उद्योगविकासाचा ध्येयवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2018
Total Views |


  

देशभरातील आयआयटी उत्तीर्ण बुद्धिवंत मुले वेगवेगळ्या क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता आजमावत होती. असेच १९७४ साली श्रीपाद मोंडकर आयआयटीमधून केमिकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडले. तंत्रकौशल्य, प्रामाणिकपणा, मेहनत या त्रिसूत्रींच्या आधारावर या क्षेत्रात त्यांनी चांगला जम बसवला. आज मोंडकर यांच्या ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’ने जगभरातील १६ देशांमध्ये आपला पसारा वाढवला आहे.

 

उद्योजकाचे नाव : आशिष मोंडकर

कंपनीचे नाव : युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड

कंपनीची उत्पादने : कॉस्टीक रिकव्हरी प्लांट

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : ७५ कोटी रुपये

प्रेरणास्त्रोत : श्रीपाद मोंडकर

कर्मचारी संख्या : २२५

भविष्यातील लक्ष्य : १५० कोटींचा टप्पा

 

तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कुशल असलेल्या श्रीपाद मोंडकरांनी अपेक्षेप्रमाणे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यावेळी इंजिनिअरिंगमध्ये चांगली संधी होती. तेव्हा ‘हिट एक्सचेंजर’ व ‘कॉस्टीक रिकव्हरी प्लांटया अत्यंत किचकट विषयात मोंडकर यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. ‘अचूक ध्येयाची निश्चिती’ आणि ‘स्वच्छ सरळमार्गी प्रवास’ ही मोंडकर यांच्या गेल्या चार दशकांच्या अखंड उद्योगभरारीची यशाची सूत्रे आहेत. जागतिक दर्जाचे उत्पादन आणि सेवा देत असताना कंपनीची उलाढाल आज जवळपास ७५ कोटी इतकी असून सव्वादोनशे कर्मचारी ‘युनिटॉप’च्या माध्यमातून यशाची नवीनवीन शिखरे प्राप्त करीत आहेत. आगामी दोन वर्षात दीडशे कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे स्वप्न कंपनीने बाळगले आहे. भविष्यात ‘झिरो लिक्विड डीस्चार्ज प्लांट’ उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. उद्योगसमूहांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. या पाण्याचा पुनर्वापर तसेच जलशुद्धीकरण करत उद्योग जवळपास झिरो लिक्विड डीस्चार्ज’ या आदर्श स्थितीपर्यंत पोहोचू शकतो, असे संशोधन करून त्या पद्धतीची सेवा ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’च्या माध्यमातून पुरवली जाणार आहे.

 

उद्योगधंदा सध्या ‘ऑटोमिशन’च्या दिशेने वळला आहे. हे ऑटोमिशन ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’नेदेखील स्वीकारले असल्याने सुरुवातीला चार-पाच प्लांटपासून सुरू केलेला प्रवास आज ६० प्लांटपर्यंत पोहोचला आहे. कपड्याच्या फिनिशिंगसाठी अर्थात ‘कॉटन मर्सरायझिंग’ यासाठी पुरवले जाणारे तंत्रज्ञान ही ‘युनिटॉप’ची खासियत...

 

"आपण काम करत असलेल्या उद्योगाची सखोल माहिती व त्यातील भविष्यातील स्पर्धा लक्षात घेऊन प्रचंड मेहनतीने उद्योग उभारणे याशिवाय यशाला तरणोपाय नाही. उद्योगउभारणी करत असताना झटपट पैसा यापेक्षा उद्योगजगतावर दीर्घकालीन छाप हाच विचार प्रामुख्याने असायला हवा. आपण टाकत असलेले भांडवल व घेत असलेली मेहनत याचा परतावा नक्की मिळतो. मात्र, त्यासाठी उद्योगवाढीच्या मूळ विचाराबाबत ध्येयवादी राहणे गरजेचे आहे."

 

आज ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’चे नाव जगभरात कौतुकाने घेतले जाते. बांगलादेशापासून ते कोरियापर्यंत जवळपास १६ देशांमध्ये आपल्या कंपनीचा पसारा वाढवत असताना विश्वासार्हतेवर कंपनीची यशस्वी वाटचाल सुरु आहे. एकीकडे अत्यंत तांत्रिक अशी उद्योगाची यशस्वी वाटचाल सुरू असताना १९९७ साली मोंडकर यांनी पहिले डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केले आणि ते जवळपास दहा वर्ष यशस्वीपणे चालले. त्या काळात ‘डिपार्टमेंटल स्टोअर’ ही संकल्पनादेखील सुरु झाली नव्हती.मोंडकर त्या अर्थाने ‘डिपार्टमेंटल स्टोअर’च्या संकल्पनेला उभारी देणारे उद्योजक ठरले. मात्र, मोंडकर सरळमार्गी, प्रामाणिक व्यवसाय करणारे गृहस्थ असल्याने डिपार्टमेंटल स्टोअर या क्षेत्रातील काही बिझनेस प्रॅक्टीस इतरांसारख्या मान्य नव्हत्या आणि म्हणून स्टोअरमधीलच कर्मचाऱ्यांना मालकी बहाल करून मोंडकर यांनी आपल्या आवडत्या ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’च्या कामाला वाहून घेतले. मोंडकर यांचे चिरंजीव आशिष मोंडकर हेदेखील मॅकॅनिकल इंजिनिअरिंग करून ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’च्या प्रवासात सहभागी झाले. आशिष मोंडकर यांच्या येण्याने युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’च्या कामाला अधिक गती प्राप्त झाली.

 
 

 

दरवर्षी ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’ जितके प्लांट उभे करत असत, त्यापेक्षा दुप्पटीपेक्षा जास्त प्लांट ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’ उभे करू लागले. उद्योगव्यवसायात काम करत असताना कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना ठेवायची नाही, चांगली सेवा आपल्या कामाची विश्वासार्हता हा यशाचा मंत्र होतो आणि म्हणूनच ‘टिसा’सारख्या संस्थेने ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’ला स्वत:हून पुरस्कार देऊन गौरविले आहे. पण, कोणत्याही पुरस्कारापेक्षा ग्राहकांची शाबासकी हाच खरा पुरस्कार असल्याचे मोंडकर मानतात. उद्योग-व्यवसायात यशाची शिखरे पादाक्रांत करताना सामाजिक बांधिलकीदेखील ‘युनिटॉप’ने जोपासली आहे आणि म्हणून त्यासाठी कंपनीने स्वत:ची स्वतंत्र ‘सीएसआर कंपनी’ गठीत करून त्याद्वारे सामाजिक उपक्रमांना गती दिली आहे. ‘सीएसआर’च्या माध्यमातून विविध गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य पुरविणे आदी समाजोपयोगी कामे केली जातात. दर्जेदार शैक्षणिक गुणवत्ता असलेले संचालक, तंत्रकौशल्याचा अभ्यास व कंपनी काम करत असलेल्या क्षेत्रात विविध प्रयोग करण्याची विजिगीषु वृत्ती हे ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’च्या यशाचे गमक मानायला हवे.
 

-भटू सावंत

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@