कल्पकतेचे मूर्तिमंत उदाहरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


 

 

अकोल्यासारख्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या महानगरात येऊन स्वतःची ओळख निर्माण करून, स्वतःचा व्यवसाय उभा करून तो यशस्वी करून दाखवणं हे सोपं निश्चितच नाही परंतु, ही कामगिरी ‘माइंडफ्लो पार्टनर्सकंपनीचे संस्थापक गिरीश सांगवीकर यांनी प्रत्यक्षात करून दाखवली.

 

उद्योजकाचे नाव : गिरीश सांगवीकर

कंपनीचे नाव : माइंडफ्लो पार्टनर्स

कंपनीची सेवा : विमानतळांसाठी सल्लागार

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत

वार्षिक उलाढाल : ३ कोटी रुपये

कर्मचारी संख्या : २०

भविष्यातील लक्ष्य : वाहतूक क्षेत्रात सरकारला सल्लागार

 

गिरीश सांगवीकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबाची होती. त्यामुळे घरातून व्यवसायाचे बाळकडू मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. सांगवीकर यांनी पॉलिमर इंजिनिअरिंगचे शिक्षण अकोल्यात पूर्ण केले. यानंतर औरंगाबादला नोकरी करत असतानाच एमबीएच्या प्रवेश परिक्षेची त्यांनी तयारी केली व मग एमबीएसाठी पुण्याला यायचा त्यांनी निर्णय घेतला. पुणे येथे त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए पूर्ण केलं. त्यानंतर जवळपास एक तप त्यांनी गल्फ ऑईल, मोटोरोला, व्हर्जिन मोबाईल, टाटा टेली सर्व्हिसेस, ल्युमिनस अशा नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलं आणि याच दरम्यान थेट स्वतःचीच कंपनी सुरु करायचा निर्णय त्यांनी घेतला. ‘ल्युमिनस’सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करत असतानाच २०१३ साली स्वतःची कंपनी सुरु करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात येत होता. याला काही घरगुती कारणे होतीच, पण त्याचबरोबर महत्त्वाकांक्षा व जिद्ददेखील त्यामागे होती. त्याचवेळी ल्युमिनसचे एक नवीन उत्पादन बाजारपेठेत येणार होते त्यासाठी ते एका Carry Forward Agent च्या शोधात होते. ल्युमिनसमधील त्यांचा कार्यकाळ अतिशय वाखाणण्याजोगा असल्याकारणाने त्यांना पहिले काम ल्युमिनसमधूनच मिळालं. त्यानंतर त्याच उत्पदनाच्या पुण्यातील वितरणाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच आली. त्याचबरोबर त्यांनी बाणेरमध्ये व्यापारासाठी दुकानदेखील सुरु केलं, जे जवळपास दोन ते अडीच वर्षे सुरु होतं. या साऱ्या अनुभवाच्या बळावर आता आम्ही सरकारला महसूलवाढीसाठी सल्लागार म्हणून सेवा देण्याचे काम करतो, असं सांगवीकर सांगतात.

"मराठी तरुणांनी स्वतःचा व्यवसाय करायला अजिबात घाबरू नये. नवीन क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. मराठी तरुणांनी आपल्या ज्ञानाचा व संस्कृतीचा वापर करून या नव्याने उभ्या राहणाऱ्या क्षेत्रांमध्ये सतत प्रयोग करणं गरजेचं आहे."

