पितांबरी : बस्स, नाम ही काफी है!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी!’ हे घोषवाक्य महाराष्ट्राला तसे सुपरिचितच.एखादा उद्योजक आपल्या अविश्रांत मेहनतीने कसे उज्ज्वल यश संपादित करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई. वामनराव प्रभुदेसाई या आपल्या वडिलांकडून उद्योजकतेचे बाळकडू घेतलेल्या रवींद्र प्रभुदेसाई यांनी अत्यंत परिश्रमाने ‘पितांबरी’चा डोलारा उभा केला.
 

उद्योजकाचे नाव : रवींद्र प्रभुदेसाई

कंपनीचे नाव : पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि.

कंपनीची उत्पादने : होम-हेल्थ केअर

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : १५० कोटी

प्रेरणास्त्रोत : कै वामनराव प्रभुदेसाई

कर्मचारी संख्या : १६०

भविष्यातील लक्ष्य : ५०० कोटींचा टप्पा

 

इंजिनिअर होण्याचे स्वप्न असताना काही अपरिहार्य कारणास्तव रवींद्र प्रभुदेसाई विज्ञान शाखेचे पदवीधर झाले. पुढे त्यांनी डी.बी.एम. देखील केले. सुरुवातीला डोंबिवलीतल्या बंद पडलेल्या ‘श्री इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन’ या ‘मोझॅक टाईल्स’ निर्मितीच्या कारखान्याला पुनर्जीवित करून रवींद्र प्रभुदेसार्ई यांनी आपल्या उद्योजकीय वाटचालीला सुरुवात केली. टाईल्स बनविण्याचा हा उद्योग मात्र अल्पजीवी ठरला. कोणत्याही परिस्थितीत उद्योजकच व्हायचे, असा वज्रनिर्धार केल्याने टाईल्सनंतर पुढील उत्पादन कुठले, असा प्रश्न प्रभुदेसाई यांना पडला. संघ शाखेत संघप्रमुख असताना शाखेच्या प्रसारासाठी अनेकांच्या घरी त्यांना संपर्कासाठी जावे लागत असे. तेव्हा घराघरांत तांब्यांच्या भांड्यांचा वापर लक्षणीय असल्याचे प्रभुदेसाई यांच्या लक्षात आले आणि तांब्या-पितळेचीच भांडी स्वच्छ करणारी एखादी पावडर निर्माण केली तर, असा एक अभिनव विचार प्रभुदेसाई यांच्या मनात डोकावला आणि पितळ म्हणजे ‘पित + तांबे’ म्हणजेच ‘पितांबरी’चा जन्म झाला. सुरुवातीला २ रुपये किमतीची १०० ग्रॅमची पाकिटे स्वत:च्या राहत्या घरी बनून विकण्याचा सपाटा त्यांनी लावला. बेल वाजवायची. ‘आमच्याकडे पितळेची भांडी लख्खं करणारी पावडर आहे.’ मग भांड मागायचं आणि स्वत: पावडर घासून भांड लखलखीत करून द्यायचं, अशा सामान्य विक्रेत्याच्या भूमिकेतून प्रभुदेसाई यांनी कामाला सुरुवात केली. अशा प्रकारच्या मार्केटिंगमुळे ‘पितांबरी’चे नाव प्रसिद्ध होऊ लागले. अनेक दुकानदारांना पावडर ठेवण्याची विनंती सुरुवातीला केली असता दुकानदारांनी त्याला नकार दिला होता. मात्र आता ग्राहकच दुकानदारांकडे ‘पितांबरी’ मागू लागल्याने दुकानदारांचीच ‘पितांबरी’साठी रीघ लागू लागली. रोजची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी हाती पाकिटं तयार करणे आता अशक्य होऊ लागले.

 
"जग जवळ येऊ लागले आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे अधिक डोळसपणे पाहा. उद्योगउभारणी करायला हवी. अनेक उद्योजक त्यांच्या राज्यापुरते मर्यादित राहतात. त्याऐवजी त्यांनी प्रादेशिकतेत न अडकता विश्वव्यापी व्हायला हवे. शेती उद्योगातील प्रक्रिया क्षेत्रातदेखील प्रचंड वाव आहे. उद्योगनिर्माणातच खरे राष्ट्रहित आहे. पैसे कमविण्यात लाज नसावी, परंतु तो पैसा सन्मार्ग आणि परिश्रमातून यायला हवा."
 

