जिद्द उद्योगभरारीची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
रोजगार निर्मिती’ हा शब्द जितका ऐकायला सोपा वाटतो, तो खऱ्या अर्थाने तितकाच कठीण. दोन जणांना जरी रोजगार देण्याचा आपण विचार केला, तरी त्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल उभं करणं किंवा त्यासाठी आवश्यक सामग्री उभी करणं हे खऱ्या अर्थाने मोठं आव्हानच. हे आव्हान पेलणाऱ्या सामान्य घरातून मोठी स्वप्नं घेऊन आलेल्या अशाच एका अवलियाच्या ‘वेल्थ क्रिएशन’ची ही कहाणी...
 

उद्योजकाचे नाव : एस. अखिलेश्वरन

कंपनीचे नाव : ग्लेनफिन केमिकल्स प्रा. लि.

कंपनीचे उत्पादन : औषधातील घटक

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : ६० कोटी

प्रेरणास्त्रोत : स्वयंप्रेरणेतून स्फूर्ती

कर्मचारी संख्या : १२५

भविष्यातील लक्ष्य : कंपनीचा विस्तार करणे

 

एस. अखिलेश्वरन पालघर जिल्ह्यातलं तसं परिचयाचं नाव. पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ‘ग्लेनफिन केमिकल्स प्रा. लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. पाहता पाहता आज या कंपनीने अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. अवघ्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन सुरू झालेल्या या कंपनीमध्ये आज तब्बल सव्वाशे कर्मचारी कार्यरत आहेत. अखिलेश्वरन आणि ग्लेनफिन कंपनी यांची पार्श्वभूमीही तशी रंजकच.

 

अखिलेश्वरन यांचा जन्म तामिळनाडूतील एका गावात झाला. मात्र, त्यानंतर त्यांचं बालपण मुंबईतील अंधेरी परिसरात गेलं. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण होली फॅमिली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून, तर महाविद्यालयीन शिक्षण अंधेरीतील भवन्स महाविद्यालयातून आणि अभियांत्रिकीचं शिक्षण व्हीजेटीआय महाविद्यालयातून पूर्ण केलं. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अखिलेश्वरन यांच्या मनात पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं करण्याची, स्वत:चा उद्योग सुरू करण्याची इच्छा होती. परंतु, वडिलांनी नोकरी करण्याच्या दिलेल्या सल्ल्यापुढे कसं जायचं, हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक भारतीय कंपन्यांमध्ये आपलं अमूल्य योगदान दिलं. याच काळात त्यांचा संपर्क आला तो कंपनीचे विद्यमान संचालक एम. व्ही. संघवी यांच्याशी. त्याचवेळी संघवी यांनी त्यांच्यापुढे एकत्रित एखादा उद्योग सुरू करण्याची संकल्पना मांडली. स्वत:चा उद्योग सुरू करण्याची इच्छा उराशी बाळगलेल्या अखिलेश्वरन यांनीदेखील लगेच त्याला होकार दिला आणि त्यांनी आपलं पहिलं मेकॅनिकल वर्कशॉप भाईंदरमध्ये सुरू केलं. याच कालावधीत संघवी यांचे मित्र आणि विद्यमान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जे. एल. गुप्ता यांनीदेखील संघवी आणि अखिलेश्वरन यांच्यापुढे नवा छोटेखानी उद्योग उभारण्याची संकल्पना मांडली. यातूनच भाईंदरमध्ये जे. एल. गुप्ता, एस. अखिलेश्वरन, एम. व्ही. संघवी आणि एस. के. शिवरामकृष्णन यांनी मिळून एका छोट्या औषधांसाठी ड्रग्स तयार करणाऱ्या ‘ग्लेनफिन’ या केमिकल कंपनीची सुरुवात केली.

 
 "उद्योगधंद्यामध्ये उतरताना जोखीम ही असतेच. मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आव्हानांवर मात करत पुढे जात राहिले पाहिजे."
 

हळूहळू कंपनीला मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यांना भाईंदरमध्ये सुरू केलेला आपला उद्योग हा छोटा वाटू लागला. त्यानंतर त्यांनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९८८ साली एमआयडीसी तारापूरमध्ये एक जमीन विकत घेतली. परंतु, त्यावेळी भांडवलाचा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आणि विकत घेतलेल्या जागेत कंपनी कशी उभी करायची, हा विचार त्यांना भेडसावू लागला. दोन ठिकाणांहून कर्ज घेऊन आपली कंपनी उभी करता करता १९९२ साल उजाडलं. याच कालावधीत त्यांना अनेक उत्तम कर्मचाऱ्यांची साथ लाभली आणि पाहता पाहता त्यांनी आणखी दोन युनिट्स घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीने याच कालावधीत भरारी घेत आपली उत्पादनं युरोपीय देशांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केलीसुरुवातीला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सुरू झालेल्या या कंपनीत आज तब्बल सव्वाशे कर्मचारी कार्यरत आहेत. ग्लेनफिन कंपनीमध्ये आज क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, प्रॉडक्शन, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, अकाऊंट्स अशा निरनिराळ्या विभागांमध्ये हे कर्मचारी कार्यरत आहेत. एखाद्या व्यक्तीला आपल्या कंपनीत रोजगार मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव हे आपण केलेल्या मेहनतीची पोचपावती असल्याचं अखिलेश्वरन म्हणतात.

 
 
 

 

शून्यापासून सुरू झालेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल आज तब्बल ६० कोटींच्या घरात आहे. या संपूर्ण प्रवासात अनेक चढउतार आले, परंतु चारही मित्रांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. त्याचबरोबर प्रत्येकाच्या कुटुंबीयांचाही या प्रवासात मोलाचा वाटा होता, असं ते आवर्जून सांगतात. आगामी काळात याच परिसरात आणखी काही युनिट्स सुरू करण्याचा आपला विचार असून गेल्या अनेक वर्षांपासून आपण मेहनतीने कंपनीचे मोठे केलेले नाव आणि पुरवत असलेल्या क्वालिटी सुविधा अशाच यापुढेही सुरू ठेवणार असल्याचा विश्वास अखिलेश्वरन व्यक्त करतात. अशा या जिद्दीच्या जोरावर उद्योगभरारी घेणाऱ्या अवलियाला सलाम!
 

- जयदीप दाभोळकर

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@