संपर्कक्षेत्रातील समीकरणे पालटणारा उपग्रह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
‘जीसॅट-११’ या उपग्रहाच्या प्रक्षेपणाने भारताकडे पहिल्यांदाच स्वतःची उपग्रह आधारित इंटरनेट प्रणाली असेल. त्यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग सर्वाधिक होणार असून तो १३ जीबी प्रति सेकंद एवढा होईल. ‘जीसॅट-११’ उपग्रहाच्या प्रक्षेपणाने डिजिटल इंडिया मोहिमेला मोठा हातभार लागणार असून गाव-खेड्यापासून, वाड्या-वस्त्या आणि दुर्गमभागातील व्यक्तीही इंटरनेटचा वापर करू शकतील. वापरकर्त्यांसाठी यातील आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे सध्या असलेले इंटरनेटचे दरही बदलतील. ‘जीसॅट-११’ मुळे त्यात मोठी घट होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय भारतीय अंतराळ संशोधन संस्था याचवर्षी १२ जानेवारीला ३१ उपग्रहांचे एकाचवेळी प्रक्षेपण करणार आहे. ज्यात अमेरिकेचे २८ उपग्रह आणि अन्य पाच देशांचे काही उपग्रह असतील. अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात इस्रोचा हा प्रवास खरेतर कौतुकास्पदच म्हणायला हवा.
 
 
अंतराळ संशोधन क्षेत्रात नवनवी शिखरे गाठणार्‍या इस्रोने देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने या महिन्यात इंटरनेटच्या वेगवाढीसाठी ‘जीसॅट-११’ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार असल्याचे जाहीर केले. ‘जीसॅट-११’ या उपग्रहाच्या प्रक्षेपणाने भारताकडे पहिल्यांदाच स्वतःची उपग्रह आधारित इंटरनेट प्रणाली असेल. त्यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग सर्वाधिक होणार असून तो १३ जीबी प्रति सेकंद एवढा होईल. इस्रोकडून जीसॅट मालिकेतील ‘जीसॅट-१९’ हा उपग्रह गेल्यावर्षी प्रक्षेपित करण्यात आला. त्यावेळी इस्रोने हा उपग्रह म्हणजे फक्त ट्रेलर असल्याचे आणि पुढचा पिक्चर अजून बाकी असल्याचे म्हटले होते. तर आता तोच पिक्चर सुरू होणार असून ‘जीसॅट-११’ हा उपग्रह भारतीय संपर्कक्षेत्रासाठी गेमचेंजर ठरेल. ‘जीसॅट-११’ च्या प्रक्षेपणानंतर इंटरनेट क्षेत्रातील आताची सर्वच समीकरणे बदलणार असून मोठी क्रांती होणार आहे. हा उपग्रह विशेषत्वाने इंटरनेटच्या वेग, सुरक्षितता आणि व्यापकतेमध्ये बदल घडवून आणेल. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी ऊर्जा ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. आता इंटरनेटलादेखील सर्वच क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आल्याने इंटरनेट आणि डेटा म्हणजेच माहिती ही देशाच्या प्रगतीचे इंधन ठरू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इस्रोने जाहीर केलेला ‘जीसॅट-११’ उपग्रह प्रक्षेपणाचा निर्णय भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
 
