पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि एकात्म मानववाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
राष्ट्रीय दृष्टीने भारतीय संस्कृतीचा विचार करायचा झाल्यास एकात्मवादी विचार करणे आवश्यक असल्याचे पं. उपाध्याय यांचे मत होते. जन्माला येणार्‍या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असून त्याला जगवण्याची जबाबदारी समाजाची आहे. भारतीय संस्कृतीचा हाच तर खरा पायाभूत आधार असून या विचारावरच आधारित आपली अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे, असा मूलभूत विचार पं. उपाध्याय यांनी मांडला होता. संघर्षातून परिवर्तन आणि क्रांती होऊ शकते, पण त्या आधारावर कायमस्वरूपी विकास होऊ शकत नाही, म्हणूनच एकात्मभावाच्या आधारावर व्यक्ती, समाज आणि प्रकृती यांचे नाते जोडलेले असावे असे त्यांचे म्हणणे होते.
 
 
 
भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत ज्या मोजक्या व्यक्तींनी प्रमुख भूमिका बजावली होती, त्यांच्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह पंडित उपाध्याय यांनी भारतीय जनसंघाच्या उभारणीसाठी खूप मेहनत घेतली होती. भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव म्हणून उपाध्याय कार्यरत होते. याच भारतीय जनसंघातून पुढे आज सत्तेत आणि चर्चेत असणार्‍या भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
 
 
समाजासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. लोककल्याण आणि राष्ट्रवादाशी कधीही कोणत्याही प्रकारे तडजोड करणे त्यांना मान्य नव्हते. साधी राहणी व उच्च विचारसरणी असा स्वभाव असणारे पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा शास्त्रे, धर्मग्रंथ आणि तात्त्विक ग्रंथांचा दांडगा अभ्यास होता. या अभ्यासाच्या आधारेच त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धांत भारतीय समाजापुढे मांडला. त्यांनी मांडलेल्या ‘एकात्ममानववाद’ सिद्धांताचा विचार पुढे भारतीय जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला. पाश्चिमात्य विज्ञानाचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला असला, तरी भारतीय समाजाचा विकास हा भारतीय विचार, संस्कृती, परंपरा यांच्या माध्यमातून जे संशोधन झाले, त्याच्या आधारावरच होऊ शकतो, असे त्यांचे ठाम मत होते.
 
 
भारतीय संस्कृतीबाबत बोलताना पं. उपाध्याय सांगत की, ‘‘या संस्कृतीत (भारतीय) मानवी जीवनाचा व संपूर्ण सृष्टीचा एकत्रित विचार केला जातो. तिचा दृष्टिकोन एकात्मवादी (Integrated ) आहे. तुकड्या-तुकड्यांचा विचार करणे विद्वानांच्या दृष्टीने ठीक असेल, पण व्यावहारिक दृष्टीने ते फारसे उपयोगाचे नाही. पाश्चिमात्य समस्यांचेही मुख्य कारण म्हणजे, जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा तुकड्या-तुकड्यांनी विचार करणे आणि मग हे तुकडे जोड (ठिगळे) लावून पुनः जोडण्याचा प्रयत्न करणे होय!’’
 
 
शास्त्रज्ञांचा प्रयत्न असा असतो की, जगात दिसणार्‍या अव्यवस्थेमधून व्यवस्था शोधून काढावी, (order out of chaos )त्यांच्या नियमांचा पत्ता लावावा व त्यांतून नव्याने व्यवहाराचे नियमबनवावे. दार्शनिकसुद्धा मुळात वैज्ञानिकच असतात. पाश्चिमात्य दार्शनिक द्वैतापर्यंत पोहोचले. हेगेलने थीसिस, अँटिथीसिस व सिंथिसिसचा (संघटन, विघटन, पुनर्घटन) सिद्धान्त मांडला व त्याचाच आधार घेऊन कार्ल मार्क्सने स्वतःचे इतिहास आणि अर्थशास्त्राचे विवेचन केले. डार्विनने मात्स्यन्याय हाच जीवनाचा आधार मानला. परंतु, आपण मात्र संपूर्ण जीवनात मूलभूत एकतेचे दर्शन दिले. काम, क्रोध आदी मानवी जीवनातल्या षडरिपूंना आपण स्वीकारले आहे. परंतु, या प्रवृत्तींना आपण आपली संस्कृती अथवा शिष्टाचार यांचा आधार मानला नाही. जगात जसे तंटे दिसतात, तसेच सहचर्यही आढळते. वनस्पती व प्राणी एकमेकांच्या आवश्यकता, गरजा भागवत असतानाच जिवंत राहतात. मनुष्यास जरुर असलेला प्राणवायू वनस्पतींकडून मिळतो, तर वनस्पतींना लागणारा कर्ब-द्विप्राणिल (Carbon-di-oxide) वायू प्राणिसृष्टीपासून मिळतो. अशा परस्पर-पूरकतेमुळेच सृष्टी चालू आहे.प्रकृतीमध्ये सृष्टीची धारणा करणारे व जीवित अधिक सुखकर करणारे जे भाव असतात ते भाव अधिक वाढविणे व दुसर्‍या अनिष्ट प्रवृत्तींपासून असणारा धोका टाळणे म्हणजेच संस्कृती होय. याचे एक लहानसे उदाहरण घेऊ : भावा-भावांचे नाते, आई-मुलाचे नाते, वडील-मुलाचे नाते, बहीण-भावाचे नाते या मानवी प्रकृतीच्या देणग्या आहेत. हे संबंध जसे मनुष्यात आहेत, तसेच जनावरातही आहेत. अर्थातच, जी स्थिती जीवनास पोषक व सहाय्यक आहे अशाच स्थितीची दिशा आपण स्वीकारावी. प्रतिकूल स्थितीचा स्वीकार केला तर ती संस्कृती होणार नाही, हा त्यांचा दृष्टिकोन होता.
 
 
जीवनविषयक जे नियमअसतात त्यांनाच ‘नीतिशास्त्राचे नियम’ म्हणतात. राग आला तरी आपण शांत राहिले पाहिजे, राग गिळून टाकला पाहिजे. असे जे नियम बनले तेच नीतिशास्त्राचे नियम होत. हे नियमकोणी विशिष्ट व्यक्तीने बनविलेले नाहीत, ते काळाच्या ओघात शोधून काढले जातात. सूर्य उगवलेला आपण पाहिला व घरातील कुणी व्यक्तीने विचारले, ‘‘सूर्य उगवला का?’’ समजा, जर आपण सांगितले की, सूर्य उगवलेला नाही तर काय होईल? अथवा बाहेर पाऊस पडत असताना खोलीत बसलेल्या व्यक्तीने पाऊस पडत आहे का? असे विचारले असता त्यास जर सांगितले की, ‘‘छे, बिलकुल पाऊस नाही, आकाश स्वच्छ आहे.’’ तर ती व्यक्ती बाहेर पडल्यावर भिजेल. अशा स्थितीत त्याचे आपले संबंध कसे राहतील, याचा विचार झाला पाहिजे. अशा उफराट्या रीतीने जगाचा व्यवहार कसा चालेल?
 
 
राष्ट्रीय दृष्टीने भारतीय संस्कृतीचा विचार करायचा झाल्यास एकात्मवादी विचार करणे आवश्यक असल्याचे पं. उपाध्याय यांचे मत होते. जन्माला येणार्‍या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असून त्याला जगवण्याची जबाबदारी समाजाची आहे. भारतीय संस्कृतीचा हाच तर खरा पायाभूत आधार असून या विचारावरच आधारित आपली अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे, असा मूलभूत विचार पं. उपाध्याय यांनी मांडला होता. संघर्षातून परिवर्तन आणि क्रांती होऊ शकते, पण त्या आधारावर कायमस्वरूपी विकास होऊ शकत नाही, म्हणूनच एकात्मभावाच्या आधारावर व्यक्ती, समाज आणि प्रकृती यांचे नाते जोडलेले असावे असे त्यांचे म्हणणे होते. हा विचार आचरणात आणताना भोगवाद सोडून टाकून आवश्यक तेवढेच उत्पन्न मिळवायचे आणि त्यावरच जगायचे, या नियमाचे पालन केले, तरच आपण शाश्वत अशी एक अर्थव्यवस्था उभी करू शकू आणि शाश्वत विकासाकडे जाऊ शकू, असा विचार त्यांनी मांडला होता. आज जगाला त्यांचे हे तत्व पटलेले दिसते, कारण भोगवादावर (consumption based)उभ्या असलेल्या पाश्चिमात्य जीडीपी अर्थशास्त्री (की अनर्थशास्त्री?) व्यवस्था आता भोगवादापायी पर्यावरणाचा नाश करून, जगाला विनाशाकडे खेचताना दिसत आहेत व त्यामुळे मानवजातीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. स्टीफन हॉकीन्स या नोबेल विजेत्या ब्रिटिश शास्त्रज्ञाच्या मते, आता पृथ्वीचे आयुष्य फक्त साठ वर्षेच शिल्लक उरले आहे आणि म्हणूनच अर्धशतकापूर्वीचे पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार मोलाचे ठरतात.
 
 
 
 
- जयराज साळगावकर 
@@AUTHORINFO_V1@@