संघाच्या हिंदू चेतना संगमाचा शिरसाड तालुक्यात अनोखा संगम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

स्वयंसेवकांसह हजारो नागरिकांची उपस्थिती



 
 
 
खानिवडे : ’सज्जन शक्ती सर्वत्र’ या सूत्राखाली महाराष्ट्रातील कोकण प्रांतात ग्रामीण भाग व नगर भागामध्ये २५५ ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हा कार्यक्रम आरोजित करण्यात आला होता.
 
दि. ७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या हिंदू चेतना संगमासाठी स्थान म्हणून संघ दृष्ट्या शिरसाड तालुक्याच्या वसईतील खानिवडेमध्ये हिंदू चेतना संगमचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी परिसरातील ग्रामीण भागातून खेड्यापाड्यांमधून गणवेशधारी स्वयंसेवकांसह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात सर्वांत प्रथम विरारचे सुपुत्र शहीद मेजर प्रसाद महाडिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर ध्वजप्रणाम करून उपस्थित प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांचा परिचय करण्यात आला. त्यानंतर देशभक्तीपर सांघिक गीत गायन झाले. स्वयंसेवकांच्या योग प्रात्यक्षिकानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर अमृतवचन व देशभक्तीपर वैरक्तिक गीत झाले व सरतेशेवटी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. ध्वज अवतरणानंतर हिंदू चेतना संगमाची सांगता झाली.
 
खानिवडे येथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या हिंदू चेतना संगमात प्रमुख पाहुणे म्हणून कणेर वृंदावन मठाचे नीलसानंद बाबा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ”आज आपण हिंदू म्हणून असलो तरी इतर कोणाचाही द्वेष न करण्याची असलेली आपली संस्कृती, परंपरा ही हिंदू जन्मासाठी सार्थ अभिमानाची बाब आहे. त्यासाठी हिंदू म्हणून जातपात, पंथ असा भेदभाव न करता आपण एकत्र आले पाहिजे. आपण आपल्या देशावर व गाईंवर आई म्हणून प्रेम करतो, त्यासाठी त्यांना भारतमाता, गोमाता म्हणतो. जमिनीच्या तुकड्यात व जनावरात आई म्हणून पाहण्याची आपली संस्कृती संपूर्ण जगात महान आहे.”
 
तर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना विश्‍व हिंदू परिषद पालघर जिल्हा विभागमंत्री मिलिंद बेटावदकर यांनी सांगितले की, ”हिंदू म्हणजे कोण तर जो भारतमाता की जय म्हणतो तो हिंदू. वंदे मातरम् म्हणतो तो हिंदू. कोणत्याही परिस्थितीत देशाला सर्वोच्च स्थानी मानतो तो हिंदू. देशाचा अभिमान बाळगतो तो हिंदू. सुसंस्कृत, संस्कारी, कुटुंबवत्सल वडीलधार्‍यांचा, गुरुजनांचा, संतांचा आदर राखतो तो हिंदू. समाजाचा एक अविभाज्य अंग असून समाजाच्या अडीअडचणींचा कोणत्याही परिस्थितीत सामना करण्यास सज्ज असतो तो हिंदू. जाज्ज्वल्य व ओतप्रोत देशसेवा करण्यासाठी आपण भारतीय, हिंदू म्हणून मोठ्या प्रमाणात एकवटणे अत्यंत गरजेचे आहे.” असे सांगतानाच बेटावदकर यांनी संघाचा इतिहास व वाटचाल याविषयी सखोल मार्गदर्शनही केले.
 
 
 
 
 
हिंदू चेतना संगम विरारमध्येही संपन्न
 
रा. स्व. संघाच्या हिंदू चेतना संगमदिनी विरारमध्येही स्वयंसेवकांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यामध्ये महिला नागरिकांची संख्या वाखाणण्याजोगी होती. येथेही प्रथम विरारचे सुपुत्र मेजर प्रसाद महाडिक रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर ध्वजप्रणाम करून उपस्थित प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांचा परिचय करण्यात आला. देशभक्तीपर सांघिक गीतगायन व स्वयंसेवकांच्या योग प्रात्यक्षिकानंतर प्रमुख पाहुणे आचार्य प्रल्हादाचार्य रामाचार्य नागरहळ्ळी, कुलपती श्री सर्वज्ञ विद्यापीठ बोळींज यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर अमृतवचन व देशभक्तीपर वयक्तिक गीत झाले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून शरद ढोले, केंद्रीय धर्मजागरण प्रमुख यांनी उपस्थितांना मार्गदशन केले.
 
विरार संघचालक डॉ. संदीप गोरखपाटील यांनी परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे म्हणून कुलपती नागरहळ्ळी यांनी सांगितले की, ”देशनिष्ठा, धर्मनिष्ठा यांचा सुंदर संगम हा हिंदू चेतना संगम कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे.” तर शरद ढोले यांनी वर्तमान स्थितीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी भारतातील तळागाळातील बांधवांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@