शून्यातून विश्व उभारणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
ग्रामीण भागातून, सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून, अल्प शिक्षण असतानाही एखादी व्यक्ती जर मुंबईसारख्या शहरात येऊन उद्योजक बनण्याची स्वप्ने पाहत असेल, तर त्या व्यक्तीने रमेश नाना म्हात्रे यांची कारकीर्द डोळ्यापुढे ठेऊन वाटचाल करायला हरकत नाही. ‘सचिन इम्पॅक्स’ ही जागतिक स्तरावर पोहोचलेली कंपनी शून्यातून उभे करणारे एक यशस्वी उद्योजक म्हणून रमेश म्हात्रे उद्योगजगतात परिचित आहेत.
 

उद्योजकाचे नाव : रमेश म्हात्रे

कंपनीचे नाव : सचिन इम्पॅक्स

कंपनीची उत्पादने : प्रेस कम्पोनंट्स, डाय, टूल्स

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

कर्मचारी संख्या : १५०

भविष्यातील लक्ष्य : ब्रॅण्ड जगभरात प्रस्थापित करणे

 

'एसी डिफ्युजरहे उत्पादन निर्माण करून, त्यामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करून त्याला जागतिक स्तरावर नेण्याचं काम रमेश म्हात्रे यांनी केलं. परंतु, ही सारी वाटचाल अशी सहजासहजी झालेली नाही. रमेश नाना म्हात्रे मूळचे अलिबागचे. अलिबागजवळच्या एका छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेले, तिथेच वाढलेले. त्यांनी तिथेच इयत्ता नववीपर्यंतचं शिक्षण घेतलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने तेव्हापासूनच म्हात्रे यांना मुंबईची ओढ लागली होती. परंतु, शाळेत नापास झाल्याशिवाय घरचे मुंबईला पाठवणार नाहीत, म्हणून रमेश म्हात्रे इयत्ता नववीत चक्क तीन पेपरमध्ये मुद्दाम नापास झाले. त्यानंतर मुंबईत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि १९६४ मध्ये कपड्याचे दोन जोड आणि खिशात साडेपाच रुपये एवढ्या ऐवजासह त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत ते त्यांच्या काकांकडे दादरला राहू लागले. त्यांनी म्हात्रे यांना वडाळ्यात एका कंपनीत कामाला ठेवलं. वयाच्या सोळाव्या वर्षी ते त्या कंपनीत घण मारण्याचं काम करू लागले. इतक्या कमी वयात हे असं काम करावं लागत असल्याने कित्येकदा मुंबई सोडून गावाला घरी पळून जाण्याचा विचारही केला. परंतु, तरीही ते नेटाने त्या कंपनीत काम करतच राहिले. दरम्यान, त्यांनी दादरच्या एका रात्रशाळेतही प्रवेश घेतला. त्यांच्या काकांनी त्यांना दुसऱ्या कंपनीत कामाला ठेवलं. तिथे दोन वर्षं आणि त्यानंतर आणखी एका कंपनीत चार वर्षं म्हात्रेंनी काम केलं. आता बऱ्यापैकी अनुभव गाठीशी जमा झाला होता. मुंबई समजू लागली होती. त्यानंतर १९७० मध्ये रमेश म्हात्रे ‘व्होल्टास’ कंपनीत रूजू झाले आणि तो दिवस त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.

 

"तुम्हाला जर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, तर अंगात चिकाटी हवी. या क्षेत्रात मेहनतीला मर्यादा नाहीत. त्यामुळे वाट्टेल तितकी मेहनत करण्याची तयारी हवी. तिसरी गोष्ट दर्जाच्या बाबतीत केव्हाही तडजोड करू नये. या तीन गोष्टी सांभाळल्या की, मग तुमच्यावर कितीही संकटं आली, तरी त्यांचा सामना करून तुम्ही यशस्वी होऊ शकता."