‘पितांबरी’ बाळसं धरत असतानाच पॅकिंग करण्यासाठीचे ऑटोमॅटिक मशीन घेतले ते सदोष निघाले आणि सुरुवातीलाच तब्बल साडेबारा लाखांचे नुकसान झाले. अशाच चढ-उतारांचा सामना करत ‘पितांबरी’चा प्रवास सुरू होता. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘केशवसृष्टी’ प्रकल्पासाठी वामनराव प्रभुदेसार्ई यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली व सगळी जबाबदारी रवींद्र प्रभुदेसाई यांच्यावर पडली. रवीजींनी आपल्या पूर्वानुभवावरून व बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षणावरून व्यवसायाला व्यापक व्यावसायिक नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला व ‘पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि.’ या नावाने स्वतंत्र कंपनीची नोंदणी करून त्याचे व्यवस्थापकीय संचालकपद हाती घेतले. कंपनीला व्यावसायिक आकार देत असताना त्यांनी कंपनीत ‘कोर ग्रुप’ संकल्पना रुजवली. क्वालिटी कंट्रोल, रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, मेन्टेनन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंगसारखे आठ विविध विभाग प्रभुदेसार्ई यांनी सुरू केले. २००३ साली कंपनीची वार्षिक उलाढाल नऊ कोटींच्या घरात होती. जागतिक मराठी परिषदेच्या एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येत्या आठ वर्षांत १०० कोटींची उलाढाल करेन, असा संकल्प प्रभुदेसाई यांनी सोडला आणि मग ‘पितांबरी’ला देशव्यापी व विश्वव्यापी बनविण्यासाठी ‘पितांबरी’च्या ध्येयवादी टीमने जोमाने काम सुरू केले. ‘दुसऱ्या कुणाशी तरी स्पर्धा करून श्रेष्ठत्व मिळत नाही, स्पर्धा स्वत:शीच असावी,’ असे सूत्र मानत ‘पितांबरी’ यशस्वी होत गेली. तांब्या-पितळेच्या पावडरपासून सुरू झालेला हा प्रवास मग चांदीच्या भांड्यांसाठीची रुपेरी पावडर, कुठल्याही धातूसाठी मेटल पॉलिश, पितांबरी डिश-वॉश लिक्वीड, पितांबरी डिश-वॉश बार, हायजिन ऑल फ्लोर क्लिन, चकाचक स्क्रबर, पितांबरी सॅनीट ऑल, क्लेंज पॉवर वॉश अशा विविध उत्पादनांनी ‘पितांबरी’चा पसारा वाढवण्यास सुरुवात झाली. हे करत असतानाच ‘पितांबरी’ने स्वत:ची होम केअर व हेल्थ केअर विभाग सुरू केले. त्यात वसुंधरा बेबी मसाज ऑईल, सुमंगल बाळगुटी, पंचरस पाचक चूर्ण, लहान मुलांसाठी जिनी टॉनिक आदी विविध उत्पादने या विभागातून निर्माण केली गेली. याचबरोबर दापोली येथे आयुर्वेदिक उद्यानाची निर्मिती व कृषिपर्यटनासाठीदेखील ‘पितांबरी’ने सुरू केले. एकीकडे ‘पितांबरी’चा पसारा वाढत असताना दुसरीकडे रवींद्रजी यांचे सुपुत्र परिक्षीत देखील आपले उच्च शिक्षण संपवत ‘पितांबरी’च्या सेवेत दाखल झाले.

 
 

 

उद्योगासोबतच सॅटर्डे क्लब, कराडे ब्राह्मण संघ, उद्योग अनुभव प्रतिष्ठान, लघुद्योग भारती, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती आदी सामाजिक तसेच व्यावसायिक संस्थांचे नेतृत्व करत एक अनोखी सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली. जवळपास दीडशे कोटींची उलाढाल असलेल्या ‘पितांबरी’त आज १४०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आजही ‘पितांबरी’ त्यांच्या एकूण नफ्यातील १० टक्के रक्कम समाजऋण समजत सामाजिक संस्थांना देते. रवींद्र प्रभुदेसाई यांना आत्तापर्यंत ‘उद्योगश्री’, ‘इंडस्ट्री मॅन ऑफ द इअर’, ‘ज्युवेल ऑफ टीसा’, ‘ठाणे आयकॉन’, ‘ब्राह्मण उद्योगरत्न’, ‘कोकण आयडॉल’ असे असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी वृषाली प्रभुदेसाई यांचादेखील खारीचा वाटा आहे.
 

- भटू सावंत

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


@@AUTHORINFO_V1@@