संघाचा नवा ‘जागर’ अपेक्षित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |
 

 
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे "हिंदू चेतना संगम'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई ते गोवा दरम्यान एकूण २५५ ठिकाणी एकाच दिवशी आज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी हिंदुत्व, रा. स्व. संघाविषयी व्यक्त केलेले हे मनोगत...
 
रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे?
तुझे कालचे धगधगणारे प्रहर कुठे रे?
तूच दिल्या ना क्रांतीसाठी विराट हाका?
त्या हाकांनी झांझरणारी लहर कुठे रे?
 
साधारणतः १९७०-७५ चा काळ होता तो. माझे महाविद्यालयीन दिवस. ट्रेनने महाविद्यालयात जाताना वाटेत झोपड्यांनी भरलेली एक खूप मोठी वस्ती दिसायची नि मीच मला प्रश्न करायचो, ‘‘आपल्याला मिळालेलं हेच का स्वातंत्र्य?’’
 
योगायोगाने त्याच दरम्यान आणीबाणी आली आणि भारतातल्या शेकडो नव्हे, हजारो कार्यकर्त्यांची धरपकड झाली. त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. आपलं स्वातंत्र्य संकटात आहे किंवा ते पूर्त सक्षम झालं नाही, याचा पुरावाच होता तो. मग लोकनायक जयप्रकाशजींना ‘संपूर्ण स्वातंत्र्याची’ घोषणा करावी लागली. काही लोक त्याला ‘दुसरं स्वातंत्र्य’ म्हणतात आणि ते खरंच होतं. स्वातंत्र्य असं बाधित झालं की, त्याला पुन्हा पुन्हा असं कल्हई दिल्यागत चकचकीत करावं लागतं आणि ते असं पुन्हा पुन्हा घासून पुसून ठेवण्याचं काम करणारी समाजातील एक फळी असते. - सजग देशवासियांची! त्या सजग लोकांनाच आपण आदर्श मानतो आणि आपल्या राष्ट्राचे आधारस्तंभ मानतो.
 
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या तीन शब्दांचा समुच्चय म्हणजे अशा सजग लढवय्या कार्यकर्त्यांचा समूह. आपल्या उज्ज्वल परंपरांचा अभिमान कायम करीत, राष्ट्र बलवान करण्याचं कार्य करणारा संवेदनक्षम समूह म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 
कोणताही समाज परिपूर्ण नसतो. त्याला परिपूर्ण करण्याचं कार्य कोणाला तरी हाती घ्यावं लागतं आणि त्या परिपूर्णतेसाठी राष्ट्रीय विचार, विकासाचं स्वप्न आणि एकात्मतेची भावना यांचा परिपोष करावा लागतो. मग त्यासाठी वैचारिक शिस्त लागते, एक वैचारिक अधिष्ठान लागतं आणि त्या वैचारिकतेत, बंधुभाव, वैज्ञानिक सच्चेपण आणि नवमताचा पुरस्कार करावा लागतो. आपल्याच समाजाकडे या संवेदनक्षम आणि प्रांजळ चष्म्यातून पाहिले की आपल्यातला कैक त्रुटी दिसू लागतात. आपले क्षुद्रपण आपल्याला दुग्गोचर होते आणि मग ते नष्ट करण्याचे अखंडित प्रयत्न सुरु करावे लागतात.
 
मी या अर्थाने काहीसा भाग्यवान. कारण, त्या आणीबाणीच्या काळात, जेव्हा स्वातंत्र्याची अगदी खुलेआम गळचेपी चालू असताना माझ्या कानावर साने गुरुजी नावाच्या माऊलीचे गोड शब्द आले...
 
जगी हे हीन अति पतित
जगी जे दीन पद-दलित तया जाऊनी उठवावे|
जगाला प्रेम अर्पावे।।
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे|
जगाला प्रेम अर्पावे।।
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राणही द्यावे|जगाला प्रेम अर्पावे।।
 
हिंदुत्वाचा किती विशाल अर्थ गुरुजींनी आपल्याला सांगितला आहे. ज्ञानोबांच्या पसायदानासारखे हे एक विलक्षण तेजस मागणे किंवा विनवणी, साने गुरुजींनी केली. मला खात्री आहे, अगदी हीच संहिता, संघाचे संस्थापक प्रातः स्मरणीय श्री. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मनात असणार.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेला हिंदुत्वाचा अर्थ, जे जे या राष्ट्राचे रहिवासी ते ते हिंदू. यातील व्यापकता मनाला मोहून टाकणारी तर आहेच, पण मनाला उभारी देणारीही आहे. राष्ट्राचा असा व्यापक विचार मनात आल्याशिवाय सामाजिक कामाची प्रेरणाच निर्माण होऊ शकत नाही. या देशातील प्रत्येक माणसाकडे पाहताना, सिंधु नदीच्या काठावर राहणारा आणि सिंधु संस्कृतीचा अभिमान असणारा तो आपलाही साधी व्याख्या, कार्यकर्त्याच्या मनात असली की, तो भावाच्या ममतेने, समाजाच्या उद्धारासाठी कार्यरत होतो. आणीबाणीच्या काळात अनेक संघ कार्यकर्त्यांना त्यावेळच्या सरकारने अटक केल्याचे मी वाचले नि आता हे सामाजिक उत्थापनाचे काम कोण करणार, असा एक भाबडा प्रश्न माझ्या मनात उत्पन्न झाला. पण, काळानेच त्याचे उत्तर दिले. समस्त भारतीय जनतेने, हुकुमशाही राजवटीच्या विरोधात मतदान केले आणि सर्व संघटनांच्या, कार्यकर्त्यांची सुटका झाली. राष्ट्राने जणू पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा नि लोकशाहीचा मोकळा श्वास घेतला.
 
