‘डेअर इट वर्क’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 

 

एका पाचशे लोकवस्तीच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या नारायण पवार यांनी ‘जीएनपी ग्रुप’ या आज ५० कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीची बीजं आपल्या संघर्षमय आयुष्यात पेरली होती. ‘डेअर इट वर्क’ असे घोषवाक्य घेऊन ‘जीएनपी’ समूह काम करीत असून प्रत्येक कर्मचारी हा ‘जीएनपी’ समूहाचे नेतृत्व करतो आणि आज या कंपनीची ५०० कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल सुरू आहे.

 

उद्योजकाचे नाव : नारायण पवार, गिरीश पवार

कंपनीचे नाव : जीएनपी ग्रुप

कंपनीची सेवा : बांधकाम व सल्लागार

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : ५० कोटी

प्रेरणास्त्रोत : नारायण पवार

कर्मचारी संख्या : १००

भविष्यातील लक्ष्य : ५०० कोटींचा टप्पा

 

रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत बी. कॉमपर्यंतचे शिक्षण सातारा येथे घेतल्यानंतर नारायण १९७१ साली मुंबईत दाखल झाले. नारायण पवार यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे काहीसे अपंगत्व आले. मात्र, या अपंगत्वावर मात करत मुंबईत येऊन त्यांनी ‘एआयसीडब्ल्यूए’ची परीक्षा देत अकाऊंटिंग क्षेत्रात प्रदीर्घ कामगिरी केली. इन्कमटॅक्स, रेशन डिपार्टमेंट, अपोलो मिल यांसारख्या ठिकाणी नोकरी केल्यानंतर १९७६ साली करसल्लागार म्हणून आपल्या दुसऱ्या इनिंगची त्यांनी सुरुवात केली. पत्नी, चार मुली व एक मुलगा असा संसार हाकत असताना मुलांना उच्च शिक्षण दिले. १९९७ साली जावई व मुलाच्या मदतीने एनबी पवार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. ची मुहूर्तमेढ रोवली. खडकपाडा भागात पहिले मल्टिप्लेक्स व स्प्रिंगटाईम क्लब साकारला. मध्यमवर्गीय कुटुंब असूनही व गाठीशी उद्योगधंद्यासाठी लागणारा पैसा नसतानादेखील हाती घेतलेले स्पोर्ट्स क्लबचे काम लीलया पेलले. चिरंजीव गिरीश पवार यांना मात्र उंच भरारी घेण्याची आकांक्षा होती. त्यांनी २००५ नंतर ‘जीएनपी ग्रुप’ची उभारणी केली.

 

ठाणे, नवी मुंबई पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या उद्योग उभारणीसाठी उत्सुक असतात. प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यापूर्वी प्रकल्प उभा राहण्यासाठी दर्जेदार सल्लागार कंपनीची उद्योजकांना आवश्यकता असते. जमीन मिळवणे, विविध प्रकारच्या शासकीय परवानग्या प्राप्त करणे, कारखान्याची उभारणी करणे आदी कामे करण्यासाठी सक्षम सल्लागार असल्यास उद्योगउभारणी सोपी होते. ही गरज लक्षात घेऊन गिरीश पवार यांनी याच क्षेत्रात आपल्या कामाची सुरुवात केली. आजपर्यंत ३०० हून अधिक कंपन्यांसाठी ‘जीएनपी ग्रुप’ने उद्योग उभारणीसाठी मदत केली असून एक हजारांहून अधिक कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून आपली सेवा दिली आहे. एकीकडे सल्लागार म्हणून काम करीत असताना दुसरीकडे बांधकाम व्यवसायातदेखील ‘जीएनपी ग्रुप’ने गरुडभरारी घेतली. अंबरनाथ येथे ‘जीएनपी गॅलक्सी’ नावाने दिमाखदार बांधकाम उभे राहत आहे. कर्मचाऱ्यांपासून सुरुवात झालेल्या ‘जीएनपी’ समूहात आज १०० हून अधिक कर्मचारी काम करीत आहेत.

“कामाला सुरुवात करतानाच यशाच्या अपेक्षेने हुरळून जाऊ नये. संयम, कष्ट, विश्वासार्हता आणि निडर पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता बाळगणे आज प्रत्येक नवउद्योजकासाठी प्राथमिक गरज आहे. आपल्या क्षेत्रात भविष्यातील आव्हाने स्वीकारणे व सहकाऱ्यांना सतत प्रोत्साहित ठेऊन त्यांनादेखील आपल्या प्रगतीचा हिस्सा बनविणे आवश्यक आहे. यातूनच नवउद्योजक यशस्वी होऊ शकतात.” 

‘‘डेअर इट वर्क’ असे घोषवाक्य घेऊन ‘जीएनपी’ समूह काम करीत असून आमचा प्रत्येक कर्मचारी हा ‘जीएनपी’ समूहाचे नेतृत्व करतो आणि म्हणूनच आम्ही ५०० कोटींच्या उलाढालीची स्वप्नं पाहत आहोत,” असे ‘जीएनपी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक गिरीश पवार आवर्जून सांगतात. मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही, असा जो गैरसमज पसरवला जातो तो चुकीचा आहे. वास्तविक काम करणारेच यशस्वी होतात. तेथे जात, धर्म यांचे निकष नसतात. केवळ आणि केवळ कष्ट हेच उत्तम यशाचे सूत्र आहे. “परदेशातील अनेक समूह आज भारतात गुंतवणूक करून उद्योग उभे करत आहेत. त्यांना विश्वासार्ह सल्लागारांची आवश्यकता आहे आणि हीच गरज ‘जीएनपी ग्रुप’ पूर्ण करत आहे. मराठी असूनही कधीही नोकरीसाठी त्यांनी बायोडेटा टाईप केला नाही. नोकरी मागण्यापेक्षा मराठी माणसाने नोकरी देणारे व्हायला हवे,” असा विचार पवार यांच्याकडून व्यक्त केला जातो. मराठी माणूस लहानसे यशदेखील मिरवायला सुरुवात करतो. मात्र, तसे न करता उत्तुंग यशाकडे वाटचाल करायला हवी, असे सांगत नितीन पवार आपल्या वडिलांनी दिलेल्या आदर्शावर यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.

 
 
 

 

मध्यमवर्गीय मराठी कुटुंब असल्याने सुरुवातीला भांडवल उभे करण्यात परिश्रम घ्यावे लागले. प्रसंगी दागदागिने विकून उद्योग-व्यवसाय सुरू ठेवला. अत्यंत चिकाटीने काम केल्याने आज ‘जीएनपी ग्रुप’ दिमाखात उभा आहे. उद्योगांना जागा मिळवून देणे, कंपनी उभारणे तसेच या कामांसाठी सल्ला देण्याचे काम करीत असताना त्यात ‘जीएनपी ग्रुप’ने आपले स्वत:चे अस्तित्व आज सिद्ध केले आहे. ‘जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स’ने देखील त्याची दखल घेतली आहे. आजपर्यंत हाती घेतलेले प्रत्येक काम वेळेत व दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करण्याचा ‘जीएनपी ग्रुप’चा हातखंडा असल्याने या क्षेत्रात ‘जीएनपी ग्रुप’ वेगाने वाटचाल करीत आहे.

- भटू सावंत


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@