ग्रामीण उद्योजकाची ‘कृपा’दृष्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |

 

 
 
 
 
उद्योग आणि उद्योजक फक्त शहरांतच बहरतात, या समजुतीला छेद दिला तो ‘कृपा हेअरटॉनिक’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेल्या राजन दळी या उद्योजकाने. किराणा मालाच्या दुकानापासून ते आयुर्वेदिक औषधी तेलांच्या लोकप्रियतेपर्यंतचा दळी यांचा प्रवास ग्रामीण उद्योजकांना सर्वार्थाने ‘कृपा’दृष्टीच प्रदान करणारा आहे. त्यांच्या या उद्यमशील जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
 

उद्योजकाचे नाव : राजन वसंत दळी

कंपनीचे नाव : कृपा औषधालय

कंपनीची उत्पादने : कृपा हेअरटॉनिक, स्नेहरुमा

व्यावसायिक कार्यक्षेत्र : महाराष्ट्र, गोवा, बेळगाव

वार्षिक उलाढाल : २ कोटी

प्रेरणास्त्रोत : आई-वडील

कर्मचारी संख्या : ५०

भविष्यातील लक्ष्य : देशभर उद्योगविस्तार करणे

 

गावाकडे उद्योग-व्यवसाय म्हटलं तरी स्वत:चे छोटेसे दुकान, गॅरेज किंवा असेच काही लघुउद्योग स्तरावरील उत्पादन-सेवा डोळ्यासमोर येतात. पण, राजन दळींसारख्या उद्योजकाने मात्र या लघुउद्योगाच्या पलीकडे झेप घेतली. गुहागरच्या दोपावे गावच्या राजन दळी यांच्या कुटुंबाचा किराणामालाचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यात राजन दहावीत असताना त्यांची आई वारली. गुहागरलाच कसेबसे बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचे स्वास्थ्यही ठीक नसायचे. त्यामुळे वडिलांना राजन यांनी शिक्षणासाठी दूरपर्यंत प्रवास करु नये, असे वाटे. ‘शिकून काय करणार, शेवटी हाच धंदा करणार,’ असे ते राजन यांना सांगत आणि अशा रीतीने दळीही मग किराणा व्यवसायाच्या दुकानात सामील झाले. त्यांच्या वडिलांचे केस खूप गळायचे. लवकर पिकायचे. त्यावर त्यांच्याच वडिलांनी संशोधन करुन, स्वत:वर प्रयोग करुन केसांसाठी एक तेल तयार केले होते. एक-एक लिटर तेल ते तयार करायचे आणि दाभोळ, गुहागर असे आजूबाजूच्या परिसरात विकायचे. ही बातमी दाभोळचे इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांना समजली आणि मग अण्णांनी प्रयत्न करुन दोन वर्षांनंतर तेलविक्रीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना मिळवला. नेमका, तो परवाना अशावेळी मिळाला जेव्हा दळी बारावी होऊन किराणा व्यवसायात पडणार होते. मग काय, दळी यांनीही मार्केटचा, मार्केटिंगचा कुठलाही अनुभव गाठीशी नसताना संगमेश्वर, दापोली, खेड येथे फिरुन तेलविक्री सुरु केली आणि ‘कृपा हेअरटॉनिक’ची इथेच पायाभरणी झाली.

 

कुठलाही ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी, बाजारात प्रस्थापित करण्यासाठी विपणन अर्थात मार्केटिंगच्या ‘स्मार्ट’ पद्धतींचा अवलंब करावा लागतोच. दळी यांनीही यशाचा हा मूलमंत्र वेळीच अवलंबला. गुणवत्तापूर्ण उत्पादनांबरोबर जाहिरातींवरही त्यांनी तितकेच लक्ष केंद्रीत केले. ‘कृपा हेअरटॉनिक’चा ब्रॅण्ड कोकणातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी दळींनी राज्यभरात पॅम्पलेट्स वाटप केले. शिवाय, ‘कृपा हेअरटॉनिक’ची गुणवैशिष्ट्ये संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गुणवत्ता रथही राज्यभरात फिरले. ‘सुगंधी नाही, औषधी तेल’ ही संकल्पना या प्रचाररथांमार्फत लोकांपर्यंत पोहोचविली जायची. याचा निश्चितच फायदा ब्रॅण्डच्या प्रतिमासंवर्धनात झाल्याचे दळी सांगतात. इतकेच नाही तर आजच्या जाहिरातयुगात टिकून राहण्यासाठी दळींनीही पैशाचा फारसा विचार न करता वृत्तपत्रातील चौपट किंमत मोजून जाहिराती करण्याचा धाडसी निर्णयही घेतला. त्यामुळे तेलांचे कित्येक ब्रॅण्ड आले-गेले, पण ‘कृपा हेअरटॉनिक’चा ग्राहकवर्ग मात्र कायम टिकून राहिला.

