ग्राहकांचा विश्वास हेच भांडवल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 

 

मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाचा डोलारा उभा करणे आणि तो यशस्वीपणे वाढवणे हे शिवधनुष्य पेलण्याचे काम ‘पद्मजा एरोबायोलॉजिकल प्रा. लि.’ अर्थात ‘पीएपीएल’च्या माध्यमातून कंपनीचे संस्थापक व संचालक डॉ. नंदकिशोर जोशी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरुंधती जोशी यांनी केले आहे. ‘संतुष्ट ग्राहक हेच आमचे ध्येय’ मानणाऱ्या ‘पीएपीएल’चा महाराष्ट्रासह गोव्यातही विस्तार झाला आहे.

 

उद्योजकाचे नाव: डॉ. नंदकिशोर, आदित्य जोशी

कंपनीचे नाव : पद्मजा एरोबायोलॉजिकल प्रा. लि.

कंपनीची सेवा : पर्यावरण घटकांचे निरीक्षण

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत

वार्षिक उलाढाल : ६ कोटी

प्रेरणास्त्रोत : त्रिविक्रम जोशी

कर्मचारी संख्या : ४५

 

के. जी. सोमय्या महाविद्यालयात जोशी दाम्पत्य प्राध्यापकाची नोकरी करत होते. डॉ. नंदकिशोर जोशी यांनी भाभा अणु संशोधन केंद्रातून जैवतंत्रज्ञानातून, तर डॉ. अरुंधती जोशी यांनी रसायनशास्त्रातून पीएच.डी पूर्ण केली. त्यांचा प्राध्यापकाची नोकरी सोडून उद्योजकतेपर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांची पुढची पिढीही याच व्यवसायात आहे. अमेरिकेत रसायनशास्त्रात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आदित्य जोशी यांनी परदेशातील नोकरी सोडून कुटुंबाच्या व्यवसायाकडे लक्ष देण्याला प्राधान्य दिले आहे. आदित्य कंपनीच्या संचालक पदावर आहेत आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे कंपनीचे कार्यक्षेत्र आणखी विस्तारण्याकडे त्यांचा कल आहे. तीस वर्षांपूर्वी ठाणे-बेलापूर भागातील उद्योगधंद्यांचा जसजसा विस्तार होत होता, त्यानुसार आजूबाजूच्या उद्योगांना एका लॅबोरेटरीची आवश्यकता होती. महाविद्यालयात शिकवत असताना अनेक कंपन्या डॉ. जोशी यांच्याकडे विविध पदार्थ, उत्पादनांचा कच्चा माल आदींच्या तपासणीबाबत माहिती घेण्यासाठी येत असत. त्यातूनच कल्पना घेत, स्वतःची लॅबोरेटरी उभी करावी, अशी कल्पना त्यांना सुचली आणि ’पद्मजा लॅबोरेटरी’ या नावाने ही छोटी कंपनी त्यांनी स्थापन केली. कंपनीच्या कामकाजावर चांगला जम बसल्यानंतर १९८३ साली ’पद्मजा एरोबायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड’ (पीएपीएल) निर्माण झाली. प्रदूषण नियंत्रण आणि टेस्टिंग कंट्रोल असे सध्याचे उद्योगाचे स्वरूप आहे. यात जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आदींची कंपनीतर्फे चाचणी केली जाते. त्याचा अहवाल सादर करणे हे कंपनीचे प्रमुख कार्यक्षेत्र. याशिवाय सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या चाचण्याही कंपनीतर्फे केल्या जातात.

“मेहनतीशिवाय कुठल्याही क्षेत्रात पर्याय नाही. ‘पीएपीएल’तर्फे नवउद्योजकांना प्रशिक्षणही दिले जाते. त्यांनीही यशस्वी झाल्यावर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करावे.” 

‘पीएपीएल’ कंपनीला भारत सरकारची अधिस्विकृती आहे. ‘एनएबीएल’ या सरकारी संस्थेचीही अधिस्विकृती मिळाली आहे. तसेच, ‘आयएसओ:९००१’चे मानांकनही कंपनीला मिळाले आहे. ‘ओएचएसएएस’ या संस्थेचे सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र कंपनीने मिळवले आहे. मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात नोकरी करत असताना त्या काळात महाविद्यालयाच्या परवानगीने डॉ. जोशी यांनी एका लॅबोरेटरी कन्सलन्टसीची सुरुवात केली. त्यानंतर याच उद्योगातील अनेक व्यक्तींशी परिचय झाल्याने या क्षेत्रातच उद्योग करावा, अशी प्रेरणा त्यांनी घेतली. सुरुवातीला नोकरी सांभाळून व्यवसाय केल्याने घरातून तितकासा विरोध झाला नाही. डॉ. अरुंधती जोशी यांनीही व्यवसायाला हातभार लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर जम बसू लागल्यावर दोघांनीही निवृत्त होण्याचा निर्णय घेत पूर्ण वेळ व्यवसाय सांभाळण्याकडे लक्ष दिले. घरातील एका छोट्याशा जागेत सुरू केलेल्या कंपनीचे आज नवी मुंबईतील तुर्भे येथे कार्यालय आहे. कंपनीचे गोवा येथे एक युनिट सुरू होत आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी टीजेएसबी बँकेने आर्थिक पाठबळही देऊ केले आहे. डॉ. जोशी यांना मिळालेल्या भांडवलातून कंपनीचा विस्तार होण्यास मोठी मदत झाली.

 
 

 

‘पीएपीएल’ कंपनी गेली दहा वर्षे गोवा सरकारसह प्रदूषणासंबंधित विविध चाचण्या करत आहे. माती, पाणी, कचरा व्यवस्थापन आदी क्षेत्रांतील चाचण्या कंपनीतर्फे केल्या जातात. गोवा सरकारने कंपनीला राज्यात एक युनिट उभारण्याचे आवाहन केले. त्यानुसार गेल्या वर्षीपासून कंपनीतर्फे हे काम सुरू आहे. मडगावमध्ये कंपनीची नवी लॅबोरेटरी सुरू केली आहे. सरकारतर्फे जनजागृती केल्या जाणाऱ्या अन्न व खाद्य पदार्थ चाचणी संदर्भात दिले जाणारे ‘एफएसएसएआय’चे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात परवानगीबाबतची प्रक्रिया कंपनीतर्फे सुरू आहे. नवउद्योजकांच्या मदतीसाठी व या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाते. सेंटर फॉर एनव्हायर्नमेंटल रिसर्च अँड टेस्टिंग’ (सीईआरटी) या माध्यमातून कंपनीतर्फे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिकांमध्ये कंपनीतर्फे मदत केली जाते. नवउद्योजकांसाठी पर्यावरणासंबंधित बदलते नियम यांबाबत चर्चासत्राचे आयोजन, त्यांना मार्गदर्शन केले जाते. नवी मुंबईतील काही महिलांच्या गटाला कंपोस्ट खतनिर्मितीबाबत आणि कचरा व्यवस्थापनाबाबत कंपनीतर्फे प्रशिक्षण दिले जाते. हेच प्रशिक्षण शाळांच्या माध्यमातून जवळपास पाचशे कुटुंबीयांना देण्याचे काम कंपनी करत असून अनेक उद्योजकांचा आणि सरकारी संस्थांचा विश्वासही कंपनीने इतक्या वर्षांत मिळवला आहे.
 

-तेजस परब

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@