व्यवसाय हेच तत्त्व मानणारा उद्यमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 

 

‘तुमची कंपनी केवळ तुमच्या तत्त्वांनी ओळखली जावी,’ यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मोहन गुरुनानी यांनी ‘मोराज ग्रुप’ची सुरुवात केल्यानंतर काही वर्षांतच एक अग्रगण्य कंपनी म्हणून ‘मोराज ग्रुप’चे नाव घेतले जाऊ लागले. गुरुनानी यांचा प्रवास उद्योगजगताच्या तत्त्वनिष्ठतेबद्दल जास्त बोलतो. केवळ उद्योजकांनीच नव्हे, तर सामान्य माणसानेही आदर्श घ्यावा, असा हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास...

 

उद्योजकाचे नाव : मोहन गुरुनानी

कंपनीचे नाव : मोराज इन्फ्राटेक प्रा. लि.

कंपनीची सेवा : बांधकाम व्यवसाय

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत

वार्षिक उलाढाल : २०० कोटी

प्रेरणास्त्रोत : जेआरडी टाटा

कर्मचारी संख्या : ५०

भविष्यातील लक्ष्य : कंपनीची वाढ

 

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट वसवण्यात ज्यांचे मोठे योगदान आहे, ते मोहन गुरुनानी गेली २५ वर्षे साखर मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि अखंडता आदी मूल्य जपून त्यांनी आयुष्यभर उद्योगातील विविध क्षेत्रांसाठी योगदान दिले. ‘बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन’ आणि महाराष्ट्र व्यापारी संघटनांचे ते अध्यक्ष आहेत. सुरुवातीची काही वर्षे साखर उद्योगात यशस्वीपणे काम पाहिल्यावर मोहन गुरुनानी यांनी नवी मुंबईतील विस्तार आणि झपाट्याने होणाऱ्या विकासाची दिशा ओळखून बांधकाम व्यवसायात उतरण्याचे ठरवले. १९८४ मध्ये बांधकाम व्यवसायाची सुरुवात करणारे गुरुनानी आयुष्यातील तत्त्व आणि मूल्य व्यवसायात उतरविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे, त्यांचा विश्वास कमावणे आणि बाजारातील प्रमुख कंपन्यांपैकी एक बांधकाम व्यवसाय कंपनी म्हणून ओळख मिळवणे यासाठी झपाटून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्या काळात नवी मुंबईत झपाट्याने होणारा विकास त्यांच्या पथ्थ्यावर पडला आणि नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील मोठे नाव अशी आज कंपनीची ख्याती आहे.

 
“नवउद्योजकांनी प्रथम व्यावसायिक तत्त्वे पाळावीत. ग्राहकांना लुबाडून व्यवसाय होत नाही, उलट त्यांच्या विश्वासाला सार्थ उतरल्यावर भविष्यात कायमस्वरूपी ते तुमच्याशी जोडले जातात.” 
 

पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीत शिक्षण पूर्ण केल्यावर गुरुनानी यांना घरातूनच व्यवसायाचे धडे मिळाले. वडील धान्य व्यापारी असल्याने साखर उद्योगात उतरण्यास त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यातूनच व्यापारी संघटनांमध्ये सक्रिय होण्यास त्यांनी भर दिला. या काळात उद्योजकांच्या समस्या तडीस नेण्यास ते कार्यरत होते. त्यानंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्रात त्यांनी पाय रोवला. ‘मोराज ग्रुप’ हा आज मूल्य, बांधिलकी, गुणवत्तेच्या जोरावर मोठे स्थान मिळवू शकला आहे. सुरुवातीपासूनच व्यवसायात असलेल्या गुरुनानी यांना ‘मोराज इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीसाठी गुंतवणूक उभी करताना तितकीशी अडचण आली नाही. त्यानंतर लागणारी गुंतवणूक कंपनीच्या नफ्यातील काही हिस्सा वापरल्याने विस्तार करण्यास मदत झाली. त्यानंतर अडचणीही आल्या, पण त्या अडचणीही त्यांना खूप काही शिकवून गेल्या. त्यामुळे या परीक्षेत तावूनसुलाखून निघालेल्या गुरुनानी यांचा व्यवसाय आज उद्योगक्षेत्रात आघाडीवर आहे. त्यांची पुढील पिढीही या व्यवसायात उतरली आहे.

 

मोहन गुरुनानी यांच्या कन्या प्रिया गुरुनानी यांनी अमेरिकेतून इंटिरिअर डिझायनिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. परदेशात नोकरीची संधी उपलब्ध असताना त्यांनी भारतात परतून ‘मोराज ग्रुप’ सांभाळण्यास सुरुवात केली. या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांचा दांडगा अनुभव गाठीशी असणाऱ्या प्रिया ‘मोराज इन्फ्राटेक’चा बहुतांश कारभार यशस्वीपणे सांभाळतात. कंपनीची तत्त्वं आणि मूल्य जपताना गुरुनानी यांनी हीच शिकवण पुढील पिढीला दिली आहे. येत्या काळात बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य नाव म्हणून कंपनी ओळखली जावी, असे त्यांचे भविष्यातील लक्ष्य आहे.

 
 
 

सध्या ‘मोराज इन्फ्राटेक’तर्फे खोपोली, नागपूर आदी भागात बांधकामनिर्मिती सुरू आहे. नवी मुंबईतील बऱ्याचशा भागात कंपनीचे बांधकाम पूर्ण झाले असून मोठा ग्राहकवर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’तर्फे कंपनीला नवी मुंबईतील एका औद्योगिक बांधकामासाठी पुरस्कार मिळाला आहे. कंपनीतर्फे शिक्षणक्षेत्रात प्रामुख्याने मदत केली जाते. त्याशिवाय गुरुनानी हे स्वतः विविध समाजकार्यात सहभाग नोंदवतात. हेच कार्य आणि कंपनीची उत्पादन व सेवा ग्राहकांचा विश्वास जिंकण्यास मदत करते, असे त्यांचे मत आहे.

 

- तेजस परब


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@