पण, खरा संघर्ष तर पुढेच होता. जवळजवळ दीड वर्ष या अटकसत्रात बंद पडलेलं सामाजिक काम... ते पुनर्जिवित करायचं? एखाद्या वाहणार्‍या पाण्याला, बंदिस्त करुन, त्याचं वाहतंपण थोपवलं तर ते कसं ‘चलित’ करायचं? इथे संघाच्या संघभावनेची थोरवी वा श्रेष्ठत्व आपल्याला कळतं. सुराज्याचं स्वप्न पाहणारे सारे स्वयंसेवक जर एखाद्या आस्थेच्या धाग्याने बांधले गेले असले आणि समाजाच्या पुनरुत्थानासाठीचा विचार त्यांच्यात रुजला असला, तर त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यात कसलीच तोशीश पडत नाही. कारण पुन्हा एकदा गुरुजींचे बलसागर भारताचे स्वप्नगीत त्याच्या ओठावर येते...
 
 
हे कंकण करी बांधियले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायाला हो | बलसागर भारत होवो!
 
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही काळ धारावीतल्या मुलांना शिकवायला जात असे. जी वस्ती, महाविद्यालयात जाताना मी परक्या डोळ्यांनी पाहत होतो, त्याच वस्तीत जाण्याची संधी मला मिळाली नि आपला समाज खरोखरीच काय आहे, हे पाहायला मिळालं.
 
समतेचा पुस्तकी विचार तर सारेजण बोलून दाखवतात. पण ती समता, समरसतेशिवाय किती फुसकी आहे, हे मी जवळून पाहिले आहे. काही काळ मी धारावी, मानव सेवा संघ (सायन), ऍक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल, भूतवली आदिवासी पाडा (नेरळ) अशा ठिकाणी काम केले आणि त्याचवेळी माझ्या अवतीभवती सामाजिक काम करणारे ममत्त्वाच्या भावनेने भारलेले नवे राष्ट्र स्वयंसेवक पाहत गेलो नि कळले आपण एकटे नाहीत.
 
 
जव्हार-मोखाडा येथे काम करणार्‍या सुनंदाताई पटवर्धन (प्रगती प्रतिष्ठान), घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणारे ठाण्याचे विद्याधर वालावलकर (पर्यावरण शाळा), मतिमंद मुलांमध्ये गेली अनेक वर्षे काम करणार्‍या सांगलीच्या रेवती हातकंणेगलेकर, कोकणातील गरीब शेतकर्‍यांमध्ये काम करणारे डॉ. प्रसाद देवधर (भगीरथ प्रतिष्ठान) यमगरवाडीत (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) पारध्यांच्या मुलांची आश्रमशाळा चालवणारे गिरीश प्रभुणे, मेळघाटात आपला बांबू प्रकल्प राबवताना तिथल्या आदिवासींमध्ये जागृती करणारा सुनील देशपांडे, विशेष मुलांसाठी काम करणारे माझे ठाण्यातील मित्र (जागृती पालक संस्था), जांभूळपाड्यातील आदिवासींमध्ये जाऊन काम करणारा माझा मित्र चंद्रकांत पुरी, नेरे (पनवेल) येथे वृद्धांसाठी आश्रमशाळा चालवणारे शांतिवनाचे प्रभुदेसाई, चिपळूणच्या अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा माझा मित्र राजन इंदूलकर, अपंगांसाठी ‘भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था’ चालविणार्‍या डोंबिवलीच्या डॉ. अंजली आपटे, ‘स्नेहालय’ संस्थेच्या माध्यमातून एचआयव्हीबाधित मुलांची देखभाल करणारा अहमदनगरचा गिरीश कुलकर्णी वा तिकडे गडचिरोलीत आपल्या गावातील दारूची दुकाने बंद करण्यासाठी गावातील स्त्रियांना एकत्र करणारी झाराबाई चांदे नावाची अशिक्षित स्त्री, मला हे सारे राष्ट्राच्या पुर्ननिर्मितीच्या कामी कार्यरत असलेले छोटे दिपक आहेत, असे वाटते. या सार्‍यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी थेट संबंध नाही. पण, ज्या राष्ट्र उभारणीसाठी संघ कटिबद्ध आहे, त्याच राष्ट्रीय उभारणीचे हे सुद्धा छोटे छोटे खांब आहेत, असे मला जाणवते.
 
