वैचारिक सामाजिक जाणीव प्रगल्भ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 

 
 
पाहता पाहता कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला ३२ वर्षांची झाली. पुण्याची वसंत व्याख्यानमाला, दादरची अमरहिंद व्याख्यानमाला आदी मोजक्या व्याख्यानमाला ज्ञानसत्रे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर ठाण्याच्या या व्याख्यानमालेने लोकांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्त्यांची हजेरी विचार, प्रबोधन माहिती आणि मनोरंजन यांची मेजवानी, तसेच रसिक व दर्दी श्रोत्यांची उपस्थिती आदी अनेक अनुभवांनी ही व्याख्यानमाला समृद्ध झाली.
 
ठाणे शहराची ओळख ऐतिहासिक शहर अशी असली तरी त्याला एक साहित्यिक व सांस्कृतिक गंधही आहे. ठाण्याचा आजचा आधुनिक चेहरा संपन्न दिसतो पण त्याची खरी श्रीमंती ही त्याच्या साहित्यिक सांस्कृतिक वारशात आहे. व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, मुलाखती, साहित्यिक गप्पा, संगीत मैफिली, कथाकथन, पुस्तक प्रकाशने, एकांकिका स्पर्धा, नृत्याविष्कार, सत्कार सोहळे, खाद्यमहोत्सव, रंगावली, प्रदर्शने, पुस्तक जत्रा, चित्रप्रदर्शनी अशा अनेकानेक कार्यक्रमांमुळे या शहराचे वैचारिक व सांस्कृतिक आरोग्य निरोगी राखण्यात हातभार लावला आहे. गेल्या ३१ वर्षांत रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेच्या भरारीने ठाण्याची वैचारिक व सांस्कृतिक उंची वाढण्यास मदत झाली असून त्याचे श्रेय प्रामुख्याने आमदार संजय केळकर, रसिक ठाणेकर आणि व्याख्यानमालेचे कार्यकर्ते यांना द्यावे लागेल.
 
दरवेळी नवीन वक्ते
आजवर विविध क्षेत्रांतील २१७ मान्यवरांनी वक्ते म्हणून या व्याख्यानमालेत हजेरी लावली. शिवाजीराव भोसले, मंगेश पाडगावकर, राम शेवाळकर, बाळ कोल्हटकर, द. मा. मिरासदार, लालकृष्ण अडवाणी, मनोहर जोशी, प्रमोद महाजन. डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. प्रकाश आमटे, अण्णा हजारे, शाहू मोडक, अशोक जैन, वि. वि. गोखले, मधुकर भावे, विद्याधर गोखले, पोपटराव पवार, मनोहर पर्रिकर, सुबोध भावे, श्रीराम लागू अशा कितीतरी नामांकित वक्त्यांचे विचार, त्यांची शैली, त्यांचे अनुभव व त्यांची समाजसेवा व्याख्यानमालेसाठी आलेल्या श्रोत्यांकरिता प्रेरक ठरली असून त्यांचे अनेक लक्षवेधी क्षण त्यांनी मनात कायमचे जपून ठेवले आहेत. एकदा व्याख्यानाला येऊन गेलेला वक्ता हा वक्ता म्हणून कधीही परत आला नाही, हे या व्याख्यामालेचे अनोखे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या व्याख्यानमालेची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
 
वक्त्यांची नावे वाचली तरी व्याख्यानमालेने हाताळलेल्या विषयांचे वैविध्य लक्षात येईल. एखाददुसरा अपवाद वगळला तर व्याख्यानमालेचे ठिकाण बदललेले नाही. जानेवारी महिन्यातील मकरसंक्रातीचा मुहूर्त धरून आधीचे सात दिवस ही व्याख्यानमाला चालते. रात्री ८ ते १० ही वेळ तसेच समारोपाला संपूर्ण वंदे मातरमही वैशिष्ट्यदेखील अधोरेखित होणारी आहेत.
 
३१ वर्षे नियमितपणे येणारा श्रोता
रसिक व चोखंदळ प्रेक्षक हे कोणत्याही व्याख्यानमालेचे भूषण असते. व्याख्यानमालेने ते भूषण जपले आहे. व्याख्यानमालेला श्रोत्यांचा दुष्काळ आजवर कधी भासला नाही. लोक आजकाल टी.व्ही.समोर बसतात. सभांना जाणारे श्रोते कमी झालेत. त्यामध्ये तरुणांचा अभाव असतो. राजकीय पक्षांनादेखील प्रेक्षक जमवावे लागतात. या सर्व गोष्टी बहुतांश खर्‍या असल्या तरी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेने हे सर्व समज खोटे ठरविले आहेत. समर्थक युक्तिवादाला टाळ्या आणि विनोदी कोट्यांना हशा असा प्रतिसाद देणारे दर्दी प्रेक्षक हे व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य आहे. गेली ३१ वर्षे न चुकता नियमितपणा व्याख्याने, ऐकण्यासाठी येणारा श्रोता हा व्याख्यानमालेचा दुर्मीळ योग आहे. प्रकाश फडके हे त्या श्रोत्याचे नाव. व्याख्यानमालेच्या पंचीविशीला त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
 
रामभाऊ म्हाळगींचे उचित स्मारक
६ मार्च १९८२ रोजी रामभाऊ म्हाळगींचे निधन झाले. रा. स्व. संघाचे निष्ठावान प्रचारक ते ठाण्याचे अभ्यासू खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कर्मयोगी ही त्यांच्या आयुष्याची खरी ओळख, या व्याख्यानमालेच्या रूपाने जपली गेली आहे. आमदार संजय केळकर हे या व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी झपाटलेले ठाणे ही आज ठाण्याची ओळख झाली आहे. या व्याख्यानमालेने वैचारिक, सामाजिक, राजकीय व मनोरंजनात्मक जाणिवा बलिस्ट करून ती ओळख अधिक प्रगल्भ केली आहे. विद्याधर वैशंपायन, सुहास जावडेकर, शरद पुरोहित, विष्णू रानडे, विजय जोशी, कीर्ती आगाशे, महेश विनेरकर, माधुरी ताम्हाणे. आदी अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या ऋणानुबंधाने तसेच कै. वसंतराव पटवर्धन व कै. अरविंद पेंडसे यांच्या आशीर्वादाने रामभाऊ म्हाळगींचे उचित स्मारक त्यातून उभे झाले आहे.
 
 
- श्रीकांत नेर्लेकर (गुरुजी)
 
@@AUTHORINFO_V1@@