सामनाही करावा लागला. मात्र, म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, त्याप्रमाणे त्यांना स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मोलाची मदत केली ती त्यांची पत्नी किशोरी, मोठे बंधू गजानन, आई शांताबाई व मामा संतोष यांनी. सीमोल्लंघनानंतर त्यांनी श्रीक्षेत्र ओझर येथे आपल्या नवीन हॉटेलचा शुभारंभ केला. चवदार अन्नपदार्थ, गुणवत्ता आणि आपुलकीपूर्ण सेवा यांमुळे त्यांचे हे हॉटेल कमी कालावधीतच पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. आयुष्याच्या याच टप्प्यावर विजय यांच्या जीवनात जीवन मार्गदर्शकाच्या रूपाने शशिकांत खामकर आले. त्यांनी दिलेले मार्गदर्शन, वाढविलेला आत्मविश्वास यांची शिदोरी घेऊन विजय यांनी थेट मुंबई गाठली आणि डोंबिवलीमध्ये ‘हॉटेल ‘बल्लाळेश्वर’ कालांतराने उभे राहिले.

 
"परिश्रम, ध्येयनिष्ठा आणि सचोटी हीच यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जवळचे लोक आपल्याला नक्कीच संकटकाळात मदत करतात. यशस्वी उद्योजक होण्यासाठी दूरदृष्टी ठेऊन नेहमी काहीतरी करत राहा. यश मिळो अथवा न मिळो, अनुभव नक्कीच मिळतो."
 

मुंबईत आल्यावर विजय यांना भांडवलासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, बल्लाळेश्वराच्या कृपेने नातेवाईक, मित्रपरिवार मदतीला आला. त्यांच्याकडून उसनवारीवर पैसे घेऊन त्यांनी आपली आर्थिक चिंता मिटविण्याचा प्रयत्न केला. विविध प्रकारच्या दबावांचा सामना त्यांना आपल्या व्यवसाय उभारणीत करावा लागला. मात्र, या सगळ्यांत सुखावणारी बाब होती ती म्हणजे त्यांना ग्राहकांची कमतरता कधीही भासली नाही. चविष्ट आणि उत्तम सेवा यांच्या बळावर त्यांनी मुंबईत स्वत:चा एक खास ग्राहकवर्ग तयार केला. त्यामुळे मुळातच परिश्रम आणि सचोटी यांचे इंधन असणार्या या व्यवसायाने मोठा आकार घेण्यास सुरुवात केली आणि केवळ दीड वर्षात या हॉटेलच्या मुंबईमध्ये २० शाखा सुरू झाल्या

 
मात्र, ध्येयासक्तीने कधीही प्रवास थांबवता कामा नये, या विचारसरणीनुसार विजय यांचा डिसेंबर २०१९ पर्यंत महाराष्ट्रात १०१ शाखा सुरू करण्याचा मनोदय आहे. तसेच, ओझरपासून सुरू केलेले हॉटेल मुंबईमार्गे जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न विजय गावडे करत आहेतच. यामागे केवळ ‘स्वविकास’ हा संकुचित दृष्टिकोन विजय यांनी बाळगला नाही, हे विशेष. विविध फ्रँचायजी निर्माण करून त्यांना हा विकास साधावयाचा आहे. यातून उद्योजकवाढीस चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास त्यांना आहे.
 
 
 

 

‘हॉटेल बल्लाळेश्वर’ हे मराठमोळ्या पदार्थांचे माहेरघर. ‘घराबाहेरचे घर’ असे या हॉटेलला म्हटले तरी वावगे ठरणार नाही. घरगुती चवीचे, घरगुती मसाल्यांचे पदार्थ या हॉटेलच्या ग्राहकांना ब्रह्मानंदी टाळीचा अनुभव देतात. फरसाण, स्पेशल मिसळ, उपवासाची मिसळ, पुरी भाजी, मूगभजी असे न्याहारीचे पदार्थ या हॉटेलची खासियत. म्हणूनच हे हॉटेल खडज ९००१:२०१५ प्रमाणित आहे. ‘घेई भरारी आकाशी, तरी पाय माझे जमिनीवरी’ या उक्तीनुसार विजय गावडे समाजातील असधन घटकांना मदत करण्यात सदैव आघाडीवर असतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाद्यपदार्थांचे वाटप त्यांच्यामार्फत नियमितपणे केले जाते. तसेच भविष्यात शेतकरी पुत्रांनी हॉटेल व्यवसायात यावे यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. गावडे यांना विनर्स चॅरिटेबल ट्रस्ट, ऐरोली यांनी बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड, आधार पतसंस्था, डोंबिवली यांनी उद्योगरत्न पुरस्काराने, अर्थसंकेत ऑनलाईन वृत्तपत्राने बीएसईमध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय ब्रॅण्ड, बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या अलौकिक कार्याबद्दलच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 

- प्रवर देशपांडे

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@