ध्यास नवतंत्रज्ञानाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 


पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि अमेरिकेतून ब्रुकलेन पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले हरीश मेहता हे आज ‘ऑनवर्ड टेक्नोलॉजीस पब्लिक लिमिटेड’ या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. नवउद्योजकांना मार्गदर्शनासह माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सुमारे ४० लाख रोजगार निर्मिती करणाऱ्या ‘नॅसकॉम’ या संस्थेचे ते सहसंस्थापक आणि माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यालयात सुरू झालेल्या ‘नॅसकॉम’ या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबाबत नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचा गौरवही झाला आहे.

 

उद्योजकाचे नाव : हरीश मेहता

कंपनीचे नाव : ऑनवर्ड टेक्नोलॉजीस पब्लिक लि.

कंपनीची उत्पादन/सेवा : मेकॅनिकल, आयटी कन्सल्टन्सी

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : २५० कोटी

कर्मचारी संख्या : २५००

भविष्यातील लक्ष्य : वार्षिक उलाढाल दुप्पट करणे

 

भियांत्रिकी क्षेत्रात सेवा पुरवठा करण्यात देशात आणि देशाबाहेरील क्षेत्रात प्रमुख कंपनी बनण्याचे ध्येय असणारी ‘ऑनवर्ड टेक्नॉलॉजी पब्लिक लिमिटेड’ची सुरुवात २००६ मध्ये झाली. या क्षेत्राचा गाढा अनुभव असणाऱ्या मेहता यांनी काही वर्षातच कंपनीचा डोलारा उभा करून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि निर्यातक्षम बनण्यावर भर दिला. आज कंपनीचा बहुतांश व्यवसाय हा परदेशी कंपन्या आणि ग्राहकांवर अवलंबून आहे. २००६ मध्ये हार्डवेअर उत्पादने आणि कच्च्या मालाच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. हार्डवेअर क्षेत्रात उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा खर्चही वाढत होता. या क्षेत्रात मागणी नसल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रातच उद्योग करावा, याकडे मेहता यांचा कल होता. त्यानुसार कंपनीची स्थापना करण्यात आली. प्रामुख्याने कंपनी मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग कंपनी आणि आयटी कन्सल्टन्सी सेवा देणाऱ्या ऑनवर्ड समूहात अडीच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग क्षेत्रात विविध वाहनांची आभासी रचना करण्याचे काम कंपनी करते. यात प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, सिम्युलेशन इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग चेंज मॅनेजमेंट, टेक्निकल पब्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल डिझाईन्स आदी क्षेत्रांत सेवा देते. आयटी कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट व मेन्टेनन्स, एक्स्पर्टाईझ सर्व्हिसेस सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, एक्सपर्टाईझ मोबिलिटी सोल्युशन्स, डिजिटल ट्रान्समिशन आदी क्षेत्रांत सेवा देते.

 
"येत्या काळात भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. ग्राहकांना नवीन काय देता येईल किंवा नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन अधिकाधिक गुणवत्तापूर्ण कसे बनविता येईल, यावर भर द्यावा."

 

घरातूनच व्यवसायासाठी पाठबळ मिळाल्याने मेहता यांना उद्योग उभारण्यास मदत मिळाली. गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास आणि त्यावर खरी उतरलेली कंपनी आज एका यशस्वी उद्योजकाच्या प्रवासाची साक्ष देत आहे. ग्राहकांचा विश्वास जिंकणे हीच खरी गुंतवणूक, हा यशाचा मंत्र मेहता यांनी जपला आणि उद्योगाची मुहूर्तमेढ रोवत गेली. उद्योग सुरू करताना भांडवल उभारणी, खेळते भांडवल आदी समस्या त्यांनाही भेडसावल्या. बँकांनी कर्ज देण्यास नकार देताच भांडवल उभारणीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. कुटुंब आणि नातेवाईकही उद्योगक्षेत्रात असल्याने मेहता यांनीही व्यवसाय करण्याचाच पर्याय स्वीकारला. मेहता यांचा व्यवसाय करण्यामागचा दृष्टिकोन पाहून काही नातेवाईकांनीही त्याकाळात उद्योगासाठी त्यांना मदत केली. व्यवसाय हा तत्त्वाला धरून असावा, असे मत असणाऱ्या मेहता यांनी ग्राहकाच्या संतुष्टीकडे बारकाईने लक्ष दिले. ‘ऑनवर्ड’ समूह आज देशातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये एक आहे. भारतीय शेअर बाजारातील ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ या दोन्ही निर्देशांकात कंपनी नोंदणीकृत आहे. येत्या काळात कंपनीची उलाढाल दुप्पट करण्यावर कंपनीचा भर आहे. त्यानुसार येत्या काळात बाराशे नवे रोजगार तयार होणार आहेत. देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना सेवा देणे हे कंपनीचे प्रमुख ध्येय आहे.
 
 
 
 

व्यवसायाची धुरा सांभाळताना मेहता यांनी देशात अभियांत्रिकी क्षेत्रातील रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने ‘नॅसकॉम’ची स्थापना केली. १९८८ मध्ये स्थापना झालेल्या या संस्थेने भारतीय रोजगारनिर्मिती क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आत्तापर्यंत ४० लाखांहून अधिक थेट रोजगार आणि ८० लाख अप्रत्यक्ष रोजगार संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत. त्याशिवाय ‘ऑनवर्ड’ समूहातर्फे वृक्षारोपण, विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत, वृद्धाश्रमात गरजेच्या वस्तूंचे वाटप आदी कार्यक्रम राबवले जातात. व्यवसाय तत्त्वाला धरूनच करावा, त्यामुळेच यशाची चव चाखायला मिळते, हा मूलमंत्र मेहता यांनी सुरुवातीपासूनच जपल्याने यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे.

- तेजस परब


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@