 

‘व्होल्टास’मध्ये ते ‘स्कील-१ मेकॅनिक’ म्हणून काम करत. या कंपनीत खूप काही शिकायला मिळाल्याचं म्हात्रे सांगतात. ‘व्होल्टास’मध्ये ‘सजेशन अॅवॉर्ड’ नावाची संकल्पना होती. त्यामध्ये कर्मचार्‍यांनी कंपनीला काही नव्या कल्पना द्याव्यात, ज्यातून कंपनीचा फायदा होईल, अशी पद्धत होती. त्या बदल्यात कंपनी बक्षीस म्हणून त्या कर्मचाऱ्याला काही रक्कम देई. पहिल्याच वर्षी म्हात्रेंनी हे बक्षीस पटकावलं. पुढे म्हात्रेंना या कंपनीत बरेच पुरस्कार, बक्षिसं मिळाली. या काळातच म्हात्रेंनी पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे १९७८ मध्ये त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात ते ‘व्होल्टास’मध्येही कार्यरत होतेच. ‘व्होल्टास’ कंपनीत म्हात्रेंनी सलग १८ वर्षे काम केलं. प्रेस कम्पोनट्स, डाय, टूल्स आदींची निर्मिती त्यांनी सुरू केली होती. ‘एल अॅण्ड टी’सारख्या काही मोठ्या कंपन्याही एव्हाना त्यांची उत्पादनं घेऊ लागल्या होत्या. ठाण्यात स्वतःचे तीन गाळेही त्यांनी विकत घेतले होते. १९९२ साली म्हात्रेंकडे एक अरब व्यावसायिक आला. त्याला काही मशीन्सचे टूल्स (साचे) हवे होते. म्हात्रेंच्या कंपनीचे उत्पादन पाहून तो प्रभावित झाला आणि त्याने म्हात्रेंना काही ठराविक साच्यांची ऑर्डर दिली. त्यावेळेस म्हात्रेंकडे निर्यातीचा, निविदा देण्याचा काहीही अनुभव नव्हता. तरीही त्यांनी धाडस केलं आणि त्या अरबाचा प्रस्ताव स्वीकारला. पुढे डेमो दाखविण्याच्या हेतूने म्हात्रे दुबईला गेले आणि येताना तब्बल ३० लाखांची ऑर्डर घेऊनच परतले! याच दरम्यान ‘एसी डिफ्युजर’ निर्मितीच्या क्षेत्रातही ते उतरले. अनेक तुकडे तुकडे जोडून बनवल्या जाणाऱ्या डिफ्युजरपेक्षा स्वस्तात बनणारा आणि आकर्षक, दर्जेदार अशा ‘वन पीस डिफ्युजर’ची कल्पना म्हात्रेंना सुचली. परंतु, त्याच्या उत्पादनासाठी तब्बल ५५ लाख रुपयांचा खर्च येणार होता. तेवढी त्याकाळी म्हात्रेंची एकूण निर्यातदेखील नव्हती. कसेबसे पैसे उभे करून त्यांनी ‘वन पीस डिफ्युजर’चे सॅम्पल बनवले. परंतु, उत्पादन यशस्वी होईल की नाही, याची धाकधूक होतीच. ही गोष्ट १९९४ ची. म्हात्रेंनी हे मोठंच धाडस केलं होतं. मोठ्या मुश्किलीने बनवलेलं सॅम्पल त्यांनी दुबईला पाठवलं आणि समोरून प्रतिसाद आला तो असे ५०० डिफ्युजर्स पाठविण्याचा! काही दिवसांत अशीच १००० डिफ्युजर्सची ऑर्डर आली. म्हात्रेंच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीला मिळालेली ती पोचपावतीच होती. त्यानंतर रमेश म्हात्रे या उद्योजकाने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही.

 
 
 

 

आज रमेश म्हात्रे यांच्या ’सचिन इम्पॅक्स’ कंपनीत दीडशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीची नवनवीन उत्पादने बाजारात येत आहेत, ती यशस्वीही होत आहेत. सुमारे ५७ देशांमध्ये म्हात्रेंनी व्यवसायानिमित्त प्रवास केला आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक कमावलेले म्हात्रे आपल्या मूळ गावाला विसरलेले नाहीत. गावासाठी अनेक सामाजिक कामे ते करत असतात. ज्या शाळेतून ते नववीपर्यंतचं शिक्षण घेऊन बाहेर पडले, त्या शाळेला त्यांनी संगणक भेट म्हणून दिले. “आज मी माझ्या गावात जेव्हा जातो, तेव्हा एक उद्योजक म्हणून अभिमानाने जातो,” असं म्हात्रे आवर्जून सांगतात. रमेश म्हात्रे यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

- निमेश वहाळकर

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 


@@AUTHORINFO_V1@@