आज भारतीय इंटरनेट क्षेत्राचा विचार करता जगापेक्षा आपण बरेच मागे असल्याचे दिसते. जगभरातील १४९ देशांतील इंटरनेटच्या वेगाचा अभ्यास केल्यानंतर भारताचे स्थान ८९ वे असल्याचे समोर आले होते. याशिवाय भारताच्या १३० कोटी लोकसंख्येपैकी २९.५ टक्के लोकांपर्यंतच इंटरनेट पोहोचल्याची आकडेवारी आहे, पण आता ‘जीसॅट-११’ या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे इंटरनेट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. इंटरनेटच्या सर्वसमावेशकतेसाठी ‘जीसॅट-११’ चा मोठा फायदा होणार असून ग्रामीण भागात इंटरनेटची व्यापकता वाढेल. देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या डिजिटल इंडिया योजनेचे वारे वाहत आहे. भारतातील संगणक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासात डिजिटल इंडियाचा मोठा वाटा आहे. आता ‘जीसॅट-११’ उपग्रहाच्या प्रक्षेपणाने डिजिटल इंडिया मोहिमेला मोठा हातभार लागणार असून गाव-खेड्यापासून, वाड्या-वस्त्या आणि दुर्गमभागातील व्यक्तीही इंटरनेटचा वापर करू शकतील. वापरकर्त्यांसाठी यातील आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे सध्या असलेले इंटरनेटचे दरही बदलतील. ‘जीसॅट-११’ मुळे त्यात मोठी घट होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
देशातील ग्रामपंचायतींचा कारभार इंटरनेटच्या साहाय्याने एकमेकांशी जोडण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. याशिवाय विविध सरकारी, शैक्षणिक, आरोग्यविषयक क्षेत्रात इंटरनेटचा वापर मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. ई-गव्हर्नन्सवर केंद्र आणि राज्य सरकारने भर दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते, पण बर्‍याचदा सरकारी कामे करताना, विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशाचे, शिष्यवृत्त्यांचे, शेतकर्‍यांचे कर्जमाफी किंवा अन्य काही कामे करताना इंटरनेटचा वेग कमी झाल्याचे दिसते. पूर्ण क्षमतेने कामे होताना दिसत नाहीत. अनेकदा एकाचवेळी अधिक संख्येने वापरकर्त्यांनी इंटरनेट सुरू केल्याने संकेतस्थळे क्रॅश झाल्याचे, बंद पडल्याचे प्रकार घडल्याचेही आपल्याला माहिती आहे. परंतु, आता ‘जीसॅट-११’ उपग्रहामुळे इंटरनेटचा वेग तर वाढेल. ‘जीसॅट-११’ या उपग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे इंटरनेट हे फायबर ऑप्टिकल केबलद्वारे पुरविण्यात येणार्‍या इंटरनेटला पर्याय असेल. यात थेट उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट पुरवल्याने वायरिंगची गरज असणार नाही. त्यामुळे सध्याची इंटरनेटची अवस्था खरोखरच बदलेल. इंटरनेटसोबतच दूरचित्रवाणी क्षेत्रातही बदल होऊन डिश ऍन्टेनाशिवायही त्यावरील कार्यक्रमपाहता येतील. त्याचबरोबर सायबर सुरक्षा अधिक बळकट होईल आणि भारतातील बँकिंग क्षेत्रालाही बळकटी मिळेल. यामुळे वापरकर्त्यांना एक नवीन सुरक्षा कवच मिळणार आहे, ज्याद्वारे इंटरनेटवरून होणार्‍या डेटा चोरीवर आळा बसेल.
 
इस्रोने गेल्यावर्षी १०४ उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण करण्याचा पराक्रमकेला होता. आता यावर्षी इस्रो जीसॅट-११ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह इस्रोचा आतापर्यंतचा सर्वाधिक वजन असलेला उपग्रह आहे. याशिवाय इस्रो याचवर्षी १२ जानेवारीला ३१ उपग्रहांचे एकाचवेळी प्रक्षेपण करणार आहे. ज्यात अमेरिकेचे २८ उपग्रह आणि अन्य पाच देशांचे काही उपग्रह असतील. इस्रोचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य देशांतील अंतराळ संशोधन संस्थांच्या तुलनेत इस्रोने विकसित केलेले तंत्रज्ञान स्वस्त आणि दर्जेदार असते. हे आपल्याला मंगळयान मोहिमेवरून सहज लक्षात येते. त्यामुळेच अन्य देश इस्रोद्वारेच आपले उपग्रह प्रक्षेपित करतात. अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात इस्रोचा हा प्रवास खरेतर कौतुकास्पदच म्हणायला हवा. ज्या देशाला अणुचाचणीनंतर कित्येक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान जगातील बड्या देशांनी नाकारले, तोच देश आज त्या बड्या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करत आहे. ही खरे तर मोठीच कामगिरी. इस्रो केवळ उपग्रह प्रक्षेपित करत नाही तर त्या माध्यमातून आर्थिक कमाईही करते. म्हणजेच इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणातून देशाला आर्थिक फायदाही होतो आहे.
 
दुसरीकडे इंटरनेट आज माहितीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. निरनिराळ्या क्षेत्रांतील वेगवेगळी आणि नवनवी माहिती येथे वेळोवेळी उपलब्ध होते. लेख, ध्वनिफिती, चित्रफिती, गोपनीय माहिती अशी अनेकानेक प्रकारांत ही माहिती साठवलेली दिसते. सोबतच या माहितीचा दुरुपयोग केल्याचे प्रकारही वेळोवेळी लोकांसमोर येतात. काही काही वेळा मूळ व्यक्तीची माहिती स्वतःच्या नावानेही खपवली जाते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला तर पायरसीची कीड लागल्याचेही आपल्याला माहिती आहे. आता ‘जीसॅट-११’ उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे इंटरनेटची व्यापकता आणि सर्वसमावेशकता अनेक पटींनी वाढेल. त्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढेल. अशावेळी इंटरनेट क्षेत्रात अनेक नवी आव्हानेही समोर येण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठीही काहीतरी प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणजे वापरकर्त्यांना आपल्या माहितीच्या सुरक्षिततेची खात्री मिळेल. ‘जीसॅट-११’ च्या प्रक्षेपणाने यातही मोठे परिवर्तन होईल, अशी अपेक्षा बाळगायला हवी.
 
 
@@AUTHORINFO_V1@@