१३ जानेवारी रोजी होणार केळवे बीच पर्यटन महोत्सव २०१८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

पर्यटकांसाठी पर्वणी

 

 
 
केळवे : मुंबईपासून पश्‍चिम रेल्वेने दीड तास तसेच कारने दोन तासांच्या अंतरावर असलेले केळवे बीच. दिवसेंदिवस या बीचवर पर्यटकांचा ओढा हजारोंच्या संख्येने वाढत आहे. पालघर जिल्ह्याचे मॉडेल टूरिझम म्हणून ओळखल्या जाणार्‍या केळवे बीच पर्यटनाचा जगभर प्रसार व्हावा, या हेतूने केळवे बीच पर्यटन उद्योग संघाने १३ जानेवारी व १४ जानेवारी २०१८ या दिवशी पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
 
या महोत्सवात येथील महिला बचत गटाचे पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लोककलेचे दर्शन व खेळांचे आयोजन करण्यात आले आहेत. केळवे बीचला स्वच्छ व नितळ अथांग समुद्रकिनारा लाभला असून उंचच उंच सुरुची बाग देखील आहे. येथील हिरवेगार पानवेलीचे माळे, नारळीपोफळी तसेच केळी व आंब्याच्या बागा, प्रसिद्ध नवसाला पावणार्‍या श्री शितलादेवीचे मंदिर, ऐतिहासिक किल्ले पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
 
केळवे बीचवर शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जास्त पर्यटक येतात येथील स्थानिकांनी पर्यटकांच्या निवासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या योजने अतंर्गत न्याहारी व निवास केंद्र, रिसॉर्टस् तसेच तंबू व बांबू हाऊसची सोय केली आहे. या सर्व ठिकाणी पारंपरिक पद्धतीचे दर्जेदार खाद्य पदार्थ मिळत असल्याने पर्यटकांची केळवे बीचला विशेष पसंती मिळत आहे. केळवे गावातील स्थानिक आदिवासी समाज, भंडारी समाज तसेच आगरी व मुस्लीम समाजाला देखील रोजगाराची चांगली संधी मिळाली असून तरुणवर्ग या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे.
 
या पर्यटन महोत्सवात महिला बचत गटातर्फे विविध पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल असून शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा यात समावेश असून मासांहारी पदार्थांमध्ये ओल्या बोंबलांची पोतेंडी, विविध प्रकारचे मासे फ्राय तसेच कालवण व कोलंबी पुलाव, पोहे भुजिंग, चिकन बिर्याणी शाकाहारीमध्ये केळवे स्पेशल उकडहंडी, पुरणपोळी, मोदक, अळूवडी, कोथिंबीर वडी, तसेच तांदळाच्या भाकर्‍या, रवळी इ. पदार्थांचा आस्वाद केळवे बीच महोत्सवाला थेट देणार्‍या खवय्यांना घेता येणार आहे.
 
खाद्यपदार्थाच्या रेलचेलीसह रायफल शुटिंग, धनुर्विद्या अडथळ्यांच्या शर्यती आदी साहसी खेळही आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. पर्यटकांना घोडागाडी, उंट सफारी, फोर व्हीलर, बीच बाइक आदींचाही आनंद घेता येणार आहे. १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणारा हा महोत्सव रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सवाच्या सकाळी ११ वाजता उद्घाटन व विशेषांकाचे प्रकाशन व दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी रात्री १० वाजता या महोत्सवाची सांगता होणार आहे.
 
या महोत्सवाचे उद्घाटन पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान राज्याचे आदिवासी विकास व जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा भूषविणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भांडारी व बोरिवलीच्या आमदार मनीषा चौधरी हे असून विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित व आमदार अमित घोडा, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे माजी महापौर राजीव पाटील व नॉर्थ कोकणचे अध्यक्ष राजीव चुरी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
 
या कार्यक्रमात मीडिया पार्टनर दै. ‘मुंबई तरुण भारत’ केळवे ग्रामपंचायत, कोकण पर्यटन उद्योग संघ, नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चर फाऊंडेशन आदी संस्थांचे विशेष सहाय्य लाभले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@