आपण जो धारण करतो तो धर्म (धारियती सा धर्म) ही धर्माची व्याख्या ही आदर्श व्याख्या आहे. त्यामुळे अनेक संप्रदायांना, अनेक पंथांना आणि असंख्य विचारधारांना, एकत्र करणारा एका धाग्याने बांधणारा तो हिंदू धर्म अशी आपल्या धर्माची व्यापक व्याख्या आपण मानतो. हिंदू धर्माचे विराटपण याच वैश्विक संघभावनेत आहे. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले मानतो आणि निधर्मी राज्याचे स्वप्न पाहणारे महात्मा गांधीही आपल्यासाठी प्रातःस्मरणीय असतात.
 
‘बंधूंनो आणि भगिनींनो’ अशी सर्व जगातल्या लोकांना एका उच्चारात एकत्र आणणारी विश्व घोषणा करणारे स्वामी विवेकानंद आपल्याला त्यासाठीच वंदनीय असतात, की जे धर्माच्या पायावरही इतके वैश्विक असतात.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जागर आहे, तो अशाच राष्ट्रभावनांचा. जिथे जिथे सेवावृत्ती असते आणि त्यामागे राष्ट्र उभारणीची भावना असते, तिथे तिथे संघाचा राष्ट्र उत्थापनाचा विचार आहे, असे मी मानतो. चांगल्या सामाजिक कार्याची ओळख जर अनुशासन, राष्ट्रभावना, सेवामय वृत्ती आणि भारतीय संस्कार-विचार असेल, तर ते सामाजिक काम संघाशी संबंधित नसले तरी ते संघाच्याच राष्ट्रीय उद्धाराच्या विचाराचे आहे, असे मला वाटते.
 
आज आपला देश एका विचित्र तणावातून जातो आहे. महागाई, बेकारी आणि नैसर्गिक आपत्ती यांचबरोबर महिलांवरील अत्याचार, त्यांच्याबद्दलची कनिष्ठतेची भावना त्यातून आलेल्या स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचाराला मिळत चाललेली मान्यता आणि प्रतिष्ठा, जातीजातीत वाढत चाललेली तेढ, लाखालाखाचे मोर्चे काढून आपल्या ‘जात’पणावर केलेले शिक्कामोर्तब, दुसर्‍या समाजाकडे पाहण्याचा तिरस्करणीय दृष्टिकोन, झुंडीने येऊन लोकशाहीच्या विचारांची केलेली पायमल्ली, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा अपरिमित र्‍हास, राष्ट्र भावनेऐवजी प्रांतभावनेचा चाललेला प्रचार, परराष्ट्रातील सुखलोलुप चंगळवादी वृत्तीचे वाढते आकर्षण, त्यातून आलेले एकत्र कुटुंब विभाजन, वृद्ध आईवडिलांना पैशाच्या आधारे सोडून देण्याचा कृतघ्न विचार, लहान वयातच बालकांमध्ये आलेली कुटुंब कल्पनेपासून तुटत जाण्याची भावना, या सार्‍या विषण्ण करणार्‍या गोष्टी आहेत.
 
‘एकेकाळचे एकसंघ राष्ट्र हेच काय?’ असं विचारण्याची अवेळ जणू आली आहे. आपल्या संस्कृतीवर, आपल्या संस्कारांवर ‘आघात’ आहे. तो जरी सुप्त स्वरूपात असला तरी तो ऐकणार्‍यांना ऐकू येतोच. खूप जोराने ढोलपथके ढोल बडवू लागली की, एकमेकांचे बोलणे ही धड ऐकू येत नाही, तसेच काहीसे झाले आहे. आवाजांची तीव्रता वाढली की विचारांची तीव्रता नष्ट होते. आपल्या सणासुदीलाही मंगल श्लोकवादी पठणाऐवजी ढोलताशांचा, मने मठ्ठ करणारा आवाज वाढीस लागलाय, याचा अर्थ काय?
 
ध्वनिप्रदूषण वाढते तेव्हा धोक्याचीच घंटा असते. ढोल जोराजोरात वाजू लागतात, तेव्हा ते आपल्या संस्कृतीच्या पडझडीचेच पडघम असतात. ते थोपावावेत असे वाटते. उच्च विचार ही आपल्या भारतीयत्वाची धर्मखुण आहे. ती मिटवण्याचा प्रयत्न कोणी करते आहे की काय, अशी शंका यावी असे वातावरण आहे. यासाठी संघाचा नवा जागर अपेक्षित आहे. भेद सारे मावळू द्या,
वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची,
पूर्ण होवो कल्पना
मुक्ती आम्ही फक्त मानू,
बंधुतेच्या बंधना सत्य सुंदर मंगलाची,
नित्य हो आराधना
 
या अशा प्रार्थना आपलं जगणं होवो, हीच या प्रसंगीची मनीषा...
 
 
 
- अरुण म्हात्रे
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@