सेवाक्षेत्रातील ‘श्री कृपा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 


एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबाने परिश्रमपूर्वक उभा केलेला आणि वाढवलेला उद्योग म्हणजे ‘एसकेएसपीएल’ अर्थात ‘श्री कृपा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड.’ पुण्याच्या महेश व राघवेंद्र खेडकर बंधूंनी उभी केलेली ही कंपनी आज सेवा व व्यवस्थापन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी नावारूपाला आल्यानंतर आता भविष्यातील विस्तारही कंपनीच्या नेतृत्वाला खुणावतो आहे.

 

उद्योजकाचे नाव : महेश खेडकर, राघवेंद्र खेडकर

कंपनीचे नाव : श्री कृपा सर्व्हिसेस प्रा. लि.

कंपनीची सेवा : फॅसिलिटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत

वार्षिक उलाढाल : १२५ कोटी

कर्मचारी संख्या : ८५००

भविष्यातील लक्ष्य : २०२० पर्यंत ५०० कोटी

 

‘एससकेएसपीएल ग्रुप’द्वारा फॅसिलिटी मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅण्ड मोबिलिटी, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, स्कील डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांत सेवा व व्यवस्थापन पुरवले जाते. पुण्याजवळ आकुर्डी येथे आज प्रशस्त कार्यालयात असलेली ‘एसकेएसपीएल’ कंपनी १९९१ मध्ये डी. बी. खेडकर यांनी स्थापन केली. डी. बी. खेडकर म्हणजे महेश आणि राघवेंद्र बंधूंचे वडील. डी. बी. खेडकर या व्यवसायात उतरण्यापूर्वी पोलीस खात्यात कार्यरत होते. मुंबईतून सहायक पोलीस आयुक्त पदावरून ते निवृत्त झाले आणि त्यांनी या व्यवसायात उडी घेतली. कालांतराने महेश व राघवेंद्र खेडकर हे दोघेही त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीत रूजू झाले. या एकत्र कुटुंबाच्या मेहनतीचं फळ म्हणून ही कंपनी वाढली, विस्तारली आणि यशस्वीही झाली.

 

महेश खेडकर यांनी बीसीएस तर राघवेंद्र खेडकर यांनी बी.कॉम, एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतलं. या दोघा बंधूंचं महाविद्यालयीन शिक्षण जरी पुण्यात झालं असलं तरी शालेय शिक्षण मात्र राज्यातील विविध ठिकाणी झालं. कारण, वडील पोलीस खात्यात असल्याने त्यांची सतत बदली होई. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघा बंधूंनी कंपनीची सूत्रं आपल्या हाती घेतली. वडील डी. बी. खेडकरांनी कंपनीची पायाभरणी केली होतीच. ‘सिक्युरिटी सर्व्हिसेस’ अर्थात सुरक्षा सेवा पुरवण्यापासून कंपनीची सुरुवात झाली होती. त्यानंतर हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, स्किल्ड-अनस्किल्ड मॅनपॉवर, लॉजिस्टिक कंपनी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि मग ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅण्ड मोबिलिटी असा कंपनीचा विस्तार वाढतच गेला. आज सेवा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील एक नामवंत कंपनी म्हणून ‘एसकेएसपीएल’ दिमाखात उभी आहे. कंपनीत कर्मचाऱ्यांची विद्यमान संख्या साडे आठ हजार इतकी असून ही संख्या २०२० पर्यंत १५ हजारापर्यंत पोहोचविण्याचे खेडकर बंधूंचे लक्ष्य आहे. दुसरीकडे, ‘एसकेएसपीएल’ची आजची वार्षिक आर्थिक उलाढाल १२५ कोटी रुपये असून २०२० पर्यंत ५०० कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्यही त्यांनी निर्धारित केले असून त्यादृष्टीने कंपनीची वाटचाल सुरू आहे.

“या क्षेत्रात जरूर यावं, फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये उतरावं. या क्षेत्रात महाराष्ट्रात कंपन्या कमी आहेत, परंतु मोठ्या कंपन्यांना या सेवांची मोठी गरज आहे. लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देण्यास हातभार लावावा. लोकांना रोजगार दिल्याचे आणि स्वतः आर्थिक उत्पन्न मिळवल्याचे दुहेरी समाधान.”
 
कचरा व्यवस्थापन क्षेत्रात ‘एसकेएसपीएल’ उतरली असून बेहरामपूर महापालिकेच्या प्रकल्पाचे २५० कोटी रुपयांचे कंत्राटदेखील त्यांना मिळाले आहे. वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातही कंपनी उतरली आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने नव्याने सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित बसेसच्या सेवेमध्येही ‘एसकेएसपीएल’ने सहभाग घेतला असून कंपनीच्या सध्या एकूण १०८ शिवशाही बसेस राज्यातील रस्त्यांवर धावत आहेत. अनेक कंपन्या, संस्था, महामंडळं, शासकीय-निमशासकीय आस्थापनांना ‘एसकेएसपीएल’ आज दर्जेदार सेवा देत आहे. आता ते रिअल इस्टेटमध्येही उतरत असून पुण्याजवळ रांजणगाव भागात तब्बल ४० हजार लोकवस्तीचं भव्य टाऊनशिप कंपनीद्वारा उभारण्यात येणार आहे.
 
  

 

व्यवसायात एवढं भरीव यश मिळालेलं असताना खेडकर बंधूंना सामाजिक कृतज्ञतेचीही जाणीव आहे. पुण्यात तसेच पुण्याबाहेरीलही अनेक सामाजिक उपक्रमांत खेडकर बंधू व ‘एसकेएसपीएल’ कंपनी आपले सक्रिय व सढळ योगदान देताना आढळते. खेडकर बंधूंची ही यशोगाथा अनेक नामवंत, प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांकडून उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार, तसेच, उद्योगक्षेत्रातील ‘महर्षी’ खुद्द जे. आर. डी. टाटा यांच्या हस्ते फॅसिलिटी मॅनेजमेंटकरिता खेडकर बंधूंना पुरस्कार मिळालेला आहे.
 

- निमेश वहाळकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@