लॅब इंडिया : यशाचे पृथक्करण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
 
जगातील २२ देशांत कार्यविस्तार, अकराहून अधिक कार्यालये आणि साडेतीनशे कोटींहून अधिक उलाढाल हा झाला ‘लॅब इंडिया’चा वर्तमान. रत्नागिरीमधील नांदिवडे गावात भिक्षुक असलेल्या शंकर बापट यांचे चिरंजीव श्रीकांत बापट यांचा उद्योजक म्हणून झालेला प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. ‘डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग’ केल्यानंतर श्रीकांत बापट यांनी १९६८ ते १९८२ या चौदा वर्षांत विविध औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये नोकरी केली आणि १९८२ साली ‘लॅब इंडिया’ची मुहूर्तमेढ रोवली.
 

उद्योजकाचे नाव : श्रीकांत बापट

कंपनीचे नाव : लॅब इंडिया इन्स्ट्रूमेंट प्रा. लि.

कंपनीचे उत्पादन : अॅनालिटिकल इन्स्ट्रूमेंट्स

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : साडेतीनशे कोटी रुपये 

प्रेरणास्त्रोत : शंकर बापट व पार्वती बापट

कर्मचारी संख्या : ३८०

भविष्यातील लक्ष्य : ५०० कोटींचा टप्पा

 

संशोधन, प्रगती, दर्जा नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल), कृत्रिम व विज्ञान विषयक पृथक्करणासाठी लागणारी अग्रेसर उपकरणांची विक्री तसेच विविध रासायनिक, औषधे तयार करणारे उद्योग व पेट्रोकेमिकल उद्योगधंद्यासाठी लागणारी उत्पादने, जगात अग्रेसर असणाऱ्या ब्रुकर (Bruker), सीईएम (CEM), लीमन (Leeman), कोयलर (Koehler), कॅनॉन (Cannon) इ. कंपन्या या उपकरणांची निर्मिती ‘लॅब इंडिया’तर्फे केली जाते. या उपकरणांची विक्री व त्यानंतरची सेवा संपूर्ण भारतभर ‘लॅब इंडिया’ कंपनीतर्फे पुरविली जाते. याचबरोबर नवी मुंबईत ‘लॅब इंडिया’ने स्वत:च्या उत्पादनाचे कारखाने उभे करून पृथक्करणात्मक उपकरणे तयार केली आहेत१४ वर्षे नोकरीत घालवल्यानंतरही स्वत:चा व्यवसाय असावा, हे स्वप्न श्रीकांत बापट यांनी मनाशी बाळगले होते. नोकरीतील चाकोरीबद्ध कामाचा त्यांना कंटाळा आला होता. पृथक्करणात्मक उपकरणे तयार करणाऱ्या परदेशी कंपन्यांची उपकरणे भारतात विक्री करण्याचे काम सुरुवातीला त्यांनी सुरू केले. मात्र, एक ना एक दिवस दुसऱ्याची उत्पादने विकण्यापेक्षा स्वत:ची उत्पादनेउत्पादित करावी लागतील, अशी खूणगाठ बापट यांनी मनाशी बांधली. ‘लॅब इंडिया’चे काम म्हणजे दर्जात्मक काम, असा बोलबाला उद्योगजगतात झाला होता. याचा वापर करून ‘लॅब इंडिया’ने मग स्वत:चे उत्पादन सुरू केले. याप्रसंगी भांडवल उभे करणे जिकरीचे गेले असले, तरी ‘लॅब इंडिया’चा इतिहास पाहून अनेक बँकांनी त्यांना मदतीचा हात दिला. आज ‘लॅब इंडिया’ साडेतीनशे कोटींचा टप्पा पार करत असताना त्यांना पाचशे कोटींचे ध्येय खुणावत आहे.

 
"अनुभवाशिवाय उद्योगात पदार्पण करू नका. प्रसंगी काही वर्ष नोकरी करावी लागली तरी आधी अनुभव गाठीशी बांधावा. संशोधन, दर्जा आणि कामात झोकून देणे ही त्रिसूत्री अवलंबली, तर उद्योगजगतात खंबीरपणे उभे राहता येते. बदलत्या जगाचा वेध घेऊन नव्या जगाला काय हवे, ते आपल्या व्यवसायातून उभे करता येईल का, याची चाचपणी सतत करायला हवी, तरच उद्योजक दीर्घकाळ टिकून राहतो."

उद्योग उभा करताना बापट यांना कुटुंबाचा मोठा आधार व पाठबळ लाभले. बापट यांची दोन्ही मुले इंजिनिअरिंग होऊन आता ‘लॅब इंडिया’च्या कामात हातभार लावत आहेत. आजघडीला ‘लॅब इंडिया’ने त्यांच्या एकूण व्यवसायातील ६० टक्के व्यवसाय स्वत:च्या उत्पादनातून व ४० टक्के व्यवसाय हा इतरांनी उत्पादितकेलेल्या उत्पादनांच्या विक्रीतून उभा केलेला असला तरी स्वत:च्या उत्पादनांची टक्केवारी वाढवणे हे ध्येय ‘लॅब इंडिया’ समोर असून भविष्यात जैवविज्ञानामध्ये कंपनी अधिक लक्ष पुरवणार आहे. ‘लॅब इंडिया’च्या उत्पादनांची सध्या ४३ देशांत विक्री केली जाते. अत्याधुनिक संशोधन व दर्जेदार उपकरणांमुळे जर्मनीसारख्या देशातही ‘लॅब इंडिया’ची उत्पादने गेल्या नऊ वर्षांपासून निर्यात होत आहेत.

 
 
 
 
 
 

उद्योगक्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या ‘लॅब इंडिया’ने सामाजिक क्षेत्रातदेखील बहुमोल योगदान दिले आहे. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील कनिष्ठ महाविद्यालय व शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘लॅब इंडिया’चे अनन्यसाधारण योगदानआहे. पुण्याच्या एस. पी कॉलेजच्या बी. व्ही. भिडे फाऊंडेशनबरोबर ‘लॅब इंडियाच्यावतीने अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यासाठीही ‘लॅब इंडिया’ मदत करते. ‘रोटरी क्लब ऑफ ठाणे’च्या माध्यमातून तसेच ‘टीसा’ व ‘टीएमए’ यांच्या सहकार्याने विविध समाजोपयोगी व उद्योगविषयक कामांमध्ये बापट यांचा सक्रिय सहभाग आहे. बापट यांनी ‘इंडियन अॅनालिटीकल इन्स्ट्रूमेंट असोसिएशनचीदेखील स्थापना केली व गेली १४ वर्षे ते या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ‘ठाणे गुणिजन,’ ‘ठाणे भूषण’, ‘उद्योगश्री’ आदी पुरस्कारांनी श्रीकांत बापट यांना सन्मानित करण्यात आले आहे. ठाण्याच्या सांस्कृतिक क्षितीजावर कार्यरत असलेल्या ‘इंद्रधनू’ संस्थेच्या सल्लागार समितीवरही श्रीकांत बापट कार्यरत आहेत. आपल्या व्यवसायात असे हे यशाचे पृथक्करण करणाऱ्या ‘वेल्थ क्रिएटर’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

- भटू सावंत

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@