 
"मार्केटमधील आपली ‘स्पेस’ उद्योजकांनी शोधली पाहिजे. नकारात्मक दृष्टिकोन दूर ठेवा. त्यामुळे ज्याला उद्योग करायचाय त्याने पहिलं पाऊल टाकून सुरुवात केली पाहिजे. सुरुवात केली आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल, तर मागे वळून बघावे लागत नाही."
 

आगामी काळात उत्पादनांची श्रेणी वाढवणं, देशात तसेच जागतिक बाजारपेठेत पाऊल ठेवणं, वेबमार्केटिंगचा आधार घेऊन अधिकाधिक लोकांपर्यंत उत्पादन पोहोचविण्याचा दृढ विश्वास दळी व्यक्त करतातसध्या केसांसाठी ‘कृपा हेअरटॉनिक’, सांधेदुखीसाठी वेदनाशामक ‘स्नेहरुमा’ आणि ‘ट्विन टच’ ही तीन उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्रामीण भागात औषधी वनस्पतींची शेती करुन ताज्या वनस्पतींच्या माध्यमातून ‘कृपा औषधालया’ची सर्व उत्पादने बनवली जातात. ही औषधी वनस्पतींची शेती बघायला पर्यटकांनी-ग्राहकांनी आवर्जून यावं, असे आवाहनही दळी करतात. सध्याचा जमाना हा पर्यावरणपूरक उत्पादनांचा आहे. तेव्हा, ग्राहकांना काही तरी नवीन देण्याच्या उद्देशाने ‘भूमी पॉटरी’ या कंपनीच्या माध्यमातून दळी यांनी मातीच्या पणत्या, भांड्या, बाटल्या बाजारात दाखल केल्या असून अजून काही वस्तू येत्या काळात बाजारात आपल्याला दिसतील.

 
 
 

 

पण, शेवटी कुठलाही उद्योग हा त्या उद्योजकाच्या संकल्पनांना आकार देणाऱ्या कर्मचारीवर्गावरही तितकाच अवलंबून असतो. ‘कृपा औषधालया’तही असेच एकूण ५० कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये १५ पुरुष, तर ३०-३५ महिला दहावी-बारावी शिकलेल्या, पण प्रामाणिक अन् मेहनती कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांशी केवळ कामापुरते ‘प्रोफेशनल’ संबंध न ठेवता, त्यांनाही दळी आपल्याच कुटुंबाचा एक भाग मानतात. त्यांच्या अडीअडचणींना धावून जातात. कर्मचारीवर्गाबरोबरच समाजाप्रतीही दळी यांचे सामाजिक योगदान उल्लेखनीय म्हणावे लागेल. संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या महिला, शिक्षणापासून वंचित मुलं-मुली यांना ज्या-ज्या वेळेला मदत लागेल, त्या-त्या वेळेला छोटी-मोठी मदत त्यांना केली जाते. आरोग्य, शिक्षण, ग्रामविकासाची कामे, टँकरने पाणीपुरवठा आदी सामाजिक कामांसाठीही दळी मदतीसाठी सदैव तत्पर असतात. अशा या उद्यमशील, समाजभान जपणाऱ्या राजन दळींना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योग केंद्राचा जिल्हा प्रथम पुरस्कार, डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते कृष्णा मामा महाजन प्रतिष्ठानचा पुरस्कार, लोकल केमिस्ट असोसिएशनच्या उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तेव्हा, राजन दळींच्या या ग्रामीण उद्योगाच्या यशोगाथेचा आजच्या तरुणांनी आदर्श घेतल्यास निश्चितच एक आदर्श, सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहील, यात शंका नाही.
 

- विजय कुलकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@