आजमितीस सांगवीकर यांच्या तीन कंपन्या आहेत. श्रीकृष्ण ट्रेडर्स’ यामार्फत वितरण, Carry Forward Agent अशा बाजारपेठेशी संलग्न असणाऱ्या सेवा दिल्या जातात. ‘माइंडफ्लो मार्केटिंग’च्या अंतर्गत ते कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासंबंधी सल्ला देतात व माइंडफ्लो पार्टनर्समार्फत प्रवाशांच्या दळणवळणाच्या मार्गांमध्ये सरकारला अधिकाधिक महसूल उत्पन्नासाठी सल्ला द्यायची सेवा पुरवली जाते. या तीनही कंपन्यांची एकूण वार्षिक उलाढाल साधारण्पणे पाच कोटींहून अधिक आहे. गिरीश सांगवीकर यांनी ज्या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे ते क्षेत्र मुळातच वेगळे आहे. ‘माइंडफ्लो पार्टनर्स’चे कार्यक्षेत्र म्हणजे विविध सरकारी विमानतळांना महसूल वाढीसाठी सल्लागार म्हणून मदत करणे. सध्या भारतातील एकूण १७ विमानतळांसाठी ही सेवा देण्याचे काम ‘माइंडफ्लो पार्टनर्स’तर्फे केले जाते. २०१४ मध्ये सांगवीकर या क्षेत्रात आले आणि आज केवळ तीन वर्षांत त्यांनी या कंपनीची वार्षिक उलाढाल तीन कोटींपर्यंत नेऊन ठेवली आहे. यासाठी लागते ती अजोड मेहनत आणि अर्थातच त्या मेहनतीचं फळ आपण पाहतोच आहोत. आज सरकारला अनेक बाबतीत रोख रकमेचा तुटवडा जाणवतो. अशा परिस्थितीत सरकारला अधिक खर्च अथवा बांधकाम करायला न लावता अधिक महसूल कसा निर्माण करता येईल, यावर सल्ला देणारी ‘माइंडफ्लो पार्टनर्स’ ही भारतातील एकमेव कंपनी असल्याचा दावा सांगवीकर अभिमानाने करतात.

 

 

२०१३ साली सुरु केलेला व्यवसाय केवळ पाच वर्षांत या उंचीवर नेऊन ठेवणे हे काही सोपे काम नक्कीच नाही. अर्थात, या सर्व वाटचालीत संघर्षाचे प्रसंगदेखील आलेच. शेवटी कोणताही व्यवसाय म्हटलं की त्यात रोज नव्याने काही ना काही संकटं, आव्हानं उभी राहत असतातच. परंतु, त्यावरही वेळोवेळी मात करत गिरीश सांगवीकर पुढे जात राहिले आणि यशस्वी होत राहिले. या काळात पाठीशी असणाऱ्या कुटुंबीयांचा आधार व त्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास फार महत्त्वाचा ठरल्याचे ते सांगतात. सांगवीकर यांनी व्यवसायात ही अशी प्रगती करत असताना सामाजिक बांधिलकीसुद्धा जपलेली आहे. रा. स्व. संघाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते समाजाशी जोडले गेले आहेत. आजही एक स्वयंसेवक म्हणून समाजासाठी काम करण्याचा वसा मी जपला असल्याचे ते सांगतात. भविष्यकाळाबाबत बोलतानादेखील गिरीश सांगवीकर यांचा सतत पुढे जात राहण्याचा ध्यास जाणवतो. आज ते केवळ विमानतळांच्या महसूल वाढीवर काम करत आहेत. परंतु, भविष्यात विमानतळांप्रमाणेच रेल्वे, बसेस, नदी व समुद्रावरील बंदरे अशा इतर दळणवळणाच्या माध्यमांचा महसूल कसा वाढेल व यातून सरकारचा व पर्यायाने जनतेचा फायदा कशाप्रकारे होऊ शकेल, यावर लक्ष केंद्रीत करून ‘माइंडफ्लो पार्टनर्स’ने पुढील वाटचाल सुरु केली आहे. आजच्या काळात कामातील कुशलतेसोबतच धोका पत्करण्याची तयारीदेखील महत्त्वाची असते. शासनदेखील अशा कंपन्यांच्या शोधात आहे. त्यामुळे नवीन उद्योजकांना या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत, असे सांगवीकर यांना वाटते.
 

-निमेश वहाळकर

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@