सेवेतून सामाजिक परिवर्तन हा उद्देश प्रमुख : डॉ. अनंत पंढरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

श्री गुरुजी रुग्णालयाच्या डॉ. बा. शि. मुंजे नेत्रपेढीचे उद्घाटन

 
 
 
 
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालयातून सेवाभाव जपला जात असून सामाजिक परिवर्तन हा या मागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अनंत पंढरे यांनी केले.
 
 
रुग्णालयाच्या डॉ. बा. शि. मुंजे नेत्रपेढीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक संतोषचंद लोढा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भालेराव, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, सक्षम संस्थेचे खास जबलपूर येथून आलेले डॉ. पवन स्थापक, श्री गुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष मुकुंद खाडिलकर आदी उपस्थित होते.
 
आपल्या २० मिनिटांच्या भाषणात श्री गुरुजी रुग्णालयाने अल्पावधीत उत्तम काम केल्याची प्रशस्ती देऊन नेत्रपेढी सुरू करण्यातदेखील संस्थेच्या औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयापेक्षा आघाडी घेतली आहे, असे सांगितले. तसेच या सेवेच्या परंपरेत नव्या पिढीचे डॉक्टरदेखील योगदान देत आहेत, त्याबद्दल अभिमान आणि समाधान वाटते, असेही ते म्हणाले. डॉक्टर, देणगीदार, नाशिकचे स्वयंसेवक या सर्वांचे त्यांनी आभार मानून असेच कार्य पुढे चालविले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
उद्घाटक संतोष लोढा यांनी आपल्या हार्डवेअर अँड पेंट असोसिएशनच्या वतीने श्री गुरुजी रुग्णालयाच्या नेत्र शस्त्रक्रियांसाठी सत्तर हजार रुपयांची देणगी जाहीर केली. सक्षम संस्था देशाच्या विविध भागात कार्य करीत असून केवळ नेत्रदान हा एकच विषय नसून अन्य अवयवदान चळवळ राबवून लोकांना सक्षम करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती यावेळी आकडेवारीनिशी डॉ. स्थापक यांनी दिली.
 
प्रमोद कुलकर्णी यांनी भोसला मिलिटरी स्कूल आणि श्री गुरुजी रुग्णालय यांच्यातील सेवेचे बंध अतूट असल्याचे सांगून या दोघांतील प्रवेशद्वार सहकार्याचे प्रवेशद्वार आहे, असे स्पष्ट केले. भावी काळातदेखील दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविता येतील, असे सूचित केले तर प्रास्तविकात डॉ. धनंजय देशमुख यांनी डॉ. बा. शि. मुंजे हे नेत्रतज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांचे नाव अत्यंत संयुक्तिक असल्याचे सांगून नेत्रादानाबद्दल अधिक माहिती दिली.
 
सूत्रसंचालन डॉ. सचिन देवरे यांनी केले तर मुकुंद खाडिलकर यांनी आभार मानले. वैयक्तिक गीत प्रकाश भिडे यांनी सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमास डॉ. आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, भोसला मिलिटरी स्कूलचे पदाधिकारी, डॉक्टर्स, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शहर संघचालक विजय कदम यांच्